Azolla Production
Azolla ProductionAgrowon

Azolla Production : दर्जेदार अझोला निर्मितीचे तंत्र

Azolla Production Technique : अझोलामध्ये जीवनसत्वे, प्रथिने, खनिजे आणि अमिनो आम्ल आहेत. चाराटंचाईच्या काळात अझोलाचा वापर फायदेशीर ठरणार आहे.

डॉ. ए. एस. पाटील, डॉ. जी. एम. गादेगावकर

Azolla Feed Management : हिरव्या चाऱ्याच्या अभावामुळे जनावरांमध्ये अ आणि ई जीवनसत्त्वाची कमतरता होते, प्रजननावर विपरीत परिणाम होतो. जनावरे माजावर येत नाहीत किंवा माजाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे नसते. या समस्येवर कमी खर्चात तयार होणारे जनावरांसाठी पौष्टिक खाद्य म्हणून अझोला हा उत्तम पर्याय आहे.

दुधाळ गाई व म्हशींच्या आहारात अझोलाचा वापर केल्यास दूध उत्पादनात वाढ होते, दुधाची प्रत सुधारते. कोंबड्यांच्या आहारात अझोलाचा वापर केल्यास अंडी उत्पादनात वजन वाढीवर अनुकूल परिणाम होतो.

तयार करण्याची पद्धत

अझोला तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी जागा सपाट आणि तणरहीत करून घ्यावी.

सावलीची जागा निवडावी, कारण अति सूर्यप्रकाशामुळे अझोला वाळून जाण्याची शक्यता असते.

१० फूट लांब, ५ फूट रुंद व १२ इंच खोल आकाराचे वाफे तयार करावेत.

खड्ड्याचा पृष्ठभाग समप्रमाणात करून घ्यावा. जेणेकरून पाण्याची पातळी समप्रमाणात राहील.

खड्ड्याच्या आतील भागावर १५० ते २५० जीएसएम जाडीचा प्लॅस्टिक कागदाचे आच्छादन करावे. प्लॅस्टिक कागदाला घडी पडणार नाही याची काळजी घ्यावी.

खड्ड्यामध्ये १० ते १५ किलो चाळलेली सुपीक मातीसारख्या प्रमाणात पसरून घ्यावी. त्यानंतर १० लिटर पाण्यामध्ये चांगले कुजलेले शेण ५ किलो, ३० ते ३५ ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि २० ग्रॅम खनिज मिश्रण मिसळावे. तयार झालेले द्रावण मातीवर एकसारखे पसरून ओतावे.

खड्ड्यांमध्ये स्वच्छ ताजे पाणी १० सेंमी उंचीपर्यंत भरावे. खड्ड्यातील मिश्रण तळाला स्थिर झाल्यावर १.५ ते २ किलो ताजा व शुद्ध अझोला पाण्यावर सोडावा.

साधारण १० ते १५ दिवसात अझोलाची वाढ झालेली दिसून येते.

खड्डा पूर्णपणे भरल्यानंतर ३०० ते ३५० ग्रॅम प्रति चौरस मीटर प्रति दिन या प्रमाणात अझोलाचे उत्पादन मिळते. अशा प्रकारे एका खड्ड्यातून दररोज १.५ ते २ किलो अझोलाचे उत्पादन मिळते.

Azolla Production
Paddy Azolla Use : भात पिकात अॅझोलाचा वापर कसा करावा?

तयार करताना घ्यावयाची काळजी

अझोलाची चांगली वाढ होण्यासाठी दर ८ दिवसांनी १ ते २ किलो शेण, ३० ग्रॅम सुपर फॉस्फेट, २० ग्रॅम खनिज मिश्रण पाण्यात मिसळावे.

दर १० दिवसांनी खड्ड्यातील २५ टक्के पाणी बदलावे. तसेच दर २ महिन्यांनंतर खड्ड्यातील ५० टक्के माती बदलून नवीन चांगली सुपीक माती टाकावी.

वाळवी, मुंग्या, किडे यांपासून बचाव करावा.

अझोलासाठी शेणाचा वापर जास्त प्रमाणात करू नये. जास्त शेण टाकल्यामुळे तयार होणारा अमोनिया अझोलासाठी घातक ठरतो.

खड्ड्यातील पाण्याची पातळी ४ ते ५ इंचांपर्यंत कायम ठेवावी. पाण्याची उंची जास्त झाल्यास अझोलाची मुळे खड्ड्यातील अन्नघटक शोषून घेऊ शकत नाहीत, परिणामी अझोलाचे उत्पादन घटते.

झाडाखाली वाफा केला असल्यास शेडनेटचा वापर करावा कारण वाफ्यातील पाण्यात पालापाचोळा पडून कुजण्याची शक्यता असते.

अझोला उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा सामू ६.५ ते ७.५ इतका असावा. जास्त क्षार असलेल्या पाण्यामध्ये अझोलाची वाढ होत नाही.

अझोलामध्ये रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यानंतर नवीन अझोला कल्चर वापरून नव्याने वाफा तयार करावा.

वाफ्यातील कल्चर दर सहा महिन्यांनी

बदलावे. तयार झालेला अझोला रोजच्या रोज काढावा, अन्यथा थर जमा होऊन रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, अझोला खराब होऊ शकतो.

Azolla Production
Azolla Production : अझोला निर्मितीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जनावरांना अझोला देण्याची पद्धत

जनावरांच्या आहारात अझोला

वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवावा, कारण अझोलास शेणाचा वास येत असेल तर जनावरे तो खात नाहीत.

सुरवातीला एक आठवडा जनावरांना

अझोला देताना पशुखाद्यात १:१ या प्रमाणात मिसळून द्यावा. नंतर हळूहळू पशुखाद्याचे

प्रमाण कमी करून अझोलाचे प्रमाण

वाढवावे.

प्रतिदिन जनावरांना १ ते १.५ किलो अझोला खायला द्यावा.

अझोला सुकल्यानंतर १० टक्के प्रमाणात पशुखाद्यात मिसळावा.

अझोला देण्याचे प्रमाण

जनावर प्रति दिन अझोला देण्याचे प्रमाण

गाय व म्हैस १.५ ते २ किलो

शेळी व मेंढी ३०० ते ५०० ग्रॅम

कोंबडी २० ते ३० ग्रॅम

वराह ५०० ते ७०० ग्रॅम

वैशिष्ट्ये

नत्र स्थिर करण्याच्या गुणधर्म आहे. अझोलामध्ये नत्राचे प्रमाण अधिक आहे. याचा हिरवळीचे खत म्हणून देखील वापर होतो.

अझोलामध्ये २५ ते ३० टक्के प्रथिने, १० ते १५ टक्के खनिजे, ७ ते १० टक्के अमिनो आम्ल आहेत.

अझोलामध्ये जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब तसेच लोह, तांबे, स्फुरद, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात.

लिग्नीनचे प्रमाण कमी असल्यामुळे अझोला जनावरे सहजपणे पचवू शकतात.

फायदे

पशुखाद्याचा २० ते २५ टक्के खर्च कमी होतो.

पशू आहारात अझोलाचा वापर केल्यास दूध उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. दुधाची प्रत सुधारते. त्याचबरोबर दुधातील फॅटचे प्रमाणदेखील वाढते. वासरे, करडांच्या वजनात झपाट्याने वाढ होते.

अंडी देणाऱ्या कोंबड्यांमध्ये अंडी देण्याचे प्रमाण वाढते. अझोलातील कॅरोटीन या घटकामुळे अंड्याच्या बालकाचा रंग गडद पिवळा होतो. ब्रॉयलर कोंबड्यांचे वजन लवकर वाढते. मांसाचे चांगले उत्पादन मिळते.

ससे, वराहाच्या आहारात अझोलाचा वापर केल्यास त्यांची वाढ झपाट्याने होते. खाद्यावरील खर्च कमी होतो.

अझोला वाफ्यातून काढण्यात येणारे पाणी नत्रयुक्त व खनिज युक्त असल्याने पिकांसाठी, झाडांसाठी वापरता येते. वाफ्यातून काढण्यात येणाऱ्या एक किलो मातीचे गुणधर्म हे सुमारे ०.५ किलो रासायनिक खताइतके असते.

डॉ. ए. एस. पाटील, ९२८४९५१५७१ (पशुवैद्यकीय व पशू विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com