Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

Journey : काल मी तांदूळवाडीला झालेल्या महात्मा फुले जयंतीविषयी सविस्तर लिहिलेलं आहे. आणि आजही पुन्हा त्याच गावाविषयी लिहितो आहे. त्याचं कारणही तसं खासच आहे.
Indrjeet Bhalerao
Indrjeet BhaleraoAgrowon

इंद्रजीत भालेराव

Tandulwadi to Merath Journey : काल मी तांदूळवाडीला झालेल्या महात्मा फुले जयंतीविषयी सविस्तर लिहिलेलं आहे. आणि आजही पुन्हा त्याच गावाविषयी लिहितो आहे. त्याचं कारणही तसं खासच आहे. काल या विषयावर लिहिलं असतं तर लेख फारच मोठा झाला असता, म्हणून काल केवळ कार्यक्रमाचा वृत्तांत लिहून मी थांबलो. या गावातल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब बीडकर ही एक विलक्षण अद्भुत व्यक्तीमत्व आहे. त्यांच्याविषयी मला जरा सविस्तर लिहायचं होतं. म्हणून मी काल त्यांच्याविषयी काहीच न लिहिता आजची ही स्वतंत्र नोंद लिहितो आहे.

बाबासाहेब बिडकर हे मूळचे याच गावचे. मग त्यांचं आडनाव बीडकर कसं ? तर ते संन्यस्त महानुभाव आहेत. मूळचे जाधवच आहेत, पण महानुभावांमध्ये संन्यास घेतला की गृहस्थाश्रमातले नाव त्यागावे लागते आणि नवे नाव धारण करावे लागते. तिथले आडनाव गुरुचे असते. आणि नाव आपण आपल्या सोयीने बदलायचे असते. पण बाबासाहेब बीडकर यांनी बाबासाहेब हे आपले मूळचे नाव तसेच ठेवले आणि गुरुचे बीडकर हे नाव लावले.

आज त्यांच्या नावावर दोन कादंबऱ्या, दहा संशोधनात्मक पुस्तकं आणि लीळाचरित्राच्या हिंदी अनुवादाचे दोन खंड, एवढे साहित्य जमा आहे. पण परभणीतल्या कुणाही लेखकांना त्यांचं नाव माहित नाही. कारण ते जरी या गावात जन्माला आले असले तरी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांनी गाव सोडलेलं आहे. जवळच असलेल्या बोरीच्या महानुभाव आश्रमात त्यांना अर्पण करण्यात आलेलं होतं. तिथल्या लासुरकर बाबांसोबत काही दिवस राहिल्यावर पुढच्या शिक्षणासाठी ते फैजपूरच्या चक्रधर महाविद्यालयात गेले.

तिथं संस्कृत या विषयाची शास्त्री ही परीक्षा पास झाल्यावर त्यांना हिंदी भाषेची ओढ निर्माण झाली. त्यासाठी ते सरळ उत्तर प्रदेशात निघून गेले. मेरठला एका जैन कुटुंबाने त्यांना आधार दिला. तिथे राहून बाबासाहेबांनी हिंदीचे शिक्षण घेतले. ते एमए हिंदी झाले. नंतर त्यांनी एमए तत्वज्ञान केलं आणि पुढे तत्त्वज्ञानातच पीएचडी आणि डिलीट देखील केली. वयाच्या २२ व्या वर्षी बाबासाहेब मेरठला गेले, तेव्हापासून मेरठचेच झाले. आज बाबासाहेबांचे वय ७८ वर्षे आहे.

Indrjeet Bhalerao
Indrajit Bhalerao : महानोरांच मोठेपण आता वाढतच जाईल !

एका विद्यापीठातून त्यांना बोलावणं आलं असतानाही ते रुजू झाले नाहीत. कारण आपण महानुभाव पंथाचा संन्यास घेतलेला आहे, तेव्हा देवकारण सोडून इतर कुठल्याही कारणासाठी आपलं आयुष्य वेचायचं नाही, याचा त्यांनी निश्चय केलेला होता. मेरठलाच त्यांनी एका महानुभावीय श्रीकृष्ण मंदिराची उभारणी केली. मी बाबांना सहज विचारलं, तिथं तुमचे महानुभाव पंथीय अनुयायी आहेत का ? तर ते म्हणाले, 'नाही. तिथे एकही महानुभाव पंथीय अनुयायी नाही. पण माझ्या श्रीकृष्ण मंदिराचे भक्त खूप आहेत.' म्हटलं, तुम्ही किती महानुभाव लोक तिथे असता ? तर ते म्हणाले, मी एकटाच असतो.

म्हटलं मग तुमच्या जेवणा-खाण्याची व्यवस्था काय ? तर ते म्हणाले, 'मला सुरुवातीच्या काळात ज्या जैन कुटुंबानं सांभाळलं, त्याच कुटुंबातून अजूनही मला जेवणाचा डबा येतो.' महानुभाव पंथामध्ये एवढी विद्वत्ता प्राप्त केल्यावर बहुतेक लोक मोठ्या महंतीची अपेक्षा करतात. मोठा परिवार जमा करतात. पण बाबासाहेबांनी हे सगळे मोह टाळले. आणि केवळ साहित्यसाधना करत ते मेरठच्या कृष्णमंदिरामध्ये राहतात. त्यांना तिथे कुणीही महानुभाव अनुयायी नसतानाही मोठ्या देणग्या मिळतात. त्यामुळे तिथले मंदिर तसे लोकप्रिय आहे. त्या देणग्यांच्या आधारावरच त्यांनी तांदूळवाडीतही एक मोठे मंदिर उभारले आहे. वर्षातून दोन-तीन वेळा आठदहा दिवसांसाठी फक्त ते इथं येतात. त्यासाठी त्यांनी मंदिराच्यावर अतिथीगृहही बांधलेलं आहे.

बाबासाहेबांनी तीन वर्षांपूर्वी 'युगदृष्टा चक्रधर स्वामी' ही त्यांनी लिहिलेली कादंबरी मला वाचायला पाठवली होती. पण त्या काळात माझी ती वाचून झाली नाही. पुढे या कादंबरीवर नांदेडला संजय जगताप यांनी एक छान परिसंवाद ठेवला होता. त्यात त्यांनी मलाही या कादंबरीवर बोलायला निमंत्रित केलेलं होतं. तेव्हा ही वाचून त्या कादंबरीवर टीपनं काढायचं मी ठरवलं. कारण टीपणं काढल्याशिवाय मी बोलत नाही. यानिमित्ताने कादंबरी नक्की वाचून होईल असं मला वाटलं होतं. पण नेमका त्याच तारखेला मला पुण्याचा वाग्यज्ञ पुरस्कार मिळाल्यामुळे मला कादंबरीवरच्या परिसंवादाला जाणं रद्द करावं लागलं.

त्यामुळे कादंबरी वाचून टिपणं काढायचंही राहून गेलं. दरम्यान बाबासाहेबांनी 'जिज्ञासू महदाईसा' ही आणखी एक कादंबरी लिहिली. तीही त्यांनी मला पाठवली. पण माझ्या व्यापात या दोन्ही कादंबऱ्या वाचायच्या राहून गेल्या. दोन्ही कादंबऱ्या साडेसहाशे पृष्ठांपर्यंत आहेत. एवढ्या मोठ्या कादंबऱ्या महानुभावांच्या विषयावर आतापर्यंत कुणीही लिहिलेल्या नाहीत. एका कादंबरीचा नायक महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी आहेत तर दुसऱ्या कादंबरीच्या नायीका चक्रधरांच्या परम शिष्य महदाईसा आहेत. बीडकर बाबा व्याख्यान, प्रवचन देत बसत नाहीत. शिष्य परिवार वाढवत बसत नाहीत. अभ्यास करून केवळ लेखन करण्यात पूर्ण वेळ घालवतात. त्यामुळे त्यांच्याकडून खूप चांगलं लेखन झालेलं आहे. काही वर्षे त्यांनी 'प्रभू प्रसाद' नावाचं हिंदी-मराठी मासिकही काढलं. पण नंतर ते मासिक त्यांना बंद करावं लागलं.

या कादंबऱ्या आणि निळाचरित्राच्या हिंदी अनुवादाचे दोन खंड प्रकाशित केले, या पुस्तकांची निर्मिती त्यांनी स्वतःच सुरू केलेल्या प्रभू प्रसाद प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित केलेली आहेत. ती पाहिली की निर्मितीच्या दृष्टीने इतकी श्रीमंत पुस्तकं मराठीत नाहीतच असं म्हणायला हरकत नाही, असं मला वाटलं. त्याविषयी बाबांना विचारलं की, बाबा या पुस्तकांची निर्मिती इतकी उत्तम कशी होते ? तर ते म्हणाले, 'टाईपसेटिंग आणि लेआउट मी स्वतःच करून देतो. माझे एक भक्त राजीव पुरी यांचा मुंबईला फार मोठा प्रेस आहे.

ते मला मुद्रण करून देतात. त्यामुळे या पुस्तकांची निर्मिती एवढी उत्तम असते.' पुस्तकांच्या निर्मितीकडे लेखक फारसं लक्ष देत नाहीत. त्यातल्या त्यात धार्मिक पुस्तकांच्या निर्मितीकडं तर फारच दुर्लक्ष केलेले असतं. पण बाबासाहेब बीडकर यांनी आपल्या पुस्तकांची निर्मिती इतकी उत्तम केलेली आहे की वाङ्मय व्यवहारात इतक्या उत्तम निर्मितीची पुस्तकं मराठीत तरी दुर्मिळच आहेत.

Indrjeet Bhalerao
Indrajit Bhalerao : स्वाभिमान घडवाया बळ आम्हाला मिळो बळीला

त्यांनी दोन खंडात हिंदीत अनुवादित केलेल्या लीळाचरित्राचीही एक कहाणी आहे. वर्ध्याला जेव्हा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ निघालं तेव्हा या विद्यापीठाने लीळाचरित्राचा हिंदी अनुवाद प्रकाशित करायचा असं ठरवलं. या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू अशोक वाजपेयी होते. त्यांनी हा प्रकल्प सुरू केला. त्यासाठी पुरुषोत्तम नागपुरे यांना लीळाचरित्राचा हिंदी अनुवाद करायला सांगितला. नागपुरे यांनी हिंदी अनुवाद करून विद्यापीठाला सादर केला. विद्यापीठाच्या नियमानुसार तो कुण्या तरी तज्ञाकडून तपासून घेणे आवश्यक होते. हिंदीमध्ये लीळाचरित्राची जाण असलेले विद्वान कोण ? असा प्रश्न जेव्हा त्यांच्यासमोर निर्माण झाला तेव्हा अशोक वाजपेयी यांनी बाबासाहेब बीडकर यांना हा अनुवाद तपासून द्यायला सांगितलं. बाबासाहेब बीडकर यांनी हा अनुवाद तपासून आपला अभिप्राय विद्यापीठाला पाठवला.

तो अभिप्राय वाचून अशोक वाजपेयी यांनी असा निर्णय घेतला की लीळाचरित्राचा हिंदी अनुवाद बाबासाहेब बीडकर यांनीच करावा. आणि वर्ध्याच्या महात्मा गांधी हिंदी विद्यापीठाने तो प्रकाशित करावा. त्यासाठी बाबासाहेबांनी हा हिंदी अनुवाद केलेला होता. पण पुढे अशोक वाजपेयी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून निवृत्त झाले आणि विद्यापीठाची सगळी धोरणे बदलली. म्हणून बाबासाहेब बीडकर यांनी हा अनुवाद स्वतःच प्रकाशित केला. आतापर्यंत लीळाचरित्राचा एकही हिंदी अनुवाद झालेला नव्हता. मराठीतला एवढा अभिजात ग्रंथ हिंदी भाषकांपासून दूरच होता. बाबासाहेबांनी अतिशय मेहनत घेऊन दोन खंडांमध्ये हा ग्रंथ आता हिंदीमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे हिंदी साहित्यविश्वाला लीळाचरित्राचा परिचय होईल.

अशा एका परभणी जिल्ह्यातल्या छोट्या गावात जन्माला आलेल्या आणि पुढे आपल्या जिद्दीने पुढे पुढेच जात राहिलेल्या आणि हिंदी साहित्यविश्वात नाव कमावलेल्या, पण मराठीतूनही खूप चांगलं लेखन करणाऱ्या, या लेखकाचा परिचय मराठी वाङ्मयविश्वाला नाही. धार्मिक स्वरूपाचं लेखन करणारांकडं तुच्छतेने पाहण्याचा मराठी वाङ्मयविश्वाचा स्वभाव याला कारणीभूत आहे, असं मला वाटतं. प्रत्येकच गोष्टीकडं संशयानं पहाणं योग्य नाही. त्यात काही वाङ्मयमूल्य असेल तर त्याची दखल घ्यायला हवी. बाबांनी संशोधनात्मक लेखनाबरोबरच दोन कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. आणि लीळाचरित्रासारख्या अभिजात ग्रंथाचा हिंदी अनुवाद केलेला आहे. भगवद्गीतेवरच्या द्विखंडात्मक भाष्याचं लेखन पूर्ण झालेलं आहे. या गोष्टीसाठी तरी मराठी वाङ्मयविश्वानं त्यांची दखल घ्यायला हवी, असं मला वाटतं.

आता बाबासाहेब बिडकर यांच्या सर्वच पुस्तकांवरील परिचय आणि परीक्षण पर लेखांचं एक संकलन बाबांच्या गौरव ग्रंथांच्या निमित्ताने कोमल ठाकरे करत आहेत. त्यासाठी मी बाबांचे साहित्य वाचणार आहे, आणि त्यावर सविस्तर लिहिणारही आहे. आता या गौरव ग्रंथाच्या निमित्ताने का होईना मराठी वाङ्मयविश्वाला बाबासाहेब बिडकर यांचा परिचय होईल. बाबासाहेब बिडकर महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात गेले आणि महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी गुजरातमधून महाराष्ट्रात आले. मुळात चक्रधर स्वामी यांनीच प्रांत या आपल्या मर्यादा मानल्या नव्हत्या. बाबासाहेब बिडकर यांनीही कुठल्या प्रांताला आपली मर्यादा मानली नाही. आणि ते मेरठमध्ये जाऊन स्थायी झाले.

एवढ्या मोठ्या माणसाचा एक आदर्श म्हणून गावावर काही परिणाम होत असतो की नाही ? याचा विचार करायला गेलं तर आपल्या लक्षात येईल की माझा विद्यार्थी मदन जाधव हा मराठीमध्ये पीएचडी करण्यासाठी अलीगड विद्यापीठातल्या मराठी विभागात गेला होता. तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही की यानं एवढा दूरचा मार्ग का निवडला ? पण जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन मला समजलं, तेव्हा लक्षात आलं की आपल्या प्रांताच्या बाहेर जाऊन आपण आपलं अस्तित्व सिद्ध केलं पाहिजे ही मदन जाधव या माझ्या विद्यार्थ्याच्या पाठीमागची प्रेरणा कदाचित बाबासाहेब बिडकर हेच असतील.

मदन जाधव या माझ्या विद्यार्थीमित्रानं महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने निमंत्रित करायचं ठरवलं तेव्हा नेमके बाबासाहेब तांदुळवाडीत आहेत आणि कार्यक्रमाचे अध्यक्षही तेच आहेत, असं सांगितलं, तेव्हा मला वाटलं हा तर माझ्यासाठी हा दुग्धशर्करा योग आहे. ज्यांच्याशी मी केवळ फोनवरच बोललो होतो आणि ज्यांच्या दोन कादंबऱ्या मला भेट म्हणून आलेल्या होत्या, त्यांना कधीतरी मला भेटायचं आणि पाहायचं होतंच. त्या लेखकाची या निमित्तानं भेट होणार होती आणि माझा विद्यार्थ्याचं गावही मला पाहता येणार होतं. अशा या दुग्धशर्करा योगासाठी मी तांदूळवाडीचं निमंत्रण लगेचंच स्वीकारलेलं होतं. आणि मनोमन मदन जाधव या माझ्या विद्यार्थी मित्राचे आभारही मानले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com