Indrajit Bhalerao : महानोरांच मोठेपण आता वाढतच जाईल !

Article by Indrajit Bhalerao : महानोरांशी माझं सूत्र जुळलेलं असो की बिघडलेलं असो. महानोर यांची गाणी मी सतत ऐकत होतो. त्यांच्या नव्या गाण्यांची मी वाट पाहत होतो.
Na. Dho. Mahanor
Na. Dho. MahanorAgrowon
Published on
Updated on

N D Mahanor : महानोरांशी माझं सूत्र जुळलेलं असो की बिघडलेलं असो. महानोर यांची गाणी मी सतत ऐकत होतो. त्यांच्या नव्या गाण्यांची मी वाट पाहत होतो. जैत रे जैत, माझ्या आजोळची गाणी, सर्जा, मुक्ता, दोघी, एक होता विदूषक, शेवंतीचे बन, दूरच्या रानात, अजिंठा, गंध मातीचा असे कितीतरी प्रकल्प महानोरांच्या कवितेवर सादर झाले. त्याशिवाय सुट्या सुट्या कविता वेगवेगळ्या गायकांनी वेगवेगळ्या ध्वनिमुद्रिकेमधून गायलेल्या आहेत.

ते सगळं कुठून कुठून मिळवून मी माझ्याकडे एकत्रित जमवत होतो. माझ्याकडं स्वतःचं वाहन आलं, तेव्हा पहिल्यांदा मी त्यात एक अद्ययावत टेप बसवून घेतला. त्यावर सतत महानोरांची गाणी ऐकत होतो. पुढं सीडींचा जमाना आला. महानोरांच्या त्या सगळ्या सीडीही मी घेतल्या. कारण महानोरांच्या गाण्याशिवाय अलीकडच्या काळात ऐकण्यासारखं होतं तरी काय?

त्यांच्या कवितेत श्रृंगार होता, रान होतं, रानातलं दुःखही होतं. ‘जैत रे जैत''मधल्या जांभूळ पिकल्या झाडाखाली आणि मी रात टाकली किंवा नभ उतरू आलं अशी काही मोजकी गाणी सोडली, तर उर्वरित दहा-बारा गाणी ही प्रामुख्यानं दुःखाची, कष्टाचीच गाणी होती. पण ती गाणी इतर लोक ऐकत नव्हते. मी ती गाणी पुन्हा पुन्हा ऐकत होतो.

त्याच्यातून मला भूमीत कष्टणाऱ्यांची दुःखं, वेदना दिसत होती, कळत होती. ‘पीक करपलं, पक्षी दूर देशी गेलं’ या सुंदर कवितेचं गाण्यात झालेलं सुंदर रूपांतर फारसं कुणाच्या लक्षात आलं नाही. दोघी चित्रपटांमधलं ‘भुई भेगाळली सारी, वल राहिली ना कुठं, पाल्या पाचोळाचा जीव वाहाटुळीशी घुस्मटं’ हे गाणं असेल किंवा ‘इथे आलो होतो, मागाया जोगवा, आयुष्याचा ठेवा, तुझ्यापाशी’, ‘फाल्गुन मासे येता जीवाची तल्खी होई’, ‘नागपंचमीच्या सणा’ ही सगळीच्या सगळी गाणी मला फार फार आवडली होती.

Na. Dho. Mahanor
Na. Dho. Mahanor : कविवर्य महानोर यांना साश्रू नयनांनी निरोप

महानोरांची सगळ्यात जास्त दुर्लक्षित राहिलेली ‘दोघी' या चित्रपटातील गाणी मला सगळ्यात जास्त आवडलेली आहेत. ती सगळ्यात जास्त वेळा मी ऐकलेली आहेत. खरं तर हा चित्रपट केला तेव्हा आनंद मोडक हे नवे संगीतकार होते आणि अंजली मराठे, केशव बडगे हे या चित्रपटातली गाणी गाणारे गायकही नवे होते. यातलं कुणीच मंगेशकरांसारखं प्रसिद्धीचं वलय घेऊन आलेलं नव्हतं.

तरीही ही गाणी मला सगळ्यात जास्त चांगली वाटतात. त्याचं दुसरंही एक कारण म्हणजे हा चित्रपट सुमित्रा भावे यांचा होता. सुमित्राबाई आपल्या चित्रपटात गाण्यांचं जे सादरीकरण करतात तेही गाण्याला प्रचंड उठाव देणारं असतं. ही बाई म्हणजे कॅमेऱ्याने कविता लिहिणारी कवयित्रीच होती. सुदैवानं महानोरांना चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकही फारच वरच्या दर्जाचे मिळाले.

Na. Dho. Mahanor
Na. Dho. Mahanor : रानकवी ना. धों. महानोर यांचा जीवनपट...

त्यातल्या त्यात जब्बार पटेल आणि सुमित्रा भावे यांनी निवडलेले संगीतकार, गायक आणि महानोरांच्या गाण्यांचं केलेलं चित्रीकरण जिवाला वेड लावणार आहे. ‘दोघी'मध्ये महानोरांची गाणी, आनंद मोडकांचे संगीत आणि सुमित्रा भावे यांचा कॅमेरा व दिग्दर्शन यांची विलक्षण जुगलबंदी आहे. ती पाहताना आपला जीव हरखून जातो.

आपण काहीतरी उच्च प्रतीचे अनुभवतो आहोत याचा सतत उल्हास आपल्या मनात दाटत राहतो. हे सुख, हा आनंद, ही कलात्मक उंची अलीकडच्या काळात कुणाला कमावता आली? महानोरांनी हे सगळं साध्य केलं. त्याच्या पाठीमागे त्यांची साधना होती. त्यांचे कष्ट होते. त्यांची मेहनत होती. त्यांचे दुःख होते. आणि त्यांची जाज्वल्य आकांक्षा होती.

हे सगळं करत असताना माणसाला सगळी व्यवधानं पाळणं शक्य होत नाही. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या माणसांकडून तर नव्या पिढीच्या सतत काहीतरी अपेक्षा असतात. त्या अपेक्षा पूर्ण करणं त्या प्रसिद्धीच्या लाटेवरच्या माणसाला शक्य होत नाही. त्यामुळं काहीही न करता पुष्कळ शत्रू निर्माण होतात.

आम्हीही कदाचित तसेच त्यांचे शत्रू असू. किंवा तसंच त्यांच्याविषयी सावट आमच्या मनात निर्माण झालं असेल. कारण आपल्या नंतरच्या पिढीतले, आपला काहीच गुन्हा नसताना, आपल्याला कल्पना नसताना अचानक जे शत्रू समोर उभे राहतात, त्यांच्या शत्रुत्वाचे कारणच आपणाला समजत नाही. तसंच महानोरांसमोरचं संकट आपणही उभं केलं असावं, असं कधी कधी वाटून जातं.

आता महानोर नाहीत. त्यामुळं सतत महानोरांचं मोठेपण हे वाढतच जाईल. माणूस समोर असला की त्याला आपण शत्रू किंवा मित्राच्या रूपात पाहू शकतो; पण तो एकदाचा गेला की केवळ श्रद्धाच शिल्लक राहतात. त्यामुळे महानोर आता इथून पुढं वादाचा विषय असणार नाहीत. महानोर हे इथून पुढं रसिकांच्या केवळ श्रद्धेचाच विषय असणार आहेत!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com