Environmental Management : डोक्यावर घडे नको, तर धडे घ्या!

दृश्‍य जल म्हणजे पावसाचे पाणी. त्याचे व्यवस्थापन हा केवळ ग्रामीण भागाचा आणि शेतकऱ्यांचा विषय नाही, तर तितकाच तो शहरी लोकांचाही झाला पाहिजे.
Environmental Management
Environmental ManagementAgrowon

पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा असे तीन वर्षभरात साधारण समप्रमाणात वाटलेले तीन ऋतू हे भारत देशास मिळालेले निसर्गाचे मोठे वरदान आहे.

हा प्रत्येक ऋतू पुढे येणाऱ्या ऋतूच्या आगमनाची योग्य ती काळजी घेत असल्यामुळे सहा दशकापूर्वीपर्यंत भरपूर पाऊस, कडक हिवाळा आणि सुसह्य उन्हाळा राहत असे.

त्यामुळे शेती आणि त्यावर जगणारे शेतकरी स्वतः सुजलाम्, सुफलाम् तर होतेच, पण संपूर्ण भारतीय समाजही सुस्थितीत होता. आज वातावरण बदलाचा तडाखा बसत असतानाही आपला शेतकरी अन्नधान्य उत्पादनांत नवनवीन विक्रम जोडत आहे.

आता ऋतू चक्र बदलून गेलेले असतानाही आपण शेतकरी करू शकतो, त्याचे मुख्य कारण म्हणजे भरपूर पाऊस आणि त्या सोबतच भूजलाचा होणारा वारेमाप उपसा.

संयुक्त राष्ट्राचा वातावरण विषयक ताजा अहवाल सांगतो, की येत्या ५ ते ६ वर्षांत जगातील अन्नधान्य उत्पादनाचे गणित पूर्णपणे बिघडणार आहे. आणि त्याचे मुख्य कारण असणार आहे ते आपले पाणी व्यवस्थापनास गौण ठरवणे.

पाणी व्यवस्थापनापेक्षाही हरितवायू उत्सर्जनास वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिले जात आहे. इजिप्तमधील २०२२ च्या ‘क्लायमेट चेंज कॉन्फरस’च्या (COP २७) बैठकीस १९० राष्ट्रांचे ३५ हजार प्रतिनिधी हजर होते.

त्यांच्यासमोर इजिप्तने प्रथमच ‘पाणी व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा’ या महत्त्वाच्या मुद्यावर ठणकावून भाष्य केले. त्यामुळे २०२३ मध्ये दुबईत होणाऱ्या ‘COP २८’मध्ये यावर चर्चेला सर्व देशांनी अनुमती दर्शविली आहे.

Environmental Management
म्हैसाळ, टेंभू योजनांतून दररोज पाऊण टीएमसी पाणी उपसा

वातावरण बदलाचा काळा झेंडा फडकावत वेगाने धावणाऱ्या विध्वंसक रथाची हरित वायू उत्सर्जन आणि पाण्याचे घटणारे प्रमाण ही दोन चाके आहेत. त्यातील उत्सर्जनाचे चाक सातत्याने वाढत चालले आहे, तर दुसरे चाक म्हणजेच पाणी साठे वेगाने कोरडे पडत आहेत.

जागतिक तापमान वाढीमध्ये गोड पाणी साठे प्रमाणाबाहेर संवेदनशील बनत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे जमिनीवर असलेल्या पाणीसाठ्याचे बाष्पात, बाष्पाचे ढगात रूपांतर होते आणि त्यांच्यापासून पाऊस पडतो.

त्यातच आपण जमिनीखाली असलेले पाणी वर आणून त्याचा अनियंत्रित वापर करत आहोत. म्हणजेच उष्णतेमुळे त्याचेही बाष्पातच रूपांतर होते. वास्तविक बाष्प हेही एक प्रकारे कर्बवायूप्रमाणेच हरितगृह वायूसारखे काम करते. म्हणजेच उष्णता अडवते.

थोड्या प्रमाणात (३०० पीपीएम व त्यापेक्षा कमी) असलेला कर्ब वायू वातावरणामध्ये सच्च्या मित्राप्रमाणे काम करतो. तो आपली वसुंधरा उबदार ठेवण्यास मदत करतो. काही अपवाद वगळता तो हिवाळ्यात आपल्याला गारठण्यापासून वाचवतो, तर उन्हाळाही सुसह्य राहतो.

मात्र जेव्हा कर्बवायूचे हवेतील प्रमाण वाढते. ४५० पीपीएमच्याही पुढे जाते, तेव्हा तो एखाद्या शत्रूप्रमाणे ठरू लागतो. त्याने अडवलेली उष्णता असह्य होते. बाष्पाचेही तसेच आहे. समुद्राचा पृष्ठभाग तापून निर्माण होणारे बाष्प ढगामध्ये साठून मॉन्सूनच्या वाऱ्यासोबत वाहत जमिनीकडे येते.

मोसमी प्रदेशामध्ये पाऊस सर्वत्र बरसू लागतो. त्यांना अडविणारी व पर्णोत्सर्जनातून बाष्प निर्माण करणारी घनदाट जंगले पावसाळा व अन्य ऋतूमधील वातावरण सतत आनंदमय ठेवण्यात मदत करतात.

असे थोड्या प्रमाणातील बाष्प आपले मित्र असले तरी पाण्याचा अपव्यय व त्यातून निर्माण होणारे बाष्प आपले शत्रू आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. इथेच पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित होते.

सर्वांनीच धडे घेण्याची गरज

उन्हाळ्यात थकून घरी आल्यावर उकाड्याने त्रस्त झालो म्हणून धो धो वाहणाऱ्या नळाखाली बसून २-४ बादल्या पाणी डोक्यावर घेणे याला जल व्यवस्थापन म्हणत नाहीत. अर्ध्या बादलीतही हात पाय स्वच्छ धुऊन ‘जलव्यवस्थापन’ साधता येते.

‘चलता है, चलने दो’ या बेफिकीर आणि ‘मी त्याचे पैसे भरतोय’ या माजुरड्या वृत्तीमुळेच पाणी व्यवस्थापन बिघडले आहे. भरगच्च गर्दीमध्ये मतांच्या आकडेमोडी करणाऱ्या सरकारलाही शहरांना मुबलक पाणी पुरवण्यात अधिक रस असतो.

त्यांना एकेक बादली, हंड्यासाठी मैलोन् मैल पायपीट करणाऱ्या ग्रामीण व आदिवासी पाड्यातील महिला दिसत नाहीत. म्हणूनच ‘हर घर जल’ योजना सर्वांपर्यंत नळाने पाणी पोहोचवेल, हेच चांगलेच! मात्र त्या सोबतच शहरी असो की ग्रामीण, सर्वांनाच पाणी व्यवस्थापनाचे धडे देण्याचीही आवश्यकता आहे, हे सत्य नाकारता येणार नाही.

काँक्रिटीकरण टाळलेच पाहिजे...

वाढत्या जागतिक तापमाना सोबतच ध्रुवावरील बर्फ वितळून समुद्र पातळीत वाढ होणार. सोबतच वाढणारे बाष्प आणि मुसळधार पर्जन्यवृष्टीची आपत्ती वाढत जाणार. त्याला हरितवायू जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच बिघडलेले पाणी व्यवस्थापन सुद्धा.

कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील सर्वात सुंदर निसर्ग रम्य, सुदृढ हवामानाचा प्रदेश. मागील आठवड्यात अकस्मात आलेल्या मुसळधार पावसाने एकापेक्षा एक सरस फळबागा वाहून गेल्या. उत्तर कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकेने आपातकालीन परिस्थितीची घोषणा केली आहे.

ही स्थिती का उद्‍भवली? तर लॉस एंजेलिस परिसरामधील अनेक नद्यांना पॅसिफिक महासागराकडे वळविले गेले असून, काँक्रिटीकरण करून त्यावर फळबागा फुलवल्या गेल्या होत्या. वास्तविक नद्यांना मुक्तपणे वाहू देणे हा पाणी व्यवस्थापनाचाच एक भाग आहे. प्रगत राष्ट्रामधील हे चित्र तर इतरांबद्दल काय लिहावे?

Environmental Management
Unseasonal Rain : अवकाळी पाऊस, गारपिटीचा वऱ्हाडात पुन्हा तडाखा

रासायनिक खतांचा हवा संतुलित वापर

भारतातही ७०-८० च्या दशकापर्यंत जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा पाऊस वसुंधरेच्या पोटात मुरून काळ्या आईला तृप्त करत असे. त्या काळी जमिनीमध्ये सेंद्रिय तत्त्व भरपूर होते. किमान १९६४ पर्यंत तरी रासायनिक खतांचा मागमूसच नव्हता.

कोणत्याही नक्षत्रातील पडणारा पाऊस मातीतून मुरून पुढे नाल्या ओढ्यांद्वारे नदीलाही मुक्त वाहता ठेवी. भूजलाची पातळी वाढवी. हेच पाणी पावसाळ्यानंतरही नद्यांना बारमाही वाहते करी. निसर्गाने केलेले पाण्याचे हे उत्तम व्यवस्थापन होते, शेतकरी फक्त त्यास निमित्तमात्र.

पुढे हरितक्रांतीनंतर परिस्थिती बदलत गेली. सुरुवातीला प्रोत्साहन म्हणून अनुदानावर मिळणारी रासायनिक खते तशीच वाढत गेली. त्यामुळे उत्पादन वाढतेय, हे लक्षात आलेल्या शेतकऱ्यांचे जमिनीतील सेंद्रिय कर्बाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले.

त्यातच वाढलेल्या पावसाचे पाणी मुरण्याऐवजी पृष्ठभागावरून वाहू लागले. जाताना सुपीक जमिनीही खरवडून नेऊ लागले. यालाच आपण शेत जमिनीचे वाळवंटीकरण म्हणतो. या साऱ्यामागे अनियंत्रित रासायनिक खतांचा वापर जेवढा जबाबदार, तितकेच आपल्याला न समजलेले पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन आहे.

वाढत्या लोकसंख्येस अन्न पुरविण्यासाठी संतुलित प्रमाणात रासायनिक खते हवीतच, पण त्यासोबत पाणीही तितकेच महत्त्वाचे नाही काय? वातावरण बदलामुळे जमिनीत मुरणारा रिमझिम पाऊस आता इतिहास जमा होत चालला आहे.

यापुढे आपणास मुसळधार पाऊस आणि वारंवार ढगफुटीचा सामना करावा लागणार आहे. मोठ्या प्रमाणात कोसळणारे हे वर्षाजल आपण संकट म्हणून न स्वीकारता त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे.

त्याला अडवून जमिनीत कशा प्रकारे मुरवता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी केवळ रासायनिक खतांवर अवलंबून राहण्यापेक्षा शेतीला सेंद्रिय खते किंवा निसर्ग शेतीची कास धरणे गरजेचे आहे.

जमिनीतील वाढलेले सेंद्रिय कर्बच छोट्या छोट्या जलसंधारण उपायांसोबत पावसाचे पाणी शेतात मुरवण्यास आणि पिकांच्या उत्पादन वाढीला मदत करू शकते. हेच शेतकऱ्यांचे खरे पाणी व्यवस्थापन ठरणार आहे.

nstekale@gmail.com (लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com