
सांगली ः पुराचे पाणी दुष्काळी पट्ट्यात देण्यासाठी टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे सर्व पंप सुरू केले आहेत. गेल्या सात ते आठ दिवसांपासून ही योजना सुरू असून दोन्ही योजनेतून दररोज सुमारे पाऊण टीएमसी पाणी उचलले जाते.
दोन्ही योजनांतून सात टीएमसीहून अधिक पाणी उचलले जाणार आहे. म्हैसाळ योजनेतून जत, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील तलाव-बंधारे भरून घेण्याचे काम सुरू झाले आहे. म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनेचे पंप सुरू करून पाटबंधारे विभागाने जत, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी, तासगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील दुष्काळी भागातील तलाव भरून घेतले जाणार आहे. हे पाणी थेट शेतीला, पिण्यासाठी आणि तेथील भूजल पातळी उंचावण्यास फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील जनतेला दिलासा मिळणार आहे.
गेल्या सहा दिवसांपासून या दोन्ही उपसा सिंचन योजना सुरू आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी जत तालुक्याच्या पुढे म्हणजे सांगोला तालुक्याकडे पोहोचू लागले आहे. पहिल्यांदा सांगोला तालुक्यातील तलाव पाण्याने भरून दिले जाणार आहेत. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि मिरज तालुक्यातील तलावात पाणीसाठा केला जाणार आहे.
म्हैसाळ योजना सुरू केल्यानंतर २५ पंप सुरू केले. जसजसे पाणी पुढे जाईल तसतसे जादा पंप सुरू केले जात आहेत. सध्या ४५ पंप सुरू आहेत. पाणी पाचव्या टप्प्यात पोहोचले. पाणी शेवटच्या टप्प्यात गेल्यानंतर ६० पंप सुरू करण्यात येतील. सध्या तरी सर्व तलाव, बंधारे भरून घेण्याचे नियोजन आहे.
प्रत्येक दिवशी अर्धा ते एक टीएमसी पाण्याची उचल केली जात आहे. एक पंप ३६०० अश्वशक्तीचा आहे. त्यामुळे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल. तसेच भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.