Animal Tagging : जनावरांना ओळखण्यासाठी टॅगिंग, ब्रॅंंडिंग

Animal Branding : प्रत्येक जनावराची वैयक्तिक ओळख असेल तर पालकत्व, जन्मतारीख, उत्पादन नोंदी, आरोग्य इतिहास आणि इतर महत्त्वाच्या व्यवस्थापन माहितीच्या अचूक नोंदी ठेवण्यास मदत होते.
Animal Ear Tagging
Animal Ear TaggingAgrowon

डॉ. प्रेरणा घोरपडे, डॉ. प्राची मुंज
Animal Care : प्रत्येक जनावराची वैयक्तिक ओळख असेल तर पालकत्व, जन्मतारीख, उत्पादन नोंदी, आरोग्य इतिहास आणि इतर महत्त्वाच्या व्यवस्थापन माहितीच्या अचूक नोंदी ठेवण्यास मदत होते. अचूक नोंदी उत्पादकाला वैयक्तिक किंवा संपूर्ण कळपाचा व्यवस्थापनाबाबत निर्णय घेण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध होते.यासाठी जनावराची ओळख चिन्हांकित करणे गरजेचे आहे.

जनावरांना ओळखता यावे यासाठी विशिष्ट चिन्हे वापरली जातात.यामुळे कळपामधील जनावरांची वैयक्तिक ओळख होण्यास मदत होते. या चिन्हांना ‘ओळख चिन्हे’ असे म्हणतात. जेव्हा पशुपालकांकडे जनावरांची संख्या कमी असते, तेव्हा त्यांना प्रत्येक जनावराला ओळखणे आणि त्यांना एकमेकांपासून वेगळे ठेवणे शक्य होते. आधुनिक पद्धतीचा अवलंब करणाऱ्या मोठ्या गोठ्यामध्ये जनावरांची जास्त संख्या असते, त्यामुळे जनावरे ओळखण्यासाठी विशिष्ट पद्धत असणे आवश्यक आहे. कळपाच्या अचूक उत्पादनाच्या नोंदी ठेवण्यासाठी जनावरांची ओळख महत्त्वाची आहे.

ओळख चिन्हांकीत करण्याचे फायदे ः
१) प्रत्येक जनावराची वैयक्तिक ओळख असेल तर पालकत्व, जन्मतारीख, उत्पादन नोंदी, आरोग्य इतिहास आणि इतर महत्त्वाच्या व्यवस्थापन माहितीच्या अचूक नोंदी ठेवण्यास मदत होते.
२) अचूक नोंदी उत्पादकाला वैयक्तिक किंवा संपूर्ण कळपाचा व्यवस्थापनाबाबत निर्णय घेण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध होते.
३) एखाद्या विशिष्ट जनावराची मालकी दर्शविण्यासाठी किंवा मूळचा कळप सूचित करण्यासाठी जनावराची ओळख महत्त्वाची आहे.
४) पशुपालक जनावरांचा नोंदी सहज ठेवू शकतात.
५) मागील नोंदींच्या उपलब्धतेसह जनावरांवर उपचार करण्यात मदत होते.
६) येणाऱ्या प्रजनन हंगामापूर्वी सहजपणे बदली स्टॉक निवडता येतो.
७) जनावरांचे वर्तन आणि हालचालींचा मागोवा घेता येतो.
८) जनावरांवर मालकी प्रस्थापित करता येते.
९) विमा दाव्यांसाठी जनावरांची ओळख चिन्हांकित करणे महत्त्वाचे आहे.


Animal Ear Tagging
Animal Ear Tagging : ‘ईयर टॅगिंग’शिवाय जनावरांची वाहतूक बंद

ओळख चिन्हांकित करण्याच्या पद्धती :
टॅटूइंग (गोंदणे) :

- या पद्धतीमध्ये सर्वप्रथम गोंदवल्या जाणाऱ्या भागाला कायमस्वरूपी शाईने किंवा रंगाने धुतले जाते. त्यानंतर त्या भागावर संख्या किंवा अक्षरांची बाह्यरेखा गोंदली जाते.
- मुख्यतः पितळ किंवा स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेले टॅटू वापरले जातात.
- ही पद्धत शेळ्या, प्रौढ जनावरे आणि म्हशींमध्ये अतिशय प्रभावीपणे वापरली जाते. टॅटूइंग विशेषत: आतील कानात केले जाते.

टॅटूइंग करण्याची प्रक्रिया ः
- सर्वप्रथम जनावराला सुरक्षित बांधून त्यांच्या हालचालींवर नियंत्रण केले जाते.
- त्यानंतर गोंदण्यासाठी कानाचा आतील भागावरील नको असलेले केस काढून टाकतात. त्यामुळे त्वचा पूर्णपणे स्वच्छ होते.
- टॅटूइंगचा चिमटा जंतुनाशक द्रावणाने स्वच्छ केला जातो. टॅटूइंग चिमट्यावर अक्षरे किंवा संख्येचे आपल्याला इच्छित असलेले संयोजन करावे.
- पांढऱ्या कागदाच्या तुकड्यावर सर्वप्रथम गोंदावे. त्यामध्ये संख्या किंवा अक्षरांचा क्रम तपासावा. त्यानंतर गोंदविण्यासाठी कानाचे क्षेत्र आहे त्यावर अमिट शाई किंवा रंग लावावा.
- कानाच्या आतील बाजूस टॅटूइंगचा चिमटा ठेवून थोडासा दाब दिला जातो. त्यानंतर पूर्णपणे दाब देऊन कानावर अंकांचा शिक्का बसतो. हे करताना कानातील रक्तवाहिन्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
- पंक्चर झालेल्या खुणांमधून येणारे रक्त काढून टाकण्यासाठी स्वच्छ कापसाचा वापर करावा. टॅटू केलेले क्षेत्र स्वच्छ करावे.
- कानावर कायमस्वरूपी खूण असलेली जखम आठवड्याभरात बरी होते.

Animal Ear Tagging
Animal Ear Tagging : यापुढे ‘इअर टॅगिंग’शिवाय जनावरांची खरेदी-विक्री नाही

फायदे:
१) ही ओळख चिन्हांकित करण्याची सोपी आणि कायमस्वरूपी पद्धत आहे.
२) कोणत्याही वयाच्या जनावरांमध्ये या पद्धतीचा वापर करता येतो.
३) ही पद्धत कमी वेदनादायक आहे.
४) ही पद्धत कायदेशीररीत्या मान्य आहे. सर्व पशुधनासाठी योग्य आहे.

तोटे:
१) टॅटूइंगचे चिन्ह कालांतराने नाहीसे होते.
२) काळ्या रंगाचा जनावरांमध्ये या पद्धतीचा कमी उपयोग होतो.
३) संख्या वाचण्यासाठी जवळून तपासणी करावी लागते.


टॅगिंग :
- टॅगिंगमध्ये कानाला छेदून टॅग लावले जातात. टॅग विशिष्ट प्रकारचे असतात. त्यामध्ये संख्या दिलेली असते.
- टॅगचे दोन प्रकार आहेत. १) स्वतः छेदणारे टॅग, २) न छेदणारे टॅग.
- स्वतः छेदणारे टॅग थेट कानाला लावता येतात. न छेदणारे टॅग लावण्यासाठी कानाला छिद्र करावे लागते.

टॅगिंग करण्याची प्रक्रिया ः
१) जनावर सुरक्षित बांधून त्यांच्या हालचालीवर नियंत्रण करावे.
२) टॅगिंग करावयाच्या जागेवरील केस काढून त्वचा स्वच्छ केली जाते.
३) टॅगिंग चिमटा जंतुनाशक द्रावणाने स्वच्छ करावा.
४) टॅगिंग चिमट्यावर टॅग योग्य स्थितीत ठेवावा. त्यानंतर टॅगिंग चिमटा कानावर योग्य स्थितीत ठेवावा, म्हणजेच तो कानाच्या दोन मुख्य असलेल्या रिब्समध्ये ठेवावा आणि टॅगसाठी जोराने छिद्र करावे.
५) रक्तवाहिन्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. टॅग कानावर नीट टोचला आहे का ते तपासून पाहावे.

फायदे:
१) टॅग वापरायला सोपा आहे. 
२) टॅग सर्व प्रकारच्या हवामानात वापरता येतात.
३) टॅग स्वस्त आहेत. वाचायला सोपे आहेत.

तोटे :
१) काही वेळा टॅगमुळे कान फाटतात. योग्यरीत्या टॅगिंग न केल्यास ते हरवतात.
२) टॅगिंग करण्यासाठी कायमस्वरूपी चिन्हांकित शाई वापरली जाते. परंतु शाई कालांतराने फिकट होते.


ब्रँडिंग :
- या पद्धतीमध्ये, लाल-गरम लोह (हॉट आयर्न ब्रँडिंग) किंवा कॉस्टिक केमिकल्स (केमिकल ब्रँडिंग) वापरून जनावराच्या त्वचेवर विशेषतः मांडी, खांद्यावर संख्या किंवा अक्षरांची रूपरेषा ठेवून दाबली जाते.
- द्रव नायट्रोजन वापरूनही ब्रॅंडिंग केले जाते त्याला फ्रिझ ब्रॅण्डिंग किंवा कोल्ड ब्रँडिंग म्हणतात.

ब्रॅण्डिंग करण्याची प्रक्रिया ः
१) सर्वप्रथम जनावराला घट्ट बांधून त्यांच्या हालचालीवर नियंत्रण आणावे.
२) ब्रॅण्डिंग करायचे जे क्षेत्र आहे त्यावरील केस काढून त्वचा स्वच्छ करून घ्यावी.
३) सर्व जनावरांमध्ये ब्रॅण्डिंग मागचा चौथऱ्या वरची जी बाजू आहे तेथे केले जाते. डाव्या किंवा उजव्या कोणत्याही बाजूला ब्रॅण्डिंग करावे.
४) गरम लोखंडी ब्रॅण्डिंग करताना ब्रॅण्डिंगचा लोखंडी रॉडला विशिष्ट अक्षरे किंवा नंबरासह आग लावावी. तो भाग लाल गरम होऊ द्यावा. हे गरम लाल आयर्न ब्रॅण्डेड करण्याचा जागेवर ठेऊन हळूवारपणे दाबावे. त्या नंतर ते काढून टाकावे. जेणेकरून त्वचा अर्धवट जळाल्यामुळे कायमचे चिन्ह तयार होते.
५) जळालेल्या जागेवर जंतूनाशक लावावे, म्हणजे जखम होणार नाही.
६) फ्रिझ ब्रॅण्डिंगमध्ये, द्रव नायट्रोजन द्रावण असलेल्या कंटेनरमध्ये विशिष्ट अक्षर किंवा क्रमांकासह ब्रॅण्डिंग लोह रॉड ठेवावे. त्यानंतर ब्रॅण्डिंग करायचे जे क्षेत्र आहे त्यावर अक्षर किंवा क्रमांक काही सेकंद दाबावा आणि नंतर ते काढून टाकावे.
७) फ्रिझ ब्रॅण्डिंगमध्ये त्वचेवर कोरडे खवले बनतात, ते एका आठवड्यात बरे होतात. त्यानंतर कायमचे चिन्ह तयार होते.

फायदे :
१) ब्रॅण्डिंगमुळे कायमस्वरूपी ओळख चिन्हांकित करता येते.
२) कोल्ड ब्रॅण्डिंगमुळे त्वचेचे मूल्य कमी होत नाही.

तोटे :
१) हॉट ब्रॅण्डिंगमुळे डाग निर्माण झाल्याने त्वचेचे मूल्य कमी होते.
२) कोल्ड ब्रॅण्डिंगपेक्षा हॉट ब्रॅण्डिंग अधिक वेदना देते.

गळ्यातील साखळी
१) गळ्यातील साखळी किंवा दोरी, दुभत्या जनावरांच्यामध्ये ओळखण्याची एक सामान्य पद्धत आहे.
२) गळ्यातील साखळ्यांना त्या जनावराच्या ओळख क्रमांकाशी संबंधित एक क्रमांकित टॅग जोडलेला असतो.
३) साखळी किंवा दोरी मानेभोवती लावताना जनावराच्या डोक्यावरून न सरकण्या इतपत घट्ट असावी, परंतु लहान जनावरांना सहज श्‍वास घेता येईल आणि त्यांची वाढ होईल इतकी सैल असावी.
४) गळ्यात साखळ्या लावायला सोप्या असतात. जनावरांना वेदना देत नाहीत. त्या बऱ्यापैकी दिसतात.

फायदे :
१) गळ्यात साखळ्या लावायला सोप्या असतात, जनावरांना वेदना होत नाही.

तोटे :
१) वाढत्या जनावरांची वारंवार तपासणी न केल्यास, साखळी खूप घट्ट झाल्याने जनावरे गुदमरतात.
२) साखळ्या कायमस्वरूपी राहत नाहीत. जनावरांना जेव्हा एकत्र केले जाते तेव्हा गळ्यातील साखळ्या पाहणे कठीण होऊन जाते.

मायक्रो चिप ः
१) मायक्रो चिप ही जनावरे ओळखण्याची नवीन पद्धत आहे.
२) कान किंवा शेपटीत मायक्रोचीप बसवतात. यामुळे मालकी किंवा जनावरे कोणत्या ठिकाणची आहेत याची कायमस्वरूपी ओळख होऊ शकते.
- पशुतज्ज्ञ या पद्धतीची शिफारस करतात, कारण जेव्हा मायक्रो चिप बसविताना जनावरांना वेदना होत नाही.
- मायक्रो चिप बसविल्यानंतर ती योग्यरीत्या कार्य करत आहे याची खात्री करण्यासाठी स्कॅन करणे आवश्यक आहे. काही पशुधन प्रदर्शनात मायक्रो चिप आवश्यक असते.

मायक्रो चिपिंग करण्याची प्रक्रिया :
- हायपोडर्मिक सुई वापरून जनावराच्या त्वचेखाली मायक्रो चिप बसवली जाते.

फायदे :
१) मायक्रो चिप्स कायमस्वरूपी असतात. जनावरांना वेदना होत नाही.

तोटे :
१) मायक्रो चिप जनावरांचा मांसामध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता असते.
२) मायक्रो चिप बसविण्यासाठी विशेष उपकरणाची आवश्यक असते.
---------------------------------------------------------
संपर्क ः डॉ. प्रेरणा घोरपडे, ९८३३३०४७२९
(सहायक प्राध्यापक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, आरे कॉलनी, गोरेगाव, मुंबई)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com