
Nashik News : गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या. नदीपात्रात होणारे अतिक्रमण रोखावे तसेच नदीपात्रात सांडपाणी मिसळणार नाही यासाठी करावयाच्या ठोस उपाययोजनांना गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी यंत्रणांना दिले.
गोदावरी नदी प्रदूषणाबाबत नियुक्त समितीची डॉ. गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख तसेच राजेश पंडित, निशिकांत पगारे, जगबीर सिंग हे अशासकीय सदस्य उपस्थित होते.
डॉ. गेडाम म्हणाले, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व यंत्रणांनी कार्यवाही करावी. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी विविध यंत्रणांनी त्यांची जबाबदारी वेळेत पार पाडणे आवश्यक आहे. नदीतील पाणवेली काढण्याबाबत सर्व पर्यायांचा विचार व्हावा.
यांत्रिक पद्धतीने पाणवेली काढणे अथवा मनुष्यबळ वापरून संबंधित नदी क्षेत्रातील प्राधिकरणाकडे ती जबाबदारी सोपविणे यासह इतरही पर्यायाबाबत महानगरपालिका, जिल्हा परिषद, नाशिक महानगरपालिका विकास प्राधिकरण, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आदी यंत्रणांनी विचार करावा.
नदीपात्रात काही व्यावसायिक आस्थापनांकडून कपडे धुण्यासाठी काही खासगी यंत्रणांना कामे दिली जातात. ही यंत्रणा नदीपात्रात कपडे धुवून नदीपात्र प्रदूषित करण्याची कामे करत आहेत. महानगरपालिका आणि पोलीस यंत्रणेने अशा खासगी यंत्रणेवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील मलनिःस्सारण प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने गतीने कार्यवाही करावी. प्रकल्प पूर्ण करण्यात येणाऱ्या सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय बाबी तसेच ना हरकत प्रमाणपत्र यांची पूर्तता करावी, असे निर्देशही डॉ. गेडाम यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
नदी किनारी अतिक्रमण नको
औद्योगिक क्षेत्रातील होणाऱ्या प्रदूषणाबाबत ते उभारण्यात येणारा औद्योगिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करावी. त्या क्षेत्रातील रहिवास क्षेत्रासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत महापालिकेला एमआयडीसीने सहकार्य करावे. नदीकिनारी मोकळ्या जागेत जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांनी विविध उपक्रम राबवावेत. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी.
नदी किनारी कोणत्याही प्रकारे अतिक्रमण होणार नाही आणि हा परिसर प्रदूषित होणार नाही यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. गेडाम यांनी या वेळी सांगितले. या वेळी विविध यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीबद्दल या बैठकीत चर्चा झाली. अशासकीय सदस्य श्री. पंडित, श्री. पगारे आणि श्री. सिंग यांनीही नदी प्रदूषणमुक्तीच्या अनुषंगाने आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने विविध मुद्दे मांडले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.