
डॉ. विशाल गमे, स्मिता प्रचंड
Soil Health Improvement: आहारामध्ये पोषणाच्या दृष्टीने जशी कडधान्य पिके महत्त्वाची आहेत, तशीच ती जमिनीसाठीही महत्त्वाची आहेत. कारण या पिकांच्या मुळांवरील नत्राच्या गाठींद्वारे जमिनीचा पोत टिकून राहण्यास मदत होते. प्रामुख्याने खरीप व रब्बी हंगामात तूर, मूग, उडीद, मटकी, चवळी, हरभरा इ. कडधान्य पिकांची लागवड केली जाते.
उन्हाळी हंगामात मूग, उडीद व चवळी ही पिके लावली जातात. म्हणजेच फेरपालटासाठी विविध हंगामांमध्ये या पिकांची लागवड केली जाते. सध्या उन्हाळी हंगामाची सुरुवात होत आहे. सिंचनाची थोडीफार सोय असलेल्या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कडधान्य पिकांची लागवड फायदेशीर ठरू शकते. ही कमी कालावधीची पिके असून, कमी काळात चांगले उत्पादन मिळू शकते.
जमीन : कडधान्य पिकांकरिता मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य असते. क्षारयुक्त, उथळ पाणथळ तसेच उतारावरील हलक्या जमिनीत या कडधान्य पिकांची लागवड करू नये.
वेळेवर पेरणी : उन्हाळी मूग, उडीद व चवळीची पेरणी शक्यतो १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान करावी. त्यापेक्षा अधिक उशीर केल्यास उशीर केल्यास या पिकांचा फुलोरा जास्त तापमानामध्ये येतो. त्याचा विपरीत परिणाम शेंगा लागणे व भरणे यावर होतो. पीक पक्वतेच्या कालावधीत वळवाच्या पावसाची शक्यता राहते. त्यातून पिकाचे नुकसान होऊ शकते. म्हणून या पिकांची लागवड वेळेवर करावी.
रोपांची योग्य संख्या : अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी हेक्टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवली पाहिजे. त्यासाठी १५ ते २० किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. मूग व उडीद पिकाची दोन ओळींमध्ये ३० सेमी व दोन रोपांमध्ये १० सेमी अंतर ठेवावे. चवळीसाठी दोन ओळींमध्ये ४५ सें.मी. व दोन रोपांमध्ये १० सें.मी अंतर ठेवावे.
विभागनिहाय योग्य वाणांची निवड : आपल्या विभागासाठी शिफारस केलेल्या वाणांचीच निवड करावी. कारण हे वाण त्या त्या वातावरणानुसार चाचण्या घेऊन तपासलेले असतात.
नत्र स्थिरीकरणासाठी बीजप्रक्रिया
कडधान्य पिकांच्या मुळांवर असलेल्या ग्रंथीमुळे जमिनीतील पाणी आणि हवेतील नत्र शोषून घेऊन त्याचा उपयोग पिकांच्या वाढीकरिता केला जातो. त्यासाठी ऱ्हायझोबिया नावाचे विशिष्ट प्रकारचे जिवाणू काम करतात. हे जिवाणू जमिनीत वावरत असले तरी जमिनीतील नत्र शोषू शकत नाही. त्याच जमिनीत कडधान्य पिकांची लागवड केल्यामुळे ते कार्यक्षम होतात.
कडधान्यांच्या प्रकारानुसार नत्र ग्रंथींचा आकार लहान मोठा असतो. तसेच त्यात होणारे जिवाणू वेगवेगळ्या प्रकारचे असतात. विशेषतः पीक फुलोऱ्यात असताना नत्र शोषून घेण्याची क्रिया अधिक असते. दाणे भरण्याच्या वेळी ग्रंथींचे कार्य शिथिल होऊ लागते. प्रत्येक कडधान्य पिकासाठी पेरणीपूर्वी योग्य प्रकारच्या जिवाणूंचा बीजप्रक्रियेसाठी वापर करावा. कडधान्य पिकात नत्र शोषून घेण्याचं प्रक्रिया १५ दिवसांनंतर सुरू होते, त्यामुळे सुरुवातीच्या वाढीकरिता पिकाला २५ किलो नत्र देण्याची शिफारस केलेली असते. हे लक्षात घेऊन नत्रयुक्त खताचा वापर करावा.
तिहेरी फायदे
कडधान्य पिकांची झुपकेदार वाढ होत असल्याने जमिनीवर सावली राहते. त्याखाली हवा खेळती राहिल्याने सूक्ष्म जिवांच्या वाढीला चालना मिळते. यामुळे जमिनीची संरचना सुधारते. कणांचा आकार व घनता कमी झाल्याने जमीन भुसभुशीत होते. तिच्या प्राकृतिक गुणधर्मात सुधारणा होऊन अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
कडधान्य पिकामध्ये पाला मोठ्या प्रमाणात जमिनीत पडत असतो. तो कुजण्याची क्रिया कर्ब व नत्राच्या प्रमाणावर अवलंबून असते. मात्र कडधान्य पिकामध्ये स्थिर झालेल्या नत्राने या पालापाचोळ्यातील कर्बाचे रूपांतर सेंद्रिय कर्बात रूपांतर होते. या शिल्लक राहिलेल्या नत्र आणि सेंद्रिय कर्बाचा फायदा पुढील पिकांना होत असतो. म्हणूनच फेरपालटामध्ये कडधान्य पिकांचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे. पालापाचोळा पडल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहतो.
या पिकांच्या काढणीनंतरही भरपूर प्रमाणात अवशेष शिल्लक राहतात. ते लहान तुकडे किंवा कुट्टी करून गाडल्यास जमिनीत आणखी सेंद्रिय पदार्थांची भर पडते. सूक्ष्म जिवाणूंना अन्न उपलब्ध झाल्यामुळे त्यांची संख्या वाढते.अलीकडे सेंद्रिय खतांची उपलब्धता कमी होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.