Agriculture Technology : कापूस उत्पादनवाढीसाठी फर्टिगेशन, संरचना व्यवस्थापन तंत्र

Agriculture Management : अकोला येथील विद्यापीठ प्रक्षेत्रावर घेतलेल्या तीन वर्षांच्या सलग प्रयोगामध्ये ठिबक सिंचन, १२६ टक्के अधिक शिफारशीत खतमात्रा फर्टिगेशनद्वारे चार वेळा विभागून देणे आणि गळ फांदी कापणे, शेंडे खुडणे अशा संरचना तंत्राच्या वापरातून शेतकऱ्यांना २०.३८ टक्के उत्पादन वाढ मिळू शकत असल्याचे समोर आले आहे.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon
Published on
Updated on

डॉ. संजय काकडे, डॉ. विलास खर्चे

Indian Agriculture : बीटी कापूस वाणांचा वापर सुरू झाल्यापासून योग्य व्यवस्थापनातून शेतकरी चांगले उत्पादन घेऊ लागले आहेत. मात्र अनेक शेतकरी हे केवळ खतांचा अतिवापरातून उत्पादनात वाढ मिळविण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. संरक्षित ओलित आणि अन्नद्रव्यांच्या वापरातून पिकाची कायिक वाढ जास्त होण्याचा धोका असतो. नुसतीच कायिक वाढ अधिक झाल्यास पिकाची कालावधी वाढतो.

तसेच फूल, पात्या व बोंड गळ होऊन कापूस पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी राहण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी कापूस पिकाच्या संरचनेत बदल करण्याची आवश्यकता असते. त्या अनुषंगाने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली कापूस संशोधन विभागातील कृषी विद्यावेत्ता व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय काकडे यांनी कापूस संशोधन प्रक्षेत्रावर सलग तीन वर्षे प्रयोग केले.

या प्रयोगामध्ये काही ठरावीक कालावधीत गळ फांद्या म्हणजेच कायिक फांद्या कापणे, कापूस पिकाच्या कालावधीनुसार किंवा वाढीनुसार (उंचीनुसार) शेंडे खुडणे यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. मजुरांअभावी पर्याय देण्याच्या उद्देशाने वाढरोधक संजीवकाच्या वापराचेही प्रयोग करण्यात आले.

तीन वर्षांच्या प्रयोगामध्ये या तंत्रज्ञानाच्या वापरातूनच कापूस पिकाच्या उत्पादनामध्ये भरीव वाढ होत असल्याचे दिसून आले. नुकत्याच ७-९ जून दरम्यान अकोला येथील विद्यापीठामध्ये महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांच्या संयुक्त संशोधन सभेमध्ये या संशोधन निष्कर्षांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ही संशोधन शिफारस राज्यातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे.

Agriculture Technology
Agriculture Technology : तंत्र जाणले यश हाती आले

...अशी केली प्रयोगाची आखणी

मागील दोन- तीन वर्षांपासून ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यांपर्यंत पाऊस पडत आहे. परिणामी कापसाची कायिक वाढ जास्त होते. त्याचा परिणाम होऊन उत्पादनात अपेक्षित वाढ दिसून येत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या सातत्याने तक्रारी येत होत्या. ही शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता २०२०-२१ ते २०२३-२४ या तीन वर्षांतील खरीप हंगामामध्ये प्रयोगाची रचना करण्यात आली.

प्रयोगाची उद्दिष्टे

कापूस पिकाची जास्त होणारी कायिक वाढ रोखणे.

कापूस पिकाच्या संरचना व्यवस्थापनातील गळ फांद्या कापणे, शेंडे खुडणे इ. उपायांची कापूस पिकाच्या वाढ, बोंडाचे वजन व कापसाच्या गुणधर्मावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे.

पिकाच्या संरचना व्यवस्थापनाचा विविध बीटी वाणांवर होणारा परिणाम अभ्यासणे.

तीन वर्षांच्या प्रयोगांतील तांत्रिक बाबी

कपाशीचे विद्यापीठ निर्मित बीटी वाण : पीडीकेव्ही-जेके एएल -११६ (बीजी -२), पीकेव्ही हायब्रीड -२ (बीजी-२)

खत व्यवस्थापन : शिफारशीत १०० टक्के नत्र व पालाश, शिफारशीत १२५ टक्के नत्र व पालाश

संरचना व्यवस्थापन

शेतकऱ्यांची प्रचलित पद्धत.

पेरणीनंतर ६० दिवसांनी गळ फांद्या कापणे व ७५-८० दिवसांनी शेंडे खुडणे. याला पर्यायी मार्ग म्हणून -

पेरणीनंतर ६० दिवसांनी गळ

फांद्या कापणे व ७५-८० दिवसांनी मेपीक्वॉट क्लोराइड या वाढनियंत्रकाची फवारणी. (प्रमाण ः १ मिली प्रति लिटर)

७५-८० दिवसांनी मेपीक्वेट क्लोराइड या वाढनियंत्रकाची फवारणी. (प्रमाण ः १ मिलि प्रति लिटर)

लागवड : १० जून २०२१, २१ जून २०२२, २८ जून २०२३

लागवडीची पद्धत : बियाणे टोकन पद्धत (१२० × ४५ सेंमी. - ४ फूट × १.५ फूट)

ठिबक सिंचनाची मांडणी : इनलाइन ठिबक, १६ मिमी. इनलाइन ठिबक नळी (४ लिटर प्रति तास क्षमता), दोन ड्रीपरमधील अंतर ४० सेंमी, एका ओळीवर एक ठिबक नळी या प्रमाणे मांडणी.

अन्नद्रव्य व्यवस्थापन (फर्टीगेशन) : नत्रयुक्त खतासाठी युरिया आणि पालाशसाठी पांढरे म्युरेट ऑफ पोटॅशचा वापर. स्फुरदयुक्त खत जमिनीतून शिफारशीप्रमाणे.

खतमात्रा : १२०:६०:६० किलो नत्र, स्फुरद, पालाश / हेक्टरी.

रासायनिक खतांची विभागणी : पीकवाढीच्या अवस्थेनुसार ३० दिवसांच्या अंतराने ४ वेळा विभागून.

कीड व रोग नियंत्रण : विद्यापीठ शिफारशीप्रमाणे.

Agriculture Technology
Agriculture Spraying Technology : फवारणीचे प्रकार, पद्धती अन् तंत्रज्ञान

मान्यताप्राप्त संशोधन शिफारस

मध्यम कालावधीच्या बीटी कपाशीचे अधिक उत्पादन, आर्थिक मिळकत, पाणी व खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे शिफारशीच्या १२५ टक्के नत्र (१५० किलो/हे.), व पालाश (७५ किलो/हे.) चार वेळा विभागून (तक्ता १ नुसार) आणि ७५ किलो स्फुरद पेरणीसोबत द्यावे. पेरणीनंतर ६० दिवसांनी गळफांद्या (कायिक फांद्या) कापण्याची तसेच ७५-८० दिवसांनंतर शेंडा खुडण्याची शिफारस करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन व उत्पन्नामध्ये वाढ साधावी.

रासायनिक खतमात्रा खताचा हप्ता पेरणीनंतर दिवस

२० टक्के शिफारशीत नत्र व पालाश (३० कि.नत्र + १५ किलो पालाश) पहिला पेरणीच्या वेळी.

३० टक्के शिफारशीत नत्र व पालाश (४५ कि.नत्र + २२.५ किलो पालाश) दुसरा पेरणीनंतर ३० दिवसांनी.

३० टक्के शिफारशीत नत्र व पालाश (४५ कि.नत्र + २२.५ किलो पालाश) तिसरा पेरणीनंतर ६० दिवसांनी.

२० टक्के शिफारशीत नत्र व पालाश (३० कि.नत्र + १५ किलो पालाश) चौथा पेरणीनंतर ९० दिवसांनी.

एकूण ४ हप्ते चार वेळा विभागून.

ठिबक सिंचन, फर्टिगेशन व कापूस पीक संरचना यावर आधारीत तंत्रज्ञान चारही विद्यापीठाच्या संयुक्त संशोधन सभेमध्ये मंजूर झाले असून, शिफारस म्हणून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या शिवारफेरीमध्ये विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर ते शेतकऱ्यांना पाहता येईल.
डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ.

प्रयोगाचे निष्कर्ष

२०२०-२१ ते २०२३-२४ या तीन वर्षांत केलेल्या या प्रयोगाचे निष्कर्ष पुढील प्रमाणे...

पीडीकेव्ही-जेके एएल -११६ (बीजी -२) या वाणामध्ये पीकेव्ही हायब्रीड -२च्या (बीजी-२) तुलनेत प्रति हेक्टरी कापूस अधिक उत्पादन, अन्य वाढ घटक व आर्थिक उत्पन्न मिळाले. या वाणामध्ये पाणी वापर कार्यक्षमता व खतांची कार्यक्षमता अधिक आढळून आली.

अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये शिफारशीत १२५ टक्के खतमात्रा पीक वाढीच्या अवस्थेनुसार चारवेळा विभागून दिल्यास १०० टक्के खत मात्रेच्या तुलनेत पीक उत्पादनाच्या दृष्टीने सरस आढळून आली.

कापूस पीक संरचना व्यवस्थापन तंत्रामध्ये ६० दिवसांनंतर गळ फांद्या कापणे, तसेच ठरावीक कालावधीनंतर (७५-८० दिवसांनी) कापूस पिकाचे शेंडे खुडणे या तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या क्षेत्रामध्ये कपाशीचे ३९.९९ क्विंटल उत्पादन मिळाले. तुलनेसाठी शेतकऱ्यांच्या प्रचलित पद्धतीमध्ये ३१.८४ क्विंटल उत्पादन मिळाले. म्हणजेच या तंत्रज्ञानाद्वारे प्रचलित पद्धतीपेक्षा ८ क्विंटल (२०.३८ टक्के) अधिक कापूस उत्पादन मिळाले. या प्रयोगामध्ये बोंडाची संख्या तसेच बोंडाचे वजन व फळ फांद्यांची लांबी इत्यादी बाबींवर सुद्धा सकारात्मक बदल दिसून आला.

मेपीक्वॉट क्लोराइड या वाढनियंत्रकाची फवारणी करून पिकाची कायिक वाढ रोखण्याच्या प्रयोगातही उत्पादनात वाढ मिळाली. प्रचलित पद्धतीपेक्षा या तंत्राचा वापर केल्यामुळे हेक्टरी रु.२,४९,९७० उत्पन्न मिळाले. निव्वळ उत्पन्न हेक्टरी रु.१,६२,७९६ राहिले. त्यामुळे नफा : खर्चाचे गुणोत्तरही सरस (२.९२) आढळून आले.

डॉ. संजय काकडे, ९८२२२३८७८०

(कृषी विद्यावेत्ता, कापूस संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com