Summer Bajara : उन्हाळी बाजरी देतेय अर्थकारणास बळ

Bajara Cultivation : खानदेशातील उन्हाळी बाजरीखाली क्षेत्र अधिक असते. येथील बाजारपेठाही बाजरीसाठी प्रसिद्ध आहेत. अलीकडील काळात धान्य आणि चारा अशा दोन्ही अनुषंगाने बाजरीला चांगले दर मिळत आहेत.
Summer Bajara
Summer BajaraAgrowon

Millet Year : यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्ये वर्ष म्हणून साजरे होत आहे. बाजरी हे त्या वर्गातीलच पीक आहे. राज्यातील महत्त्वाच्या बाजरी पट्ट्यांपैकी खानदेशचा समावेश होतो. या भागात खरिपासह उन्हाळी हंगामातही बाजरी असते.

जळगाव जिल्ह्यात जळगावसह चोपडा, यावल, अमळनेर, भडगाव, जामनेर आदी भागांतील शेतकरी ठिबक सिंचनाद्वारे उत्पादन साध्य करीत आहेत. धुळे जिल्ह्यात शिरपूर, धुळे व त्यातही साक्री व शिंदखेडा तालुक्यांत क्षेत्र अधिक आहे. शिंदखेड्याची बाजरी, तर नाशिक, पुण्यापर्यंत प्रसिद्ध आहे.

आकाराने बारीक, कडकपणा या बाजरीस असतो. बाजरीत संकरित वाण अधिक प्रमाणात दिसून येतात. पेरणीचे नियोजन डिसेंबरपासून सुरू होते. सुमारे ९५ ते १०० दिवसांत पीक हाती येते. त्यामुळे शेतकरी फेब्रुवारीच्या मध्यातही पेरणी करतात.

खानदेशात केळी, पपई, कापसाची शेती विविध नद्यांच्या काठावर अधिक आहे. साहजिकच तापी, गिरणा, पांझरा, अनेर नदीच्या क्षेत्रात पेरणी बऱ्यापैकी असते. काळ्या कसदार जमिनीत एकूण पाच सिंचनामध्ये पीक हाती येते. बाजरीच्या बेवडवर कापूस, केळी पीक जोमात येते असे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत.

Summer Bajara
Crop Damage : पावसामुळे ज्वारी, बाजरी, गहू, भाजीपाल्याचे नुकसान

...हे बाजार आहेत प्रसिद्ध

मागील तीन वर्षे उन्हाळी बाजरीचे दर आश्‍वासक व स्थिर आहेत. बाजरीसाठी खानदेशात धुळ्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा), धुळे, शिरपूर, जळगावमधील अमळनेर व चोपडा, चाळीसगाव येथील बाजार प्रसिद्ध आहेत. येथे एप्रिलच्या अखेरीस सुरू झालेली बाजरीची आवक जूनच्या सुरुवातीपर्यंत असते.

चोपडा व अमळनेर येथील बाजारात यंदा एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात आवक प्रति दिन सरासरी दोन हजार क्विंटल झाली. किमान २३००, कमाल २८०० व सरासरी २५०० रुपये प्रति क्विंटल दर राहिले.

चालू महिन्यात आवक प्रति दिन सरासरी अडीच हजार क्विंटल राहिली. आवक वाढली तसे दर काहीसे घटले. चोपडा व अमळनेर बाजारात किमान १८००, कमाल २२५० रुपये, तर सरासरी २००० रुपये दर राहिले.

ठळक बाबी

-काही खरेदीदारांकरवी बाजरीची थेट किंवा शिवार खरेदीही. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचतो.

-बाजरीची पाठवणूक खानदेशातून नागपूर, पुणे, मुंबई येथील बाजारांसह गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे.

-खरिपाच्या तुलनेत उन्हाळी बाजरीचा हंगाम मागील चार वर्षे बरा राहिला.

-लोहाचे प्रमाण चांगले. त्यामुळे महिलांच्या आहारात समावेशासाठी डॉक्टरांकडून बाजरीला आग्रह.

चाऱ्याचेही आश्‍वासक दर

उन्हाळी हंगामात चाऱ्याची नेहमीच टंचाई जाणवते. नेमक्या याच महत्त्वाच्या काळात बाजरीचा चारा खानदेशात अधिक उपलब्ध होतो. या कारणासाठी अनेक शेतकरी बाजरीची पेरणी करतात. त्याची बाजरीची कुट्टी आकाराने लहान, खाण्यास गुळचट, सकस असते. त्यात मिठाचे मिश्रण करून पशुधनाला खाऊ घातला जातो.

हिवाळ्यातही कुट्टी खाऊ घातल्याने पशुधनास ऊब मिळते. बाजरीचा कडबा उंचीला पाच ते साडेपाच फूट उंच असतो. कडब्याला दोन वर्षे दरही स्थिर राहिले आहेत. एकरी २००, २२० ते ३०० पेंढ्यांपर्यंत उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे. त्याचे दर १८०० रुपये व यंदा, तर त्याही पुढे गेले आहेत.

एकरी सहा हजार रुपये असेही दर आहेत. हा कडबा बाजार समितीत येत नाही. त्याची थेट किंवा शिवार खरेदी होते. त्यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च व अन्य त्रास वाचतो. खानदेशातून बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर, मध्य प्रदेश, गुजरातमधील पशुपालक बाजरी कडब्याची खरेदी करतात.

सन २०१९ ते यंदाच्या वर्षापर्यंत- १३ हजार ते साडेचौदा हजार हेक्टर.

मिळालेले दर (प्रति क्विंटल व रू.)

वर्ष - किमान- कमाल- सरासरी

२०२१- १५००- २००० - १८००

२०२२- १६००- २१०० - १९००

२०२३- १८००- २७००- २४००

Summer Bajara
Bajari Variety: पौष्टिक गुणधर्मांनी युक्त बाजरी वाणांचा होतोय प्रसार

बाजरीचा फायदा तिहेरी

माचले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील दिलीप हिरालाल पाटील यांचे ३० एकर क्षेत्र आहे. कापसानंतर रिकाम्या झालेल्या काळ्या कसदार शेतात फेब्रुवारीत ते सुमारे चार एकरांवर बाजरी घेतात. या पिकात त्यांचा आठ वर्षांचा अनुभव आहे. घरी धान्य, जनावरांना चारा तर केळीला चांगले बेवड असा तिहेरी फायद्यांमुळे ते बाजरीला पसंती देतात.

पेरणी व त्यानंतर २० दिवसांनी रासायनिक खत देतात. पाट पद्धतीने एकूण पाच वेळेस सिंचन करतात. बाजरीचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी फारसे श्रम घ्यावे लागत नाहीत.

एकरी १५ क्विंटलपर्यंत उत्पादन ते साध्य करतात. एकरी ११ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. गेली तीन वर्षे सरासरी दर प्रति क्विंटल १६०० रुपये तर गेल्या वर्षी दोनहजार रुपये दर मिळाला होता. एकरी २०० पेंढ्यांपर्यंत चारा मिळतो.

संपर्क - दिलीप पाटील, ९७६७२५८३०६

पाटील यांचेही समाधानकारक अनुभव

गाढोदे (ता. जि. जळगाव) येथील भगवान फकीरचंद पाटील यांची २५ एकर शेती असून, १० एकर ते ‘लीज’वर करतात. केळी व पपई ही त्यांची प्रमुख पिके आहेत. दरवर्षी सरासरी चार एकर बाजरी असते.

कपाशीनंतर रिकाम्या झालेल्या क्षेत्रात जानेवारीच्या अखेरीस ठिबकवर ते बाजरी घेतात. यंदा थोडी उशिरा पेरणी झाली. केली. पेरणी दाट केल्याने अधिक उत्पादन मिळते असे पाटील सांगतात. तणनियंत्रण एकदाच करावे लागते. फवारणीची फारशी गरज भासत नाही. दर पंधरा दिवसाआड वाफसा कायम राहील या पद्धतीने एकूण पाच वेळा सिंचन होते.

एकरी १४ ते १५ क्विंटल उत्पादन घेतात. गेल्या वर्षी सरासरी १८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. चारा एकरी ३०० पेंढ्यांपर्यंत उपलब्ध होतो. त्यास शेकडा कमाल चार हजारांपर्यंत दर यंदा मिळाले. बाजरीचे अवशेष जमिनीत गाडले गेल्याने जमीन सुपीकतेसाठी मदत होते. काळ्या मातीत हे पीक चांगले येत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

भगवान पाटील, ९९२३७८२१९८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com