Bajari Variety: पौष्टिक गुणधर्मांनी युक्त बाजरी वाणांचा होतोय प्रसार

यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय ‘मिलेट्‍स’, अर्थात भरडधान्ये वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर संभाजीनगर येथील अखिल भारतीय समन्वयित बाजरी संशोधन प्रकल्पाद्वारे विकसित बाजरीच्या लोह व जस्ताने युक्त दोन वाणांचा देशभरात प्रसार होत आहे.
bajra health benefits
bajra health benefitsAgrowon

Bajari Varieties: सन २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य- भरडधान्य वर्ष (millet year) (मिलेट्‍स) म्हणून साजरे केले जाते आहे. याच ‘मिलेट्‍स’मधील महत्त्वाचे पीक म्हणजे बाजरी. अवर्षण प्रवण भागात येणाऱ्या व शेतकऱ्यांचे महत्त्वाचे पीक असलेल्या बाजरीचा क्षेत्र विस्तार व मूल्यवर्धनासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न सुरू आहेत.

राज्यात औरंगाबाद, नगर, धुळे, पुणे, सोलापूर, बीड आणि नाशिक जिल्ह्यांत या पिकाची सर्वाधिक लागवड पाहण्यास मिळते. अलीकडील काही वर्षांत नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला.

त्यामुळे उच्च पोषणतत्त्वे असूनही भरडधान्यांखालील क्षेत्र घटले. मात्र नवे संशोधन, तंत्र व वाण व ग्राहकांकडून मागणी याद्वारे बाजरीसारख्या पिकाला पुन्हा चांगल्या प्रकारे चालना मिळू लागली आहे.

जैव संपृक्त वाणांवर संशोधन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) अंतर्गत संभाजीनगर (पूर्वीचे नाव औरंगाबाद) येथे अखिल भारतीय समन्वयित बाजरी संशोधन प्रकल्प कार्यान्वयित आहे.

येथील शास्त्रज्ञांनी जोधपूर येथील प्रकल्प केंद्र आणि इक्रिसॅट (हैदराबाद) यांच्यासोबतच्या संयुक्त संशोधनातून बाजरीचे दोन जैवसंपृक्त (बायो फोर्टिफाइड) संकरित वाण विकसित केले आहेत. राष्ट्रीय स्तरावर ते शिफारसित झाले आहेत.

...असे आहेत हे वाण

-एएचबी-१२०० (२०१८ मध्ये प्रसारित)

-लोहाचे प्रमाण ८७ मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम आहे. (नेहमीच्या वाणात ते ४० ते ४५ मिलिग्रॅम असते)

-जस्ताचे प्रमाण ३७ मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम.

-उत्पादनक्षमता- ३० ते ३२ क्विंटल प्रति हेक्टरी

bajra health benefits
Millet Cultivation : ‘लघू तृणधान्यवर्गीय पिकांची लागवड करा’

-एएचबी-१२६९ (२०१९ मध्ये प्रसारित)

-लोह- ९१ मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम.

-जस्त- ४३ मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम.

-उत्पादनक्षमता- ३२ ते ३४ क्विं. प्रति हेक्टरी

सामाईक गुणधर्म

- गोसावी व करपा रोगास प्रतिकारक.

-घट्ट कणीस व टपोरे दाणे.

-रंग हिरवट. फुटव्यांचे प्रमाण अधिक.

-प्रति १००० दाण्यांचे वजन १५ ते १८ ग्रॅम.

उन्हाळी हंगामासाठी चाचण्या

दोन्ही जैवसंपृक्त वाणांची खरीप हंगामासाठी शिफारस झाली आहे. उन्हाळी हंगामासाठी अद्याप शिफारस नसली, तरी सुमारे ३० ते ४० शेतकऱ्यांकडे या वाणांच्या चाचण्या उन्हाळी हंगामासाठी सुरू आहेत. या दोन्ही वाणांचे पीक प्रात्यक्षिक खरिपात शेतकऱ्यांकडे घेण्यात येत आहे. यंदाच्या खरिपात या वाणांचा उपयोग शेतकऱ्यांना करता येईल.

ठळक बाबी

-कुलगुरू डॉ. इंद्र मणी, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर व संचालक (विस्तार) डॉ. देवराव देवसरकर यांच्या मार्गदर्शनातून विद्यापीठाच्या केंद्रांत १० हेक्‍टरवर बीजोत्पादन कार्यक्रम.

-समन्वतयि प्रकल्पांतर्गत २०१९-२० पासून संभाजीनगर जिल्ह्यांतील विविध गावांत घेतली आद्यरेषा पीक प्रात्यक्षिके. त्यात संकरित वाणाचे उत्पादन २० ते २५ टक्‍के जास्त आढळले. राज्याबाहेरही दिले बियाणे

-राज्यातील विविध कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके), तसेच परराज्यांतही ‘केव्हीकें’च्या माध्यमातूनच कोइमतूर, मदुराई, दिल्ली, ग्वाल्हेर आदी ठिकाणीही दोन्ही जैवसंपृक्त संकरित वाणांच्या बियाण्यांचा पुरवठा.

-संभाजीनगर येथील हे प्रकल्प केंद्र १९७५ पासून कार्यरत आहे. प्रकल्पाचा २०१९, २०२० व २०२२ या वर्षी उत्कृष्ट संशोधन प्रकल्प म्हणून राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.

शेतकरी अनुभव

तिडका (ता. सोयगाव, जि. संभाजीनगर) येथील ईश्‍वर सपकाळ यांना ८ ते १० वर्षांपासून बाजरी पिकाचा अनुभव आहे. दरवर्षी दहा एकरांवर हे पीक असते. यंदा सूर्यफूल वाढविल्याने बाजरी चार एकरांवरच आहे. त्यांनी यंदा प्रथमच एक एकरात एएचबी-१२०० या वाणाची एक एकरात लागवड केली आहे.

सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत पीक असून, त्याची अवस्था चांगली असल्याचे ते सांगतात. दरवर्षी कापूस काढणीनंतर फेब्रुवारीत त्यांची लागवड असते. एकरी १५ ते २० क्विंटलपर्यंत उत्पादन दरवर्षी मिळते असे सपकाळ सांगतात. एकरी उत्पादन खर्च १५ हजारांपर्यंत येतो.

खानदेशातील पाचोरा हे धान्याचे मोठे मार्केट असून तेथे विक्री होते. अलीकडील वर्षांत क्विंटलला २२००, १८०० ते १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. यंदा सध्या ३२०० रुपये दर सुरू असल्याचे ते म्हणाले. व्यापारी जागेवर येऊनही खरेदी करतात.

यंदा मागील वर्षीची १० क्विंटल बाजरीची तीन हजार रुपये दराने दुकानदारास विक्री केली. बाजरी हे कमी खर्चाचे आणि कमी कालावधीत चांगले उत्पन्न व पौष्टिकता देणारे पीक आहे. दरवर्षी मजुरांना धान्य म्हणूनही ते देण्यात येते असे सपकाळ यांनी सांगितले.

bajra health benefits
Millet Year : हिंगोलीत प्रभार फेरीद्वारे तृणधान्यविषयक जनजागृती

थेट ग्राहकांना पुरवठा

लाखेगाव, ता. पैठण येथील निवृत्ती जनार्दन कागदे म्हणाले, की तीन वर्षांपासून एएचबी-१२०० या वाणाचे प्रात्यक्षिक घेत आहोत. वीस गुंठ्यांपासून सुरू केलेले क्षेत्र दोन एकरांपर्यंत नेले आहे. त्यातून उत्पादनात २० ते २५ टक्‍के वाढ झाली आहे. ग्राहकांची मागणी चांगली असल्याने ग्राहकांना एक किलो पॅकिंगमधून चमकदार बाजरीचा क्विंटलला तीन हजार रुपये दराने

पुरवठा करतो. ‘ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात ग्राहक जोडण्यासाठी चांगला फायदा झाला. लाखेगावचे रंजीत चुंगडे यांच्याकडे यंदा तीन एकरांत उन्हाळी बाजरी आहे. एकरी १२ ते १५ क्‍विंटलपर्यंत उत्पादन त्यांना मिळाले आहे.

खंडाळा (ता. वैजापूर) येथील पांडुरंग सूर्यवंशी यांनी मागील खरिपात एएचबी १२०० वाण घेतले. त्यांना १६ गुंठ्यांत सात क्‍विंटल बाजरी झाली. पाच गोण्या घरी खाण्यासाठी ठेवून उर्वरित विकल्या.

प्रक्रियायुक्त पदार्थ

संभाजीनगर येथील केंद्राचे मुख्य उद्दिष्ट संशोधन, वाणनिर्मिती व उत्पादनाशी संबंधित आहे. मात्र बाजरीवर आधारित प्रक्रिया पदार्थांबाबत प्रबोधनही पाककृतींसह करण्यात येत आहे.

यामध्ये पापड्या, खारवडी, दलिया, लाडू, खिचडी, चटपट मसाला, बाजरा नट्‌स, शेव, खीर आदी पदार्थांचा समावेश आहे. संभाजीनगर येथील ‘सिद्धी उद्योजिका’, ‘ओम साई’ आदी महिला बचत गट राज्य, देशात व परदेशात यातील उत्पादनांची विक्री करीत आहेत.

डॉ. सूर्यकांत पवार, ९४२२१७८९८२

निवृत्ती कागदे, ९०९६४७४१९९

ईश्‍वर सपकाळ, ८२७५३२१३६३

बाजरीचा आहारात समावेश वाढवणे, प्रक्रियेच्या माध्यमातून मूल्यवर्धन, जैवसंपृक्त वाणांचा क्षेत्रविस्तार, बियाणे उपलब्ध करणे ही उद्दिष्टे ठेवून आम्ही प्रयत्नशील आहोत. आतंरराष्ट्रीय स्तरावर भरडधान्यांचे महत्त्व वाढल्याने शेतकऱ्यांसाठी ती मोठी संधी निर्माण झाली आहे.
डॉ. सूर्यकांत पवार, सहयोगी संचालक संशोधन, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, संभाजीनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com