Sujay Vikhe Election : निवडणुकीच्या मैदानात विखेंना दूध पोळलं; आता तरी धडा घेणार का?

Sujay Vikhe Patil Election Result 2024 : अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी जोडव्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय करतात. अहमदनगर जिल्ह्यात दुभत्या जनावरांची संख्या ६ लाखांच्या घरात आहे. तर दरवर्षी सुमारे ४८ लाख लीटर दुधाचं संकलन या जिल्ह्यातून केलं जातं.
Sujay Vikhe Election
Sujay Vikhe ElectionAgrowon

Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 : अहमदनगरच्या निकालानं भाजपला मोठा धक्का बसला. महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचा गड महाविकासआघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी काबीज केला. हातची जागा गेल्यानं भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता वाढल्याचं दिसतं.

महाराष्ट्रात महायुतीचे  ४५ हून अधिक उमेदवार निवडून येतील, असा भाजपच्या सर्वच नेत्यांकडून दावा करण्यात येत होता. पण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मात्र शेती प्रश्न, मराठा आरक्षण आणि दुष्काळाकडील दुर्लक्ष याचा भाजपला फटका बसेल, अशी शक्यता भाजपच्या गोटातील अनेकांनी बोलून दाखवली होती.

कांदा, सोयाबीन-कापूस प्रश्नांसोबतच दूधाचाही फटका

निवडणुकांच्या मैदानातील पराभवानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी "मला जबाबदारीतून मुक्त करा," असं म्हणत पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि त्याच वेळी कांदा, सोयाबीन-कापूस प्रश्नांचा 'थोडा' फटका बसल्याचं कबूल केलं.

पण कांदा, सोयाबीन आणि कापसासोबतच दूध प्रश्नानंही दक्षिण अहमदनगर मतदारसंघात भाजपला दणका दिला. त्याचं कारण दूध दराचा घोळ, दूध अनुदानाचं भिजत पडलेलं घोंगडं यात दडलेलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी जोडव्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय करतात. अहमदनगर जिल्ह्यात दुभत्या जनावरांची संख्या ६ लाखांच्या घरात आहे. तर दरवर्षी सुमारे ४८ लाख लीटर दुधाचं संकलन या जिल्ह्यातून केलं जातं.

त्यामुळं जिल्ह्याच्या राजकारण दुधाचा फॅक्टरही महत्त्वाचा आहे. राज्याचे पशूसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे आहेत. पण खाजगी दूध संघांचा मनमानी कारभार आणि राज्य सरकारची उदासीनता यामुळं दूध उत्पादक नाराज आहेत.

दूध उत्पादकांच्या नाराजीची कारणं

अहमदनगर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अनेकदा दूध प्रश्नांसाठी आंदोलनं केली. मंत्री विखे यांना निवेदनं दिली. पण मंत्री विखे यांनी त्यावर घोषणा करून बोळाच फिरवला. दूध प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घातलं नाही.

उलट फक्त घोषणा करायची आणि अंमलबजावणीत कच खायची, असा प्रकार मंत्री विखे यांच्याकडून केला गेला. दूध अनुदान तर गाजरच ठरलं. त्यात खाजगी दूध संघाकडून केल्या जाणाऱ्या दूध दराच्या कपातीवर मंत्री विखे यांची विधानंही तितकीच अतार्किक होती. त्यामुळं मंत्री विखे यांच्याबद्दल दूध उत्पादकांमध्ये नाराजी तयार झाली.

Sujay Vikhe Election
Mother Dairy Milk : अमूल पाठोपाठ मदर डेअरीची दूध दर वाढ

दुसरीकडे सुजय विखे यांनी कांदा निर्यातबंदी कायम असताना निर्यातबंदी उठवल्याची पुडी सोडून दिली होती. त्यामुळंही कांदा उत्पादकही विखे पिता-पुत्रावर नाराज होते. हीच नाराजी दूध आणि कांदा उत्पादकांनी या निवडणुकीत मतपेटीतून व्यक्त केली.

शेतकऱ्यांनी झलक दाखवली?

"आम्हाला गृहीत धरू नका. तुम्ही आमची मेहनत नासावली तर आम्ही तुम्हाला धडा शिकवू शकतो," याची झलक शेतकऱ्यांनी सुजय विखे यांच्या पराभवाच्या निमित्तानं दाखवून दिली. अर्थात सुजय विखे यांचा पराभव फक्त दूध उत्पादकांनी घडवला असं समजणं धाडसाचं ठरेल.

पण सुजय विखे यांचा मतदारांशी तुटलेला संपर्क, भाजपमधील अंतर्गत धुसफूस, महाविकास आघाडीची ताकद, शेतकऱ्यांची नाराजी आणि मंत्री विखे यांनी दूध उत्पादकांची केलेली निराशा याचा फटका सुजय विखे यांना बसला. त्यामुळं अहमदनगर मतदारसंघात दूध उत्पादकांचा फॅक्टरही निर्णायक ठरला. आणि त्याचा फायदा निलेश लंके यांना झाल्याचं दिसतं.

थोडक्यात, या निकालातून मंत्री विखे पाटील धडा घेत दूध उत्पादकांकडे लक्ष देतील की, वाऱ्यावर सोडून देतील, याकडे दूध उत्पादकांचं लक्ष लागून आहे. कारण अजूनही दूध उत्पादनात घट होऊनही दूध दरात कपात करण्याचा खाजगी दूध संघांनी धडका लावलेला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com