राजकुमार चौगुले/अभिजित डाके/एकनाथ पवार
कोल्हापूर/सांगली/सिंधुदुर्ग : या तीन जिल्ह्यांतील ऊस, भाजीपाला, द्राक्षासह भाजीपाल्याच्या हिरवीगार सुपीक शेतीत सध्या ‘महामार्ग’ नावाचे संकट उभे ठाकले आहे. आधीच कमी जमीन धारणा असलेल्या या भागातील ५ हजार एकर शेती धोक्यात येणार आहे.
भूमिहिन होण्याच्या भीतीने अस्वस्थ झालेल्या येथील शेतकऱ्यांस अन्न गोड लागेनासे झाले आहे. शेतकरी या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात पेटून उठला आहे, नुकसान भरपाई पेक्षा महामार्गच नकोच अशीच मागणी जोर धरताना दिसत आहे.
कोल्हापुरातील सहा तालुक्यांना फटका
जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड, आजरा या तालुक्यातील साठ गावांतून हा महामार्ग पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार आहे. यातील बहुतांशी तालुके हे बागायती आहेत. ऊस, भाजीपाल्यासह अनेक नगदी पिके येथे घेतली जातात. सध्या घोषित नव्या शक्तिपीठ महामार्गाव्यतिरिक्त नागपूर-रत्नागिरी महामार्गही होत आहे. यासाठी हजारो वृक्षांची कत्तल अधिक झालेली आहे.
या मार्गाला समांतर नवा शक्तिपीठ महामार्ग नियोजित केल्याने शेतकऱ्यांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. महामार्ग जाणाऱ्या गावात शेतकरी एकवटले आहेत. शिरोळ तालुक्यातील कोथळी, दानोळी, निमशिरगाव ही गावेही बागायती गावेही प्रकल्पग्रस्त होणार आहेत. महामार्गाचे पैसे मिळाले तरी या बदल्यात दुसरी शेती मिळेल का याची येथे चिंता आहे.
यापूर्वी शासनाचे रस्ते, महामार्ग, प्राधिकरण यासह विविध कारणासाठी शेतकरी व ग्रामस्थांची जागा हस्तांतर केल्यास त्यांना शासन चौपट भरपाई देत होते. मात्र आता होणाऱ्या जमीन हस्तांतरात शेतकऱ्यांना फक्त दुप्पट भरपाई देण्याचे शासनाचे आदेश आहेत. बागायती जमीन जाणार असल्याने या महामार्गाला विरोध मात्र वाढला आहे.
जिल्हानिहाय जमिनीचे संपादन (हेक्टर)
१) कोल्हापूर -
- तालुके - शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड, आजरा
- गावे - ६०
- शिरोळ- कोथळी, दानोळी, निमशिरगांव, चिपरी.
- हातकणंगले- तारदाळ, हातकणंगले, तिळवणी, साजणी, माणगांव, पट्टणकोडोली करवीर
- कागल - कागल ग्रामीण, व्हानूर, सिद्धनेर्ली, वडगांव, एकोंडी, बामणी, व्हनाळी, केनवडे, सावर्डे खु., सावर्डे बु., सोनाळी, कुरणी, निढोरी.
- करवीर - विकासवाडी, कणेरीवाडी, कणेरी, कोगील बु.. सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे, नेर्ली, खेबवडे.
- भुदरगड - आदमापूर, व्हनगुत्ती, वाघापूर, मडीलगे बु., कुर, मडीलगे खु., निळपण, दारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डे, पुष्पनगर, सोनारवाडी, मडुर, करडवाडी, शेळोली, पडखंबे, वेंगरूळ, सोनिर्ले, मेघोली, नवले, देवर्डे, करिवडे.
- आजरा - दाभिल, शेळप, परपोली, आंबार्डे, सुळेरान, किटवडे
- महामार्ग एकूण किलोमीटर - १२९
- एकूण जमीन: अंदाजे १२०० हेक्टर
२) सांगली -
तालुके - आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज
गावे -१९
- आटपाडी - शेटफळे
- कवठेमहांकाळ - घाटनांद्रे, तिसंगी- तासगाव - डोंगरसोनी, सिध्देवाडी-सावळज, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, गव्हाण, मणेराजुरी, सावर्डे, मतकुणकी, नागाव कवठे.
- मिरज - कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलवाडी.
महामार्ग एकूण किलोमीटर - अंदाजे ९०
एकूण जमीन अधिगृहण -अंदाजे ६०० हेक्टर
३) सिंधुदुर्ग -
- तालुके - सावंतवाडी,दोडामार्ग
- गावे - १०
- सावंतवाडी- आंबोली, बांदा, डेगवे, कावळेसाद, तांबोळी, असनिये, घारीप, उडेली, गेळे.
- दोडामार्ग- फुकेरी
- महामार्ग एकूण- ३७ किलोमीटर
-एकूण जमीन अधिगृहण - २२६ हेक्टर
सिंधुदुर्गातही विरोध
संभाव्य शक्तिपीठ महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेकडील एका कोपऱ्यातून थेट गोव्याला जात आहे. त्यामुळे सिंधुदुर्गचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व कमी होण्याची शक्यता अधिक आहे. या महामार्गासाठी जिल्ह्यातील दहा गावांतील २२६ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील आजऱ्यातून हा महामार्ग सिंधुदुर्ग येणार आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे.
त्यामुळे सद्या गोव्याला जाणारा पर्यटक हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्याला जातो. परंतु या महामार्गामुळे पर्यटकांना सिंधुदुर्गातील काही मोजक्या गावातून थेट गोव्याला जाता येणार आहे. त्यामुळे स्थानिकांकडुन या प्रकल्पाला विरोध होऊ लागला आहे. पर्यटनदृष्ट्या मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या महामार्गावरील डेगवे ते तांबोळी आणि असनिये ते फुकेरी येथे मोठे बोगदे प्रस्तावित करण्यात आले आहेत.
या महामार्गाला सिंधुदुर्गातील वनशक्ती संस्थेने या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. संस्थेचे स्टॅलिन दयानंद म्हणाले,‘‘या महामार्गाची गरज नसताना हा महामार्ग जिल्ह्यावर लादला जात आहे. निसर्गाची मोठी हानी त्यामुळे होणार आहे. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यासाठी हा महामार्ग विनाशकारी ठरणार आहे. वन्यजीव विस्थापित होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे आम्ही या प्रकल्पाला विरोध करणार असून गरज भासल्यास न्यायालयात आव्हान देऊ.’’
सांगलीत द्राक्ष पट्ट्याला हादरा
सांगली जिल्ह्यातील आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज या चार तालुक्यातील १९ गावातून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. या महामार्गामुळे अंदाजे ६०० हेक्टर शेतीचे अधिगृहण होणार आहे. आटपाडी, तासगाव आणि कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यातील शेतकरी कष्टाच्या जोरावर काटकसरीने द्राक्ष शेती करतात.
आठ ते दहा वर्षापूर्वी ताकारी, म्हैसाळ, टेंभू आणि आरफळचं पाणी शेतीला मिळाले, त्यामुळे बागायती क्षेत्र वाढले. चार तालुक्यातील २० हून अधिक गावातील शेती अधिग्रहण करून हा महामार्ग केला जाणार आहे. या चार तालुक्यातील एक एकरापासून ते दहा एकरापर्यंत शेतकऱ्यांची शेती आहे.
तर, मिरज तालुक्यात बहुतांश गावात ऊस आणि द्राक्ष बागा आहेत. तासगाव तालुका द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. महामार्गामुळे द्राक्ष पट्टा अशी ओळख नामशेष होणार असे चित्र आहे. अल्पभूधारक भूमिहीन होणार आहे. महामार्गासाठी अधिसूचना निघाल्यापासून जिल्ह्यातील १९ गावातील शेतकरी महामार्ग होवू नये यासाठी बैठका घेवू लागले आहेत. आजपर्यंत सुमारे ६००हून अधिक आक्षेप नोंदवून प्रशासनाकडे दिले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.