Solapur News : राज्यातील प्रमुख शक्तिस्थळे एकाच मार्गावर आणणे आणि ती एकमेकांना जोडण्याच्या उद्देशाने नागपूर-गोवा हा सहा पदरी शक्तिपीठ महामार्ग करण्यात येणार आहे. त्यासंबंधीची अधिसूचना जाहीर होताच महामार्ग जाणाऱ्या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील शेतकऱ्यांत अस्वस्थता वाढली आहे, भूसंपादनाआधीच या महामार्गाला विरोध होत आहे.
प्रामुख्याने बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी बागायती जमिनी देण्यास विरोध केला आहे. तशा हरकती प्रशासनाकडे नोंदवल्या आहेत. विशेष म्हणजे या महामार्गाच्या एकूण अंतरापैकी सर्वाधिक १५६ किलोमीटरचे अंतर एकट्या सोलापूर जिल्ह्यातून जात आहे.
८०२ किलोमीटर असणाऱ्या या महामार्गास तीन शक्तिपीठे आणि २ ज्योतिर्लिंगांसह सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, धाराशिवमधील तुळजापूरसारखी तीर्थक्षेत्रे जोडण्यात येणार आहेत. पर्यायी मार्ग असताना हा अट्टहास सरकार का करत आहे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
तीर्थ पर्यटनाच्या नावाखाली ग्रामीण भागाचा यात बळी जाणार असल्याने शेतकऱ्यांनी बागायती जमिनी देण्यास विरोध दर्शवला आहे. ज्या तालुक्यातील जमिनी या महामार्गासाठी संपादित होणार आहेत. त्या भागात द्राक्ष, केळी, डाळिंब, ऊस यांसारखी बागायती पिके आहेत. त्यामुळे हा विरोध वाढतो आहे.
आंदोलनाचा इशारा...
या महामार्गासाठी अधिसूचना निघाल्यापासून गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. शिवाय प्रशासनाकडूनही जमिनीचे भूसंपादन किंवा मोबदल्याविषयी अधिकृतरीत्या काहीच सूचना किंवा बोलणी झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधील अस्वस्थता आणखी वाढत आहे.
गेल्या आठवड्यात शेळगाव (आर) येथील वासुदेव गायकवाड, विजयकुमार पाटील, विनय गायकवाड, आनंद पाटील, सोमनाथ गायकवाड, महादेव जाधव, प्रदीप जाधव, हनुमंत जाधव, अजित जाधव, बळिराम कापसे, उमेश जगताप या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन याबाबत आक्षेप नोंदवलेच, पण आंदोलनाचाही इशारा दिला आहे.
बागायती जमिनी जाणार, मोबदलाही तुटपुंजा
बार्शीसह या भागातील अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. महामार्गात जमीन गेल्यास शेतकऱ्यांकडे अत्यल्प जमीन किंवा काही जणांना जमीनही राहणार नाही. त्यामुळे ते भूमिहीन होण्याचा धोका आहे. या भागात द्राक्षे, केळी, ऊस या पिकामुळे शेतजमिनीचे बाजारभाव एकरी ५० लाखांच्या आसपास आहेत.
मात्र रेडीरेकनरचा दर अत्यंत कमी आहे. त्यामुळे रेडीरेकनरच्या चौपट रक्कम दिली, तरीही ती बाजारभावापेक्षा कमी होते, त्यामुळे महामार्गासाठी जमीन गेल्यास बागायती जमिनी जाणार आणि मिळणारी भरपाईही तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांचा विरोध होतो आहे.
सोलापूरचे ८६८ आणि धाराशिवमधील २१० हेक्टरचे संपादन
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, सांगोला या पाच तालुक्यांतून जवळपास १५६ किलोमीटरचा हा महामार्ग जाणार आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव आणि तुळजापूर या दोन तालुक्यांतून ४३ किलोमीटर हा महामार्ग जाणार आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ८६८ हेक्टर आणि धाराशिवमधील २१० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन होणार आहे.
सोलापूर, धाराशिवमधील प्रकल्प बाधित गावे
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील शेळगाव (आर), गौडगाव, हत्तीज, रुई, रातंजन, मालेगाव, आंबेगाव, अंबाबाईची वाडी, जवळगाव, शेलगाव, चिंचखोपण, मोहोळमधील मसलेचौधरी, खुनेश्वर, भोयरे, हिंगणी-निपाणी, घाटणे, मोहोळ, पोखरापूर, आढेगाव, सौंदणे, टाकळीसिकंदर, उत्तर सोलापुरातील कळमण आणि पडसाळी, पंढरपुरातील पुळूज, फुलचिंचोली, विटे, पोहरगाव, खरसोळी, आंबे, रांझणी, खर्डी, अनवली, कासेगाव, शेटफळ, सांगोल्यातील मेथवडे, संगेवाडी, मांजरी, चिंचोली, बामणी, एखतपूर, सांगोला, कमलापूर, यलमार मंगेवाडी, अजनाळे, चिणके, वझरे, बलवडी, नाझरे, चोपडी, बंडगरवाडी, कोळे, कोंबडवाडी आणि पाचेगाव बुद्रुक, तर धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील नितळी, लासोना, चिखली, महालिंगी, बरमगाव, मेडसिंगा, सुर्डी, बेगडा, वरवंटी, पोहनरे, देवळाली, शेकापूर, गावसूद आणि तुळजापूर तालुक्यातील खुट्टेवाडी आणि वाणेवाडी या गावांचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.