Parbhani News : आधीच ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. पक्के रस्ते नाहीत. शेतीमाल वाहतुकीसह दळणवळणासाठी वर्षानुवर्षे शेतकरी, ग्रामस्थांना अडचणी येत असतात. शेतीचा विकास होत नाही.
सरकारने पर्यायी रस्ता असताना मध्येच या नागपूर-गोवा महामार्गाचा घाट कशासाठी घातला असा सवाल हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह संघटनांनी केला आहे. तसेच उपजीविकेचे शेती हे साधनच नष्ट होणार असल्याने हा महामार्ग रद्द करावा, अशी मागणी केली आहे.
प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग हिंगोली, परभणी, नांदेड या तीन जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ७५ गावांतून जात आहे. या जिल्ह्यांतील महामार्गाची लांबी १३१ किलोमीटर असून त्यासाठी सुमारे १ हजार ५५४ हेक्टर जमीन संपादन केली जाणार आहे. अनेक अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार असल्याने या जिल्ह्यांत अस्वस्थता वाढली आहे.
नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाची एकूण लांबी सुमारे ८०२ किलोमीटर आहे.परभणी-हिंगोली जिल्ह्यात ड्रोनव्दारे या महामार्गाचे सर्वेक्षण केले जात आहे. या महामार्गाची हिंगोली जिल्ह्यातील लांबी ३४ किलोमीटर आहे.
हा महामार्ग जात असलेली हिंगोली जिल्ह्यातील गावे इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा, पूर्णा नदीवरील सिद्धेश्वर धरणाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येतात. संपादित केली जाणारी बहुतांश जमीन ही बागायती प्रकारची आहे. शेतकरी केळी, ऊस, हळद यासह फळे भाजीपाल्यासह सोयाबीन, तूर, हरभरा आदी जिरायती क्षेत्रातील पिके घेतात.
परभणी जिल्ह्यातील लांबी ७१ किलोमीटर आहे. हा महामार्ग जात असलेली बहुतांश गावे सिद्धेश्वर, जायकवाडी, माजलगाव या मोठ्या प्रकल्पांच्या कालव्यांच्या लाभक्षेत्रातील आहेत. ऊस, हळद, केळी ही प्रमुख बागायती पिके तसेच कापूस व सोयाबीन या जिरायती पिकांचे क्षेत्र मोठे आहे. खोल काळ्या जमिनीचे क्षेत्र अधिक आहे.
नांदेड जिल्ह्यातील या महामार्गाची लांबी २६ किलोमीटर आहे. उर्ध्व पैनगंगा व सिद्धेश्वर प्रकल्पांच्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील बागायती जमीन या महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे.या भागातील शेतकरी ऊस, केळी, हळद ही पिके घेतात. येथेही काळी सुपीक जमीन आहे.
शेतकऱ्यांचा विरोध...
शक्तिपीठ द्रुतगती महामार्गासाठी भूसंपादन करण्याची कार्यवाही अद्याप सुरु झालेली नाही. मावेजाचे दर देखील जाहीर झालेले नाहीत. प्राथमिक अधिसूचना निघाली आहे. त्यानुसार भूसंपादनासाठी गट निहाय जमीन क्षेत्राची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे भूसंपादन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. परभणी जिल्ह्यातील काही भागात ड्रोनव्दारे सर्वेक्षण केले जात आहे. परंतु शेतकरी त्यास विरोध करत आहेत.
नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग स्थिती
हिंगोली जिल्हा
एकूण लांबी : ३४ किलोमीटर
तालुके : कळमनुरी, वसमत
गावे : एकूण २२
कळमनुरी तालुका - दाभडी, महालिंगी, झुनझुनवाडी, भाटेगाव, जामगव्हाण, सुकळीवीर, डोंगरकडा, जवळा पांचाळ, वसफळ,
वसमत तालुका - गिरगाव, पळसगाव तर्फे माळवटा, गुंज, रूंज तर्फे आसेगाव, आसेगाव, टाकळगाव, राजापूर, बाभूळगाव, रेनकापूर, लोणी बु., हयातनगर, जवळा खुर्द., जवळा बुद्रूक
गट संख्या : ४११
प्रस्तावित भूसंपादन क्षेत्र : ४३०.३७९१ हेक्टर
परभणी जिल्हा
एकूण लांबी : ७१ किलोमीटर
तालुके : पूर्णा, परभणी, सोनपेठ
गावे : एकूण ३१
पूर्णा तालुका : सूरवाडी, आहेरवाडी, नावकी, कात्नेश्वर, पिंपळगाव बाळापूर, सदलापूर.
परभणी तालुका : उखळद, बाभळी, पिंगळी, शेंद्रा, टाकळगव्हाण, लोहगाव, जवळा, सहजपूर, आमडापूर, ताडपांगरी, आंबेटाकळी, पोखर्णी नृसिंह, दैठणा, इंदेवाडी, साळापुरी.
सोनपेठ तालुका : शिरोरी, डोंबाडी तांडा, शिर्शी बुद्रूक, कान्हेगाव, सायखेडा, शेळगाव हटकर, नरवाडी, कोठाळा, डिघोळ ई, धामोनी
गट संख्या : ६४८
प्रस्तावित भूसंपादन क्षेत्र : ७३३.९७३९ हेक्टर
एकूण लांबी : २६ किलोमीटर
तालुके : हदगाव,अर्धापूर
गावे : एकूण २२
हदगाव तालुका : पेवा, करोडी, काळेश्वर, वेळांब, उंचेगाव खु., आडा, रुई, पळसा, बरडशेवाळा, कवाना, बामणी, बामणीतांडा, चिंचगव्हाण, जगापूर, मनाठा, वरवट, जांभळंसावली
अर्धापूर तालुका : भोगाव, उंबरी, मालेगाव, धामदरी, देगाव कुऱ्हाडा
गट संख्या : ४३९
प्रस्तावित भूसंपादन क्षेत्र : ३९०.०५६७ हेक्टर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.