Green Hydrogen: हरित हायड्रोजन, फायबर बोर्डसाठी ऊस हा महत्त्वाचा घटक

Fiber Board: भविष्यामध्ये जैवइंधन निर्मितीमध्ये ऊस पिकाचा मोलाचा वाटा असणार आहे. देशातील ५५० साखर कारखान्यांमधून सुमारे १४००० मेगावॉट वीज उत्पादन करण्याची क्षमता आहे. साखर उद्योगातून हरित हायड्रोजन, हरित मिथेनॉल आणि हरित अमोनिया निर्मिती शक्य आहे.
Fiber Board
Fiber BoardAgrowon
Published on
Updated on

डॉ. गणेश पवार

Sugarcane Innovation: साखर कारखान्यातून तयार होणारी सहवीज निर्मिती हे एक प्रदूषणरहित विद्युत निर्मिती करण्याचे उपयुक्त साधन आहे. देशात साखर कारखान्याशी संबंधित सहवीज निर्मिती प्रकल्पामुळे ग्रामीण भागात सुमारे २०,००० कोटी रुपयांची उलाढाल दरवर्षी होत असते. देशांत दरवर्षी ४०० लाख टन उसाचे गाळप होते

त्यापैकी ३६० ते ३८० लाख टन उसाचे गाळप साखर कारखान्यामध्ये होते. त्यातून २८ ते ३० टक्के प्रमाणे भुसा/बगॅस व त्यातून एकत्रित १.८० लाख टन भुसा निर्माण होतो. त्यापैकी ०.५० लाख टन भुशाचा वापर बाष्प आणि वीज निर्मितीसाठी करण्यात येतो. गाळप हंगामात तयार होणाऱ्या विजेपैकी ४० टक्के विजेचा वापर कारखाना चालविण्यासाठी होतो. राहिलेली ६० टक्के वीज केंद्रीय ग्रीडला जोडून विकली जाते.

देशातील ५५० साखर कारखान्यांमधून सुमारे १४००० मेगावॉट वीज उत्पादन करण्याची क्षमता आहे. सध्य स्थितीत कारखान्यातून ५.७६ दशलक्ष युनिट वीज प्रतिवर्षी तयार होते. ३१ मार्च २०२१ रोजी एकत्रित सहवीज निर्मित स्थापित क्षमता १०,१४६ मेगावॉट इतकी होती, त्यापैकी ९३७४ मेगावॉट निर्मितीपैकी ७५४७.४५ मेगावॉट ही बगॅसवर आधारित आणि राहिलेली १८२६ मेगावॉट बायोमासवर आधारित आहे. तसेच ७७२ मेगावॉट वीज निर्मिती ही बगॅसविरहित इतर कच्च्या मालावर आधारित प्रकल्पातून होते.

महाराष्ट्रामध्ये बायोमास,बगॅस व बगॅसशिवाय सहवीज निर्मिती क्षमता अनुक्रमे २१७, २३५१ व १६.४० मेगावॉट अशी एकूण २५८४.४ मेगावॉट क्षमता आहे. ही देशाच्या २५.५० टक्के एवढी आहे. अपारंपरिक ऊर्जा विभागाच्या माहितीनुसार भारतात दरवर्षी ५०० दशलक्ष टन बायोमास निर्माण होतो. तसेच जंगले व शेतीमधून १२० ते १५० दशलक्ष टन पिके, झाडांची पाने व कचरा यातून बायोमास मिळतो. त्यातूनही १८००० मेगावॉट पारंपारिक ऊर्जा दरवर्षी निर्माण होऊ शकते.

Fiber Board
Sugarcane Production Technique: आडसाली ऊस उत्पादनवाढीचे तंत्र

हरित हायड्रोजन

पाण्याच्या साठ्यावर विद्युत वहन करून हरित हायड्रोजन मिळवला जातो. या हरित हायड्रोजनचा वापर करून हरित ऊर्जा बनवली जाते. अवजड उद्योग, स्टील उद्योग, सिमेंट उद्योग, विमान व जहाज उद्योगात हायड्रोजनपासून तयार केलेल्या प्रदूषण मुक्त विजेचा वापर होऊ शकतो.

सध्या जगभरात अमोनिया उत्पादन, पेट्रोलियम रिफायनरी, मिथेनॉल उत्पादन या उद्योगात हरित हायड्रोजन विजेचा वापर अनुक्रमे ५५ टक्के, २५ टक्के आणि १० टक्के असा केला जातो. भारताने २०३० पर्यंत पॅरिस पर्यावरण करार अंतर्गत ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन ४३ टक्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्या अनुषंगाने भारत सरकारच्या केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ रोजी हरित हायड्रोजन पॉलिसी जाहीर केली आहे.

साखर कारखान्यातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साइड आणि ऊस प्रक्रियेनंतर उरणारा बगॅस व प्रेसमडवर पाणी, वीज व उष्णतेचा वापर करून इलेक्ट्रोलायझर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ८ किलो ऑक्सिजन आणि१ किलो हायड्रोजन मिळतो. साखर उद्योगातून शिल्लक बायोमास व गॅस वेस्ट यांचा औष्णिक विघटन पद्धतीने १३६ किलो बगॅस मधून १ किलो ग्रीन ऑक्सिजन मिळवता येतो. दुसऱ्या पद्धतीने वाफेचा उपयोग करून वॉटर इलेक्ट्रोलायसिस पद्धतीने ९ किलो बगॅसमधून १ किलो हायड्रोजन मिळतो.

१ किलो हायड्रोजन निर्मितीसाठी वेस्ट टू बायोमास पद्धतीने २६३ रुपये लागू शकतात तर वॉटर इलेक्ट्रोलायसिस पद्धतीने १ किलोस १६० रुपये लागू शकतात. साखर उद्योगातून ग्रीन हायड्रोजन, ग्रीन मिथेनॉल व ग्रीन अमोनिया बनवता येईल. तसेच विमानासाठीच्या इंधनाची (एसएएफ) निर्मिती करून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल. साखर कारखान्याचा शाश्वत विकास होण्यास नवीन मार्ग तयार होईल.

गूळ आणि खांडसारी उद्योग

देशातील एकूण ऊस उत्पादनाच्या ७८ टक्के ऊस साखर तयार करण्यासाठी, १२ टक्के बेणे चारा व रसवंतीसाठी आणि राहिलेला १० टक्के ऊस गूळ व खांडसारी तयार करण्यासाठी वापरला जातो.

देशात गूळ व खांडसरीचे उत्पादन उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व गुजरात या ठिकाणी केले जाते. राज्यात गूळ निर्मिती करणारी ९००० गुऱ्हाळे आणि ३५ गूळ पावडर उद्योग कार्यरत आहेत. त्यांची क्षमता ही ५ ते ५०० टन प्रतिदिन असून बहुतेक ठिकाणी वैयक्तिक गुऱ्हाळे कार्यरत आहेत, यातून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात आर्थिक उलाढाल होत असते. राज्यात सध्या ११ परवानाधारक खांडसरी उद्योग आहेत. या युनिटकडून सर्वसाधारणपणे १४ लाख टन उसाचे गाळप केले जाते. त्यांची क्षमता ही ३०० ते १००० टन प्रति दिन अशी आहे.

Fiber Board
Agri Innovation: बारामतीतून कृषिक्रांतीची सुरुवात

हँड सॅनिटायझर निर्मिती

कोविड प्रादुर्भावाच्या काळात सॅनिटायझरची मागणी वाढली. त्यामुळे केंद्र शासनाने साखर कारखान्यांना इथेनॉल प्लँट मधून हँड सॅनिटायझर उत्पादन करावयास प्रोत्साहन दिले. त्यामुळे एप्रिल २०२० पर्यंत १९ साखर कारखान्यातून दररोज ३.१० लाख लिटर हँड सॅनिटायझरचे उत्पादन होत होते. जून २०२० पर्यंत इतर १०८ साखर कारखाने व आसवणी प्रकल्पांना परवाना देण्यात आला. महाराष्ट्र राज्यात कोविड काळात १.१० कोटी लिटर प्रतिमहिना हँड सॅनिटायझरचे उत्पादन केले होते.

ऑक्सिजन निर्मिती

महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन निर्माण करता येऊ शकतो ही बाब लक्षात आली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, पुणे येथील तज्ज्ञांनी तांत्रिक मार्गदर्शन केल्यानंतर साखर कारखान्यांनी २५ ते ३०० घनमीटर प्रतिदिन क्षमतेचे ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारून प्रतिसाद दिला. ज्या कारखान्यामध्ये आसवणी प्रकल्प आहेत त्यात काही तांत्रिक बदल करून ऑक्सिजन निर्मिती करता येऊ शकते, त्यामुळे कारखान्यांनी हा बदल करून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू केले.

सोलापूर जिल्ह्यातील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सर्वप्रथम ८० ते ९० सिलिंडर प्रतिदिन व २५ घनमीटर प्रति तास क्षमतेचा प्रकल्प उभा केला. धाराशिव साखर कारखान्याने ३०० घनमीटर प्रति तास (१००० सिलिंडर प्रतिदिन) क्षमता असलेला मोठा प्रकल्प सुरू केला. अशा प्रकारे काही दिवसांमध्ये बहुतांश कारखान्याचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू होऊन त्यामधून साखर उद्योगाला नवीन आर्थिक स्रोत मिळू शकला.

पार्टिकल आणि फायबर बोर्ड

एक हेक्टर उसापासून वर्षाला पाच टन फायबर मिळू शकते. उसापासून निर्माण होणारे फायबर हे झाडातील फायबर निर्मितीसाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा १५ पटीने कमी वेळात निर्माण होऊ शकते. एक टन उसामागे ३० ते ३२ टक्के बगॅस तयार होतो, त्यापैकी साखर निर्मितीसाठी २८ टक्के बगॅस हा बॉयलरला वापरला जातो. राहिलेल्या ४ टक्के बगॅसचा वापर सहवीज निर्मिती प्रकल्पासाठी केला जातो.

सर्व प्रकारचे कागद, लाकडी फळ्यांना पर्याय म्हणून वापरात आलेले पार्टिकल बोर्ड व फायबर बोर्ड भुशापासून तयार करतात. १ टन कागद तयार करण्यासाठी ३.८ टन भुस्सा लागतो. मात्र कागदाच्या लगद्यात भुश्शाचा भाग ८० टक्के असणे गरजेचे असते. जगात तयार होणाऱ्या १०५ दशलक्ष कागदांपैकी २.५ दशलक्ष टन कागद अशा भुश्शापासून बनवितात, तसेच एक टन पार्टिकल बोर्ड बनवण्यासाठी तीन टन भुस्सा लागतो. त्यामुळे लाकडी फळ्यांना एक चांगला पर्याय यामुळे निर्माण झाला आहे.

दक्षिण अमेरिकेतील मेक्सिको देशात कोका कोला कंपनीने बगॅस पासून विघटन होऊ शकणाऱ्या बायोडिग्रेडेबल बाटल्या तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला असून या बाटल्या वापरानंतर जमिनीत पुरल्यानंतर सहा आठवड्यात विघटित होतात. याद्वारे प्लॅस्टिकच्या बेसुमार वापरास व पर्यायाने प्रदूषणास आळा घालता येईल.

 अन्न वेष्टित करण्यासाठी लागणारा सुरक्षित बगॅस पल्प बगॅसपासून तयार करता येतो. पाण्यात विद्राव्य होऊ शकणाऱ्या तंतूंची निर्मिती बगॅसपासून आधुनिक प्रक्रियेतून करण्यात येते. त्यामुळे आतड्यातील अन्नाचे पचन चांगल्या पद्धतीने होऊ शकते. अशा तंतूंचा (फायबर) वापर अती फॅट युक्त अन्नपदार्थात केल्यास त्यातून होणाऱ्या टाईप-२ मधुमेहास आळा घालता येऊ शकतो.

- डॉ. गणेश पवार, ९६६५९६२६१७

(लेखक ऊस पिकाचे अभ्यासक आहेत)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com