डॉ. गणेश पवार, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. अशोक कडलग
Sugarcane Harvesting Management :
भाग : २
कारखाना कार्यक्षेत्रावर चांगल्या प्रकारची तोडणी करणाऱ्या मजुरांचे योग्य प्रकारे नियोजन करणे हे महत्त्वाचे आव्हान आहे. वेगवेगळ्या कारणांनी मजुरांची विभागणी होत असल्याने प्रत्येक तोडणी हंगामात मजूर मिळणे कठीण होत आहे. शेतीकामांच्या तुलनेत औद्योगिक क्षेत्र, नगदी फळपिके व बांधकाम क्षेत्रात मजुरीचे दर जास्त असल्यामुळे व दिवस रात्र कामांच्या वेळेमुळे ऊस तोडणी कामगार उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे भविष्यात साखर उद्योगाला यांत्रिक पद्धतीने तोडणी करण्याशिवाय अन्य पर्याय उरणार नाही. परंतु यांत्रिकीकरणाला सुद्धा भौगोलिक विविधतेमुळे मर्यादा येतात. त्यामुळे मजूर व यांत्रिक तोडणीचा समतोल साधावा लागणार आहे.
सद्यपरिस्थितीत मजुरांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात घटत आहे. त्यामुळे ऊस शेतीचे यांत्रिकीकरण भविष्यकाळात अटळ आहे. भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनऊ यांनी ट्रॅक्टरला समोरच्या बाजूला जोडून चालणारे ऊस तोडणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राच्या विविध कारखाना कार्यक्षेत्रावर यशस्वी चाचण्यादेखील घेण्यात आल्या आहेत. हे यंत्र प्रतिआठ तासांना दोन हेक्टरपर्यंत ऊस तोडणी करते. याशिवाय काही खासगी कंपन्यांचे अद्ययावत ऊस हार्वेस्टर उपलब्ध आहेत.
ऊस तोडणी
जमिनीलगत तोडणी
जमिनीलगतच्या कांड्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जमिनीलगत तोडणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तोडणी जमिनीलगत न झाल्यास उत्पादनात साधारणपणे ५ ते १० टन प्रति हेक्टरी (०.५ ते १ टन साखर) तूट येऊ शकते. जमिनीलगत तोडणी झाल्यास खोडवा पीक व फुटवे चांगल्याप्रकारे येतात.
वाढे छाटणी (टॉपिंग)
वेगवेगळ्या ऊस वाणांच्या गुणधर्मानुसार वाढ्यातील कांड्यांची गुणवत्ता अवलंबून असते. अपरिपक्व अवस्थेत व तुरा आलेल्या उसाचे वाढ्यांची खालच्या बाजूने छाटणी करणे हे गुणवत्तेच्या दृष्टीने योग्य असते.
बाह्य पदार्थ टाळणे
उसाची तोडणी करताना पानफुटवे, पाचट, मुळ्या चिखल, वाळलेला, रोगग्रस्त व उसाला वेढलेल्या वेलवर्गीय तणांचे अवशेष उसाबरोबर जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. यामुळे उसाचा उतारा घटतो. तसेच गाळप प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण येऊन उसाच्या शुद्धीकरणासाठी जास्त वेळ व खर्च होऊ शकतो. पान फुटव्यांमध्ये (वाँटर शूट) सुक्रोजचे प्रमाण कमी असते. उसाच्या १ टक्के पाचट व बांधणीच्या वाड्यामुळे ऊस उताऱ्यामध्ये ०.३ ते ०.५ युनिटने घट येऊ शकते. या घटकात तंतुमय पदार्थ व राखेचे प्रमाण जास्त असते.
उसाची वाहतूक
ऊस तोडणीचे नियोजन कार्यक्रमात जलद वाहतूक यंत्रणेची नितांत आवश्यकता असते. तुटलेला ऊस २४ तासांच्या आत गाळपास गेला पाहिजे. काही कारणास्तव वाहतूक यंत्रणा बिघडल्यास कारखान्यात यार्डावर आवश्यक तेवढा जास्तीचा व शिल्लक ऊस असावा, जेणेकरून कारखाना अखंडपणे सुरू राहील. गाळप क्षमतेनुसार आवश्यक तेवढीच ऊस वाहतूक यंत्रणा असावी.
ऊस वाहतुकीसाठी सामान्यपणे बैलगाडी तसेच ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर केला जातो. ऊस वाहतुकीचा प्रकार हा कारखान्यापासूनच्या अंतरानुसार ठरतो. ऊस लागवड क्षेत्र कारखान्यापासून १० किमी परिसराच्या परिघातील असेल तर अशा ठिकाणी बैलगाडीने वाहतूक करणे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरते. या बैलगाड्यांना न्यूमँटिक प्रकारचे टायर जोडल्यामुळे बैलांना गाडी ओढण्याकरता जास्त श्रम पडत नाही तसेच वाहतुक ही जलद होते. लांबच्या अंतरासाठी ट्रॅक्टर ट्रॉली व ट्रक उपयुक्त ठरतात.
तोडणीपश्चात होणारा ऱ्हास
गाळपास उशीर झाल्यास उसाच्या रसाच्या गुणवत्तेमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन रसाची प्रत खालवते. या ऱ्हासाची वेगवेगळी कारणे दिसून येतात. यामध्ये उसाचे वाण, पक्वता कालावधी व हवामान परिस्थिती इत्यादी कारणे आहेत. या व्यतिरिक्त उसाच्या वजनात आणि रसातील सुक्रोजमध्ये घट होते. उसातील रसाची रस गाळण कार्यक्षमता कमी होऊन उसातील अशुद्ध घटकांमुळे शुद्धता व गाळण क्षमतेच्या समस्या निर्माण होतात.
तुटलेल्या उसाची (स्टेल केन) घट कमी करण्यासाठी उपाय
तुटलेला ऊस जलद वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करून गाळपास पाठवावा.
शक्य असेल तर उसाचे ट्रक वा ट्रॉली सावलीत किंवा शेडमध्ये उभे करावेत किंवा शेतात उसाच्या मोळ्या पाचटाने झाकून घ्याव्यात (परंतु हे उपाय प्रत्यक्षरीत्या अमलात आणणे खर्चिक व अवघड आहे)
आपत्कालीन नियोजन
खराब रस्ते, अपघात, पाऊस, कामगार निघून जाणे इत्यादी अनेक कारणांनी कारखान्याला ऊसपुरवठा कमी होतो. त्यामुळे कारखाना पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी वाहतुकीची व ऊस पुरवठ्यासाठी दुसरी पर्यायी यंत्रणा तयार ठेवणे गरजेचे असते. तसेच कारखान्यांमध्ये परिणामकारक व जलद टेलिकम्युनिकेशन किंवा वायरलेस सुविधा असायला हवी. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत उपलब्ध होईल.
शेतकऱ्यांचे प्रबोधन
शेतकऱ्यांना हंगाम व वाणनिहाय लागवडीचे महत्त्व पटवून त्यांना पक्वतेनुसार ऊस लागवड करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. उदाहरणार्थ, उशिरा पक्व होणाऱ्या वाणांची लागण ही आडसाली हंगामामध्ये करावी, म्हणजे तो १४ ते १५ महिन्यांत पक्व होऊन त्याच्या लागण नोंदीनुसार तोडला जाईल. त्यामुळे उत्पादन आणि उतारादेखील चांगला मिळेल. पक्वता गट व लागण नोंदीनुसार तोडणी वेळापत्रक तयार करून तोडणी अगोदर एक महिना शेतकऱ्यांना पूर्वकल्पना द्यावी. म्हणजे ते सिंचन कमी करतील. काही वेळेस नैसर्गिक आपत्ती (पूर) किंवा आग लागून जास्त कालावधी झाला असेल, तर अग्रक्रमाने हे ऊस गाळपास तोडायला हवे. म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान कमी करता येईल.
तोडणीपश्चात उसाच्या ऱ्हासाची तीव्रता आणि स्वरूप
ऊस तुटल्यानंतर ल्युकोनाँस्टिक जिवाणूंमुळे जैविक विघटनास सुरुवात होते. हे जिवाणू कांड्यामधून प्रवेश करतात. एका तासांमध्ये प्रवेश केलेल्या भागापासून २० सेंमी आतपर्यंत शिरतात. हे जिवाणू सुक्रोजचे विघटन करून डेक्सट्रॉनची व डिंकयुक्त चिकट पदार्थांची निर्मिती करतात. अभ्यासानुसार तोडणीपश्चात उसाच्या रसामध्ये ३८० ते ४०० अंश सेल्सिअस तापमानाला १५ टक्के रसामधील ओलाव्यात घट येते. वजनातील घट ही उसाची तोडणी वेळ, पक्वता वय व स्थानिक हवामानावर अवलंबून असते. उष्णकटिबंधीय भागामध्ये तोडणी केल्यापासून प्रत्येक २४ तासाला ही घट १.५ ते २.३ टक्के झाल्याचे आढळून आले आहे. उन्हाळ्यातील हंगामामध्ये ही घट २५ टक्क्यांपर्यंत वाढत जाते. त्या तुलनेने हिवाळ्यामध्ये घट कमी प्रमाणात असते. त्यामुळे भारतातील तोडणी हंगाम हा हिवाळ्यात सुरू करतात.
कार्यक्षम तोडणी व्यवस्थापनामध्ये महत्त्वाच्या बाबी
तोडणी उसाचे कमाल किंवा योग्यतम वय.
उच्च प्रतिची पक्वता अवस्था.
उसाच्या पक्वतेनुसार सर्वेक्षण करून तोडणी वेळापत्रक.
योग्य तोडणी करून स्वच्छ (कमी पाचट) ऊस पुरवठा.
दैनंदिन गाळप क्षमतेनुसार उसाची तोडणी व पुरवठा.
कार्यक्षम व जलद वाहतूक व्यवस्था .
तोडणी कामगार व यांत्रिक तोडणीचा योग्य समतोल व पुरेशी यंत्रणा.
सर्व विभागांमध्ये कार्यक्षम असे संप्रेषण.
तोडणी हंगामाचे व इतर गोष्टींचे (लागण नोंदी, टनेज स्लिप व बिल) संगणकीकरण व इतर नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर.
डॉ. गणेश पवार, ९६६५९६२६१७
डॉ. अभिनंदन पाटील, ९७३७२७५८२१
(वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी, पुणे)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.