Sugarcane Cultivation : ‘गिरणा’मुळे ऊस लागवड वाढणार

Girna Dam : चाळीसगाव तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले गिरणा व मन्याड धरण शंभर टक्के भरले आहे.
Sugarcane
Sugarcane Agrowon
Published on
Updated on

Chalisgaon News : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा बेलगंगा साखर कारखाना बंद असल्यामुळे तसेच मागील वर्षी पाणी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांनी उसाकडे पाठ फिरवली होती. यंदा मात्र गिरणा धरणासह मन्याड धरण शंभर टक्के भरले आहे. यामुळे उसासाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे तालुक्यात घटलेले ऊस लागवडीचे क्षेत्र यंदा काही प्रमाणात वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांत साधारणतः दोन हजार हेक्टरवर उसाची लागवड होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. चाळीसगाव तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले गिरणा व मन्याड धरण शंभर टक्के भरले आहे.

सद्यःस्थितीत सुमारे ५९५ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. पाण्याच्या उपलब्धतेमुळे साधारणतः दोन हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

कारखान्यांकडून नियोजन

मागील वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला होता. शिवाय जिल्हा बॅंकेकडून अंबाजी कंपनीने विकत घेतलेला बेलगंगा कारखाना सुरुच झाला नाही. त्यामुळे तालुक्यात उसाचे क्षेत्र कमालीचे घटले होते. बेलगंगा साखर कारखाना यंदाच्या हंगामात सुरू होण्याची शक्यता नाही.

Sugarcane
Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात उसाची ३१ हजार हेक्टरवर लागवड

मात्र, बाहेरच्या कारखान्यांकडून आतापासूनच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन पुढील नियोजन केले जात आहे. त्यामुळे उसाला या कारखान्यांकडून मागणी राहणार आहे. शिवाय यंदा उसाला लागणारे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा दोन ते तीन हजार हेक्टरवर उसाची लागवड होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

विविध जातीचा ऊस

चाळीसगाव तालुक्यात एकूण लागवडीचे ९० हजार ३५२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी सद्यःस्थितीत केवळ ५९५ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. यात सर्वाधिक लागवड ही २६५, ८६०३२, २३८ व ८००५ या जातीची झाली आहे. याशिवाय इतरही जातीच्या उसाची शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. २६५ जातीचा ऊस लागवडीनंतर चौदा महिन्यात तोडणीला येतो. शिवाय या जातीच्या उसाच्या साखरेची रिकव्हरी देखील चांगली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Sugarcane
Sugarcane Cultivation : पाऊस उघडताच ऊस लागवड सुरू

त्यामुळे २६५ या जातीच्या ऊसाची सर्वाधिक लागवड झालेली दिसत आहे. रसवंतीसाठी लागणाऱ्या ४१९ या जातीच्या उसाची देखील थोड्या फार प्रमाणावर लागवड झाली आहे. उसाला सरी पद्धतीने पाणी दिले जात असल्याने ठिबकचा पाहिजे तसा वापर शेतकऱ्यांकडून होताना दिसून येत नाही. कृषी विभागाकडून ठिबकचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती केली जात असली तरी शेतकऱ्यांची मानसिकता अद्यापही बदलायला तयार नसल्याचे चित्र गिरणा पट्ट्यात दिसून येत आहे.

‘बेलगंगा’ सुरू करावा

बेलगंगा साखर कारखाना खासगी कंपनीच्या मालकीचा झालेला आहे. हा कारखाना सुरु असताना तालुक्यात तब्बल आठ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झालेली होती. कारखाना बंद पडल्यानंतर तसेच पाऊसही कमी प्रमाणात झाल्याने ऊस लागवड कमालीची घटली. आता पुन्हा लागवड वाढत असल्याने बेलगंगा कारखाना सुरु करावा, अशी मागणी ऊस उत्पादकांमधून होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com