Kolhapur News : वाढत्या उन्हामुळे शेवटच्या टप्प्यातील साखर हंगाम कासावीस होत आहे. गेल्या पंधरा दिवसांत ऊस पट्ट्यातील तापमानाने चाळिशी गाठल्याने कामगारांना ऊस तोडणी असह्य झाली आहे. उन्हाचा तडाखा सहन होत नसल्याने ऊस तोडणी मध्येच टाकून मजूर गावाकडे परतत आहेत. त्यामुळे पूर्ण राज्यातच ऊसतोडणीची परिस्थिती गंभीर बनली आहे.
ऊस तोडणी संथ होत असल्याने अनेक साखर कारखान्यांचे गाळप गेल्या पंधरा दिवसांपासून क्षमतेच्या पन्नास टक्यापर्यंत खाली आले आहे. यामुळे उन्हाच्या तडाख्याबरोबर मजूर टंचाईच्या झळा कारखान्यांनाही बसत आहेत. काही भागातील कारखान्यांनी ऊस कमी आहे म्हणून बाहेरून ऊस गाळपासाठी आणला.
यामुळे अंतिम टप्प्यात कार्यक्षेत्रातील ऊसच शिल्लक राहात आहे. तोडणी न झाल्याने ऊस उत्पादकांचा रोष वाढत आहे. त्यामुळे या कारखान्यांना तोडणी यंत्रणेची जुळणी करताना नाकी नऊ येत आहेत. ऊस हंगाम अंतिम टप्प्यात येत आहे. ३ एप्रिलअखेर २०७ पैकी १५७ साखर कारखाने बंद झाले आहेत. अजूनही ५० साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. या कारखान्यांपुढे आता पूर्ण ऊस गाळपाचे आव्हान आहे.
वाढत्या तापमानाचा धसका
साखर आयुक्तालयाकडून राज्यातील शिल्लक उसाचा आढावा घेण्यात येत आहे. सध्या तरी वाढता उष्मा ऊसतोडणीतला सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्राबरोबर विदर्भ, मराठवाड्यातही उसाचे क्षेत्र मोठे आहे.
मराठवाड्यात सध्या सातत्याने पारा ४० अंशाच्या वर आहे. केवळ कडक ऊनच नाही तर वाढत्या आद्रतेमुळे उन्हाची मोठी झळ ऊसतोडणी कामगारांना बसत आहे. बागायती असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही पारा ३९ ते ४० च्या दरम्यान आहे, याचा प्रतिकूल परिणाम ऊस तोडणीवर होत आहे.
ऊस तोडणीच्या बदलल्या वेळा
दिवसभर सुरु असणाऱ्या ऊसतोडणीच्या वेळा आता बदलल्याचे चित्र आहे. झुंजुमुंजु झाल्यापासून ऊसतोडणीस सुरू करून दुपारी बारा वाजेपर्यंत ऊस तोडणी करायची आणि संध्याकाळी चार नंतर दिवस मावळेपर्यंत तोडणी केलेला ऊस वाहनांत भरायचा, असा दिनक्रम सध्या सुरू आहे. अनेक मजुरांकडून दुपारच्या वेळेत ऊसतोडणी टाळली जात आहे. तोडणी हळू असल्याने ज्या प्रमाणात ऊस तोडणीची गती हवी तितकी होत नसल्याने ऊस असूनही तो कारखान्यापर्यंत गतीने पोहोचत नसल्याने गाळपही मंदावले आहे.
जादा रक्कम देऊन मजुरांची जुळवाजुळव
ऊस तोडणी कामगाराबरोबर पूर्ण हंगामाचा करार केला जातो. त्या कामी त्यांना कारखान्यांकडून उचलही मिळते. ऊस तोडणी झाल्यानंतर हिशोब करून शिल्लक रक्कम कामगारांना दिली जाते. एखादा कामगार मधूनच गेला तर त्याला उर्वरित रक्कम मिळत नाही. हा धोका असूनही वाढत्या उन्हाने तोडणी अशक्य झाल्याने अनेक मजूर हंगाम संपण्यापूर्वीच गावी परतत आहेत. तोडणी पूर्ववत राहण्यासाठी अन्य ठिकाणांहून जादा मजुरी देऊन कामगारांची जुळवाजुळव करावी लागत आहे.
नगर, पुणे विभागात तोडणी रेंगाळली
सध्या नगर, पुणे विभागात विशेष करून ऊस तोडणी रेंगाळत आहे. या विभागात अजून ४० ते ५० टक्के कारखाने सुरू आहेत. कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड विभागात पाच ते सात कारखाने ३ एप्रिलअखेर सुरू आहेत. नागपूरमध्ये हंगाम सुरू केलेले चारही कारखाने अद्याप गाळप करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.