Jalna News : पूर्व हंगामी किंवा सुरू ऊस घेणाऱ्या शेतकऱ्यांना आडसाली ऊस का घेत नाही, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.
पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे उसाची लवकर येणारी वाण घ्या. आडसाली ऊस केला तर आजचे ३० टनाचे उत्पादन ५५ टनावर निश्चित जाईल. त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज, असल्याचेही श्री. पवार म्हणाले.
सागर सहकारी कारखान्याच्या ६० हजार लिटर प्रति प्रतिदिन इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते रविवारी (ता. २६) पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला माजी आरोग्य मंत्री तथा आमदार राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार अमरसिंह पंडित, जयप्रकाश दांडेगावकर, नॅचरल शुगरचे बी. बी. ठोंबरे, माजी आमदार संजय वाघचौरे, अरविंद चव्हाण, माजी आमदार चंद्रकांत दानवे, डॉ. निसार देशमुख, सूरज चव्हाण, बबलू चौधरी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रास्ताविकातून श्री. टोपे यांनी इथेनॉल निर्मिती प्रकल्पामागची भूमिका स्पष्ट करताना हा प्रकल्प ऊस उत्पादकाच्या तसेच कारखान्याच्या अर्थकारणाला बळकटी देणारा असल्याचे सांगितले.
श्री पवार म्हणाले, महाराष्ट्रात हेक्टरी २५० टन ऊस पिकविणारे शेतकरी आहेत. त्यांना जमत मग इतर भागातील शेतकऱ्यांना का जमत नाही. कारखान्याचे व्यवस्थापन साखर, बग्यास, इथेनॉल, स्पिरीट, अल्कोहोल बायो सीएनजी आधी प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर कसा देईल याचा विचार करते आहे.
मग ऊस उत्पादकांनीही कारखान्याच्या गरजेनुसार उत्पादनाची पद्धत अवलंबायला हवी, असेही श्री. पवार म्हणाले.
राज्य सरकारवर सडकून टीका
बीड जिल्ह्यातील जैताळवाडीच्या कांदा उत्पादकाला पदरचे पैसे घालून शेतमाल विकावा लागतो. यापेक्षा दुर्दैव ते काय असा सवाल करत, ‘निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान’ या राज्य शासनाच्या जाहिरातीतील ओळीची खिल्ली श्री. पवार यांनी उडविली.
एकही हिताचा निर्णय नाही अन कशाचा बोडख्याचा गतिमान असा खोचक टोला त्यांनी लगावला. अत्यल्प आनंदाचा शिधा देऊन तर सरकारकडून जनतेची नुसती चेष्टा चालविली आहे.
राज्यात, देशात लोकशाही आणि संविधान अडचणीत असल्याचा घनाघातही श्री. पवार यांनी यावेळी केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.