Climate Change : तापमानवाढीचा सर्वाधिक फटका ऊस, द्राक्षं आणि संत्रा पिकाला

ऊस, द्राक्ष आणि संत्री या पिकांना हवामान बदलाचा फटका बसणार असल्याचा प्राथमिक निष्कर्ष द एनर्जी अँण्ड रिसोर्स इन्स्टीट्यूट या संशोधन संस्थेने काढला आहे.
Climate Change
Climate ChangeAgrowon

ऊस, द्राक्ष आणि संत्री या पिकांना हवामान बदलाचा (Climate Change Crop) फटका बसणार असल्याचा प्राथमिक निष्कर्ष द एनर्जी अँण्ड रिसोर्स इन्स्टीट्यूट (The Energy and Resources Institute) या संशोधन संस्थेने काढला आहे. यासंबंधातला सविस्तर अहवाल संस्थेने महाराष्ट्र शासनाला (Maharashtra Government) २०१४ सालीच सादर केला आहे.

हवामानबदल म्हणजे काय, तो कसा घडून येतो? त्याची तीव्रता आजच का भासू लागली आहे? पृथ्वीच्या भोवती वातावरण – वायूचं आवरण, आहे म्हणून सूर्यापासून येणार्‍या उष्णतेपासून पृथ्वीचं संरक्षण होतं. सूर्याच्या किरणांना वायूंचं आवरण भेदून पृथ्वीवर येणं भाग पडतं.

सूर्यापासून आलेली ऊर्जा समुद्र आणि जमिनी शोषून घेतात. त्यापैकी काही ऊर्जा वा उष्णता अवकाशात (वातावरणात नाही) सोडून देतात. वातावरणातील पाच घटक—बाष्प, मिथेन, कार्बनडायऑक्साईड, क्लोरोफ्लुरोकार्बन आणि नायट्रस ऑक्साईड, हे वायू सूर्याची उष्णता पृथ्वीवर येऊ देतात पण तिला परत अवकाशात जाण्यासाठी अटकाव करतात. त्यामुळे पृथ्वीवरील उष्णता वाढते. या वायूंचं वातावरणातील प्रमाण औद्योगिक क्रांती झाल्यापासून म्हणजे १८ व्या शतकापासून वाढू लागलं आहे.. उत्पादनवाढीसाठी लागणारी ही ऊर्जा जनावरांची वा स्नायूंची वा सूर्याची वा वार्‍याची नसते तर खनिज तेलाची असते. कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वलन होतं, त्यातून कार्बनडायऑक्साईडची निर्मिती होते. हा कार्बनडायऑक्साईड वायू वनस्पतींना आवश्यक असतो परंतु जंगलतोड केल्याने या कार्बनडायऑक्साईडचं शोषण वनस्पतींद्वारे होत नाही. एअरकंडिशन, रेफ्रीजरेटर इत्यादी यंत्रांमधूनही क्लोरोफ्लुरोकार्बन या वायूचं उत्सर्जन होतं. उत्पादन वाढीसाठी आपण ऊर्जेचा अधिकाधिक वापर करतो. त्यामुळे उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनात भरपूर वाढ होते. माणसांचे कष्ट कमी होतात आणि उपभोग्य वस्तुंचा उपभोग घेतल्याने माणसं, मानवी समाज सुखी होतो. यालाच सामान्यतः विकास म्हणतात.

Climate Change
Mixed Cropping : प्रयत्नपूर्वक शेतीतून समृद्धी अन् समाधान

ऊस आणि साखर उद्योगाचं भवितव्य

पृथ्वीच्या तापमानात त्यामुळे वाढ होते आहे. तापमानात वाढ झाल्याने अर्थातच वनस्पतींची पाण्याची गरज वाढते. त्याचा पिकांच्या उत्पादनावर थेट परिणाम होतो. महाराष्ट्रातील एकूण १५ टक्के जमीन सिंचित आहे. कोणतंही सरकार आलं, पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी गोदावरी खोर्‍यात वळवलं वा नदीजोड प्रकल्प कार्यान्वित केले तरिही पुढच्या दहा ते वीस वर्षांत राज्यातील सिंचन क्षेत्रात केवळ सात टक्क्यांनीच वाढ होऊ शकेल. सिंचनाच्या क्षेत्रात वाढ झाली असं गृहित धरलं तरिही ज्या प्रदेशात भरपूर पाणी आहे, उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्हा, तिथेही तापमानात वाढ होणार असल्यामुळे तेथील उसाला अधिक पाण्याची गरज आहे. अन्यथा दर एकरी उत्पादनावर विपरीत परिणाम होईल, असं सदर अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

Climate Change
Sugar Market : आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय पांढऱ्या साखरेला पसंती

उसाखाली असणारं सर्वाधिक क्षेत्र आज पुणे जिल्ह्यात आहे, त्यानंतर कोल्हापूरचा क्रमांक लागतो, त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा. मराठवाडा आणि सर्वात अखेरीस विदर्भ. ऊस हे मुळातच अधिक पाणी पिणारं पीक आहे. तापमानवाढीमुळे उसाला यापेक्षा अधिक पाणी द्यावं लागेल. त्यामुळे ऊस शेती अधिकाधिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्य सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या अपहाराला साखर कारखाने जबाबदार आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा ऊस शेतीला किती प्रोत्साहन द्यायचं असा प्रश्न राज्यकर्त्यांपुढे उभा राहाणार आहे. वस्तु व सेवा करामुळे संपूर्ण देशाची एक बाजारपेठ झाली, तोच न्याय शेतीला का लावायचा नाही, विशेषतः प्लँटेशन वा मळ्याच्या शेतीबाबत (ऊस, कॉफी, चहा इत्यादी) असा प्रश्न आज ना उद्या उभा राहाणार आहे.

Climate Change
Sugar Export : साखर निर्यातीत थायलंडवर मात करण्याचा मनसुबा पाण्यात

हा प्रश्न ऊस व साखरकारखानदारी यांच्यामध्ये सरकार व खाजगी क्षेत्राला कराव्या लागणार्‍या गुंतवणुकीसंबंधात असेल. अशा वेळी हवामान बदलाच्या संधीचा वापर करून घेण्याकडे सत्ताधार्‍यांचा कल असेल. हिमालयातील म्हणजे तिबेटमधील हिमनद्या तापमानातील वाढीमुळे मोठ्या प्रमाणावर वितळल्याने गंगा-यमुनेच्या खोर्‍यात मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होईल. अशा परिस्थितीत साखर उद्योग गंगा-यमुनेच्या खोर्‍यात स्थलांतरित करण्याच्या दिशेने राज्यकर्ते पावलं उचलण्याची शक्यता आहे.

द्राक्षे

राज्यातील ८० टक्के द्राक्ष उत्पादन निम्न कोरड्या प्रदेशात घेतलं जातं. नोव्हेंबर महिन्यातील पावसामुळे द्राक्षवेलींची छाटणी लांबणीवर पडते. त्यामुळे द्राक्षांची काढणीही लांबते, परिणामी बाजारपेठेत द्राक्षांना किफायतशीर दर मिळत नाही. २००९ साली मॉन्सूनचं आगमन लांबल्याने द्राक्ष उत्पादनात निम्म्याने घट झाली होती. अवकाळी पाऊस, गारांचा पाऊस यामुळे द्राक्ष पिकाचं सर्वाधिक नुकसान होतं. नाशिक, सांगली, सोलापूर आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये द्राक्ष लागवडीमुळे सुमारे तीन लाख लोकांना रोजगार मिळतो.

तापमानातील वाढ झाल्याने त्याचा परिणाम परागीभवनावर होईल. शीत लहरीमुळे द्राक्षवेलींच्या पानांचं नुकसान होऊ शकतं त्याचा परिणाम प्रकाश संश्लेषणावर होतो. द्राक्ष लवकर पिकतील, मण्यांना तडे जातील, त्याचा परिणाम उत्पादनावर होईल. वाईनरीची द्राक्षं आणि टेबल ग्रेप्स – देशांतर्गत वा निर्यातक्षम, यांच्या वर्गीकरणात बदल होण्याची शक्यता आहे. कारण तापमानवाढीमुळे पावसाचं प्रमाण वाढेल परंतु पावसाळ्यातील कोरड्या दिवसांची संख्याही वाढेल.

संत्री

संत्र्याचं झाडाचं आयुष्य साधारणतः आठ वर्षांचं असतं. त्यानंतर फळांची गुणवत्ता घसरते. त्यातील सिट्रसचा प्रमाण कमी होत जातं त्यामुळे बाजारभाव कमी मिळतो. तापमानात वाढ होत असल्याने संत्र्यांची झाडं अकाली वृद्ध होऊ लागली आहेत. त्यामुळे संत्रा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो आहे. तापमान ४०-४१ सेल्सियसपेक्षा वाढल्यावर उष्णता आणि सूर्याचे किरण यामुळे फळं तडकतात. आत्ताच विदर्भातील तापमान उन्हाळ्यात ४५ सेल्सियसपर्यंत असतं. संत्रा पिकाच्या पाण्याच्या पाळ्या वाढवणं हा त्यावरचा उपाय आहे. म्हणजे अर्थातच पाण्याची गरज वाढणार. पुरेसं पाणी योग्य वेळी मिळालं नाही तर अन्य मातीतील पोषणद्रव्यं झाडाला पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. साहजिकच त्याचा फळांवर परिणाम होतो. फळांचा आकार छोटा होतो. २००८ सालात तापमानात झालेल्या वाढीने संत्रा उत्पादनात केवळ ३-५ टक्के घट झाली होती. मात्र २०१० सालात उष्णतेच्या लाटेने आणि गारांच्या पावसाने उत्पादनात १५ टक्के घट झाली. मान्सूनच्या आगमनाला विलंब, पावसाळ्यात कोरड्या दिवसांची संख्या अधिक, गारांचा पाऊस यामुळे संत्र्याच्या झाडाच्या जीवनचक्रावर विपरीत परिणाम होतो. फुलोरा येणं, फळ धारणा होणं, फळांची वाढ आणि पिकणं याचं वेळापत्रक बदलतं.

हवामान बदलाचा परिणाम महाराष्ट्रातील सर्व पिकांवर होणार आहे. धान्य, डाळी, तेलबिया, कापूस, ऊस, फलोत्पादन, मासेमारी, पशुपालन इत्यादी सर्व प्रकारच्या शेतीवर होणार आहे. परंतु हा विषय आजही राजकारणाच्या विषय पत्रिकेवर नाही. पुढील १० ते २० वर्षांतील हवामान बदलाचा वेध घेऊन शेती व पणन आणि सिंचन क्षेत्राची नव्याने आखणी करावी लागेल, जुने कायदे मोडीत काढावे लागतील, नवीन कायदेकानून आणि प्रथा, परंपरा, संकेत रुजवावे लागतील, पिकांच्या नवीन जाती, नवं तंत्रज्ञान विकसित करावं लागेल.

विसाव्या शतकातील तंत्रज्ञान व दृष्टी त्यासाठी फारशी कामाची नाही. या वर्षी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पूराची स्थिती तर मराठवाडा दुष्काळग्रस्त अशी परिस्थिती उद्भवली. तरिही आज नदीजोड प्रकल्प, पश्चिमवाहिनी नद्यांचं पाणी गोदावरी खोर्‍यात वळवणं अशी स्वप्नं मतदारांना दाखवली जातात. हवामानबदल हा विषय राजकारणाच्या विषय पत्रिकेवर नाही. आपले नेते आणि राज्यकर्ते (टेक्नोक्रॅट वा सनदी अधिकारी) विसाव्या शतकातले आहेत. त्यांचे विचार व तंत्रज्ञानही त्याच शतकातलं आहे. थ्री नॉट थ्री ही रायफल दुसर्‍या महायुद्धातली होती. १९९२ पर्यंत ही रायफल घेतलेले पोलीस मंत्रालयाच्या रक्षणासाठी तैनात करण्यात आले होते. शेती संबंधात तीच स्थिती आजही आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com