Sugarcane Harvest Wages : ऊस तोडणी कामगारांना वाढीव मजुरी नोव्हेंबरपासूनच मिळणार

Sugarcane Labor : ऊस तोडणी मजुरांच्या मजुरीत दरात वाढ करण्याबाबतचा करार होऊन ३४ टक्के वाढ झाली आहे
Sugarcane Harvesting
Sugarcane HarvestingAgrowon

Nagar News : ऊस तोडणी मजुरांच्या मजुरीत दरात वाढ करण्याबाबतचा करार होऊन ३४ टक्के वाढ झाली आहे. ४ जानेवारी २०२४ ला हा करार झाला असला तरी यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच (नोव्हेंबर) नव्या करारानुसार दरवाढ मिळणार आहे.

नव्या करारामुळे राज्यातील बारा लाख ऊसतोड कामगारांना मोठी वाढीव रक्कम मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य ऊसतोड तोडणी वाहतूक, कामगार, मुकादम युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत ३५ वर्षांत बारा वेळा दरवाढ झाली असल्याचे ते म्हणाले.

श्री. थोरे पाटील यांनी ‘अॅग्रोवन’शी बोलताना सांगितले, की ऊसतोड मजुरांच्या मजुरीत वाढ करावी यासाठी यंदा मजुरांच्या संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने तसेच उसाचे क्षेत्र कमी असल्याने संपाचा फारसा प्रभाव दिसला नसला तरी मजुरांच्या दराबाबतचा कराराचा कालावधी संपला असल्याने दरवाढीबाबत करार करण्याची मागणी सुरूच होती.

Sugarcane Harvesting
Sugarcane Harvester Lottery : ऊस तोडणी यंत्रांसाठी सोडत निकष बदलण्याच्या हालचाली

दरवाढीत ४० टक्क्यांवर ऊसतोड कामगारांचे नेते ठाम राहिल्याने एकमत होत ३४ टक्के दरवाढ निश्‍चित झाली. पुण्यात ऊसतोड कामगारांच्या नेत्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत यावर तोडगा निघाला.

ऊसतोड कामगारांच्या मजुरीत वाढ होण्यासाठी दर तीन वर्षांनी करार होत असतो. ऊसतोड मजुरांच्या दरवाढीसाठी १९८६ मध्ये पहिला संप माजी केंद्रीय मंत्री स्व. बबनराव ढाकणे, माजी आमदार स्व. दगडू पाटील बडे यांच्यासह आमच्या बरोबरच्या नेत्यांनी एकत्र येऊन केली.

त्या वेळी डोकी सेंटरला प्रति टनाला १४ रुपये २५ पैसे, गाडी सेंटरला १६ रुपये २५ पैसे व टायर बैलगाडीला पहिल्या मैलाला प्रति टन १९ रुपये पंचवीस पैसे मिळायचे. संपाच्या लढ्यातून ६२ टक्के दरवाढ झाली आणि प्रति टनाला २३ रुपये ८ पैसे, गाडी सेंटरला २६ रुपये ३० पैसे व टायर बैलगाडीला पहिल्या मैलाला प्रति टन ३१ रुपये १८ पैसे मिळायला लागले. त्यानंतर १९८९ च्या करारात ४८ टक्के, १९९२ च्या करारात २२ टक्के, १९९५ च्या करारात २० टक्के दरवाढ मिळाली. १९९८ ऐवजी ९९ ला करार झाला.

Sugarcane Harvesting
Sugarcane Harvesting : सिंधुदुर्गातील ४० टक्के ऊसतोडणी पूर्ण

त्या वर्षी ३५ टक्के दरवाढ मिळाली व ५ टक्के मागील एक वर्षाचा फरकबिल मिळाले. त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजे २००५ ला २५ टक्के दरवाढ झाली. २००९ ला झालेल्या करारात २० टक्के दरवाढ व मागील २० टक्के फरकबिल मिळाले. २०१० ला मध्येच २३ टक्के व २०११ ला ४७ टक्के दरवाढ मिळाली. त्यानंतर २०१४ ला २० टक्के दरवाढ मिळाल्यावर सहा वर्षांनी २०२० मध्ये करार होऊन १९ टक्के दरवाढ मिळाली.

आतापर्यंत बारा वेळा दरवाढ झाली बहुतांश वेळा शरद पवार, गोपीनाथ मुंडे, बबनराव ढाकणे यांचा पुढाकार राहिला. ३५ वर्षांत ३५० रुपयांपासून ४२० रुपयांपर्यंत प्रतिटनामागे दरवाढ मिळाली असल्याचे थोरे म्हणाले. यंदा नोव्हेंबरपासून ही दरवाढ मिळेल असे त्यांनी सांगितले.

वाढीव मजुरीनंतर मिळणारी प्रतिटन रक्कम (कंसात अगोदर मिळणारी रक्कम)

- टायर बैलगाडी ः ४५१ रुपये २८ पैसे (३३७ रुपये) (पहिला किलोमीटर)

- गाडी सेंटर ः ३०४ (४०९)

- डोकी सेंटर ः ३६७ (२७३)

- टायर बैलगाडी प्रति किलोमीटर ः २० रुपये ४७ पैसे (१५ रुपये २७ पैसे)

यंदा ऊस तोडणी कामगारांच्या मजुरीत ३४ टक्के वाढ झाली आहे. तीन वर्षांसाठी हा करार आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यात गेलेल्या मजुरांना ही दरवाढ लागू असेल. मुकादमाच्या कमिशनमध्ये एक टक्का वाढ झाली असून, मजुरांना ओळखपत्रे देणे, संरक्षक कायदे आणि महामंडळाच्या कामाला गती देणे यासाठी मजूर संघटना आग्रही आहेत.
- गहिनीनाथ थोरे पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊसतोडतोडणी वाहतूक, कामगार, मुकादम युनियन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com