Sindhudurg News : जिल्ह्यातील ४० टक्के ऊसतोडणी पूर्ण झाली असून आतापर्यंत २४ हजार टन उसाची तोडणी झाली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ऊसतोडणी अधिक गतीने सुरू आहे. हीच गती कायम राहिल्यास महिना-दीड महिन्यात ऊसतोडणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली तालुक्यात ऊस लागवडीचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय मालवण आणि कुडाळ तालुक्यांतदेखील काही प्रमाणात ऊसलागवड आहे. यावर्षी जिल्ह्यात १ हजार २०० हेक्टरवर ऊसलागवड करण्यात आली आहे. गेली चार-पाच वर्षे ऊसतोडणीमुळे ऊस उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले होते.
त्यामुळेच १ हजार ७०० हेक्टरवरून ऊस लागवडीचे क्षेत्र १ हजार २०० हेक्टरवर आले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांचा शेतकऱ्यांचा अनुभव आणि यावर्षी करूळ घाटरस्ता काँक्रिटीकरणाचे सुरू होणारे काम यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी कारखान्याकडे जिल्ह्यातील ऊसतोडणी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी केली होती.
ऊस उत्पादकांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करीत डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना प्रशासनाने गळीत हंगामाच्या सुरुवातीपासून सिंधुदुर्गातील तोडणीला गती दिली आहे. ५ नोव्हेंबरला यावर्षीचा गळीत हंगाम सुरू झाला. सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांनंतर ऊसतोडणी कामगार जिल्ह्यात येण्यास सुरुवात झाली.
गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यातील २४ हजार टन ऊसाची तोडणी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत ४० टक्के तोडणी पूर्ण झाली आहे. तोडणीची गती कायम राहिल्यास जिल्ह्यातील ऊसतोडणी वेळेत पूर्ण होईल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.