Sugar Factory : साखर कारखानेही व्हावेत पाण्यासाठी स्वयंपूर्ण

Sugar Factory Water Management : शेतीक्षेत्रामध्ये ज्या प्रमाणे ऊस शेतीला अधिक पाणी वापरासाठी जबाबदार धरले जाते. त्याच प्रमाणे साखर कारखान्यांनाही प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. या पाण्याची उपलब्धता, साठवण, बचत, सांडपाणी पुनर्वापर अशा वेगवेगळ्या पद्धतीने करणे आवश्यक आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

सतीश खाडे

Sugar Industry Water Management : केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे भारतातल्या सर्व कारखान्यांना २०३० अखेर पाण्याबाबत स्वयंपूर्ण होणे सक्तीचे आहे. त्याला महाराष्ट्रातील साखर कारखानदारीही अपवाद नाही.

आता पाण्याबाबत स्वयंपूर्ण मिळविण्यासाठी मिळालेल्या पाण्याचा योग्य आणि काटेकोर वापर, पावसाचे पाणी साठवणे, उत्सर्जित होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर योग्य करणे असे शक्य ते उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे.

कारखान्यांच्या प्रक्षेत्रावर पडणारे पावसाचे पाणी अडवणे, साठवणे यावर काम करावे लागेल. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकते. मात्र कारखान्याच्या क्षमतेनुसार काही वेळेस पाण्याचा ताळेबंद जुळविण्यात अडचण येऊ शकते. अशा स्थितीमध्ये कारखाना हद्दीबाहेरही, गावात व शेतात, डोंगरात पाणी संवर्धनाची योजना राबवण्यास पुढाकार घेऊ शकतात.

त्यासाठी संबंधित पंचायती, शासकीय विभाग यांच्या परवानगी घेणे आवश्यक असेल. केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे २०३० ही अंतिम मुदत असल्यामुळे पुढील सहा वर्षात सर्व साखर कारखान्यांना पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. याकडे आपत्तीप्रमाणे न पाहता कारखान्यांनी इष्टापत्ती समजून जलसंवर्धनाच्या कार्याला त्वरेने सुरुवात करण्याची आवश्यकता आहे.

गोड्या पाण्याच्या उपलब्धतेची मुख्य साधने ही सध्या नद्या, भूजल आणि धरणांतून मिळणारे पाणी हे आहे. मात्र, भविष्यात त्या पाण्याची उपलब्धता ही कमी होत जाणार आहे. त्याचवेळी साखर, इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन अशा उत्पादनांची मागणी वाढत राहणार आहे.

म्हणजेच एका बाजूला साखर कारखान्यासाठी ऊस क्षेत्र, उत्पादकतेमध्ये वाढ करावी लागेल, तर दुसऱ्या बाजूला कारखाना चालवण्यासाठी आवश्यक पाण्याची शाश्वती टिकवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण काही वेळा क्षेत्रात ऊस उपलब्ध असला तरी कारखाना चालवायला पाणी उपलब्ध नसण्याची परिस्थिती उद्भवू शकते.

Sugar Factory
Gadhinglaj Sugar Factory : जिल्हा बँकेने अर्थसहाय्य करूनही गडहिंग्लज साखर भाडेतत्त्‍वाच्या वाटेवर

साखर कारखाना नेतृत्वाच्या मागील पिढीने ऊस उपलब्धता वाढविण्यासाठी व पाणी उपलब्धतेसाठी भरीव उपक्रम राबवले. नगर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी शक्य ते सगळे पर्याय वापरून पाणी उपलब्धता शाश्वततेकडे नेण्याचा प्रयत्न केला.

उदा.ओढ्यांवर बंधारे बांधणे, लिफ्ट इरिगेशन योजना राबवणे, गाव तळी करणे, तळ्यातला गाळ काढणे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, ठिबक सिंचनासाठी कर्ज उपलब्ध करणे इ. आता पुढील टप्प्यावर पाणी संवर्धन, पुनर्वापर यावर काम करण्याची आवश्यकता आहे.

साखर कारखान्यांना त्यांच्या हद्दीत पाणी उपलब्धता वाढवण्यासाठी खूप वाव आहे. उसाच्या रसापासून मिळणारे पाणी कारखान्यात विविध कामासाठी वापरून झाल्यावर त्यावर थोडीशी प्रक्रिया करून ते उपलब्ध होते.

कारखान्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी पाणी मिळू शकते. कारखान्याच्या सर्व इमारतीवर व भोवतालच्या जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी गोळा करून किंवा जमिनीत मुरवून.

साखर निर्मितीतून उपलब्ध होवू शकणारे पाणी

साखर निर्मिती प्रक्रियेत ऊस पिळून मिळणाऱ्या रसात असलेले पाणी = ७०० लिटर / टन

कुलिंग टॉवर व इतर बाबींसाठी कारखान्यात वापरले लागणारे पाणी = १५०-२०० लिटर/टन

शिल्लक पाणी = ५०० लिटर/टन

कारखान्यात ताजे पाणी वापरून वाफ तयार केली जाते. त्याच वाफेपासून वीज निर्मितीही केली जाते. तीच वाफ थंड करून तयार होणारे पाणी = ९० लिटर/ टन.

एकूण उपलब्ध होणारे पाणी (३+४) = ५९० लिटर/ टन.

आता कारखान्याची गाळप क्षमता पाच लाख टन प्रतिवर्ष इतकी धरली तर एका हंगामात उपलब्ध होणारे पाणी =२९.३ कोटी लिटर पाणी.

Sugar Factory
Sugar, Ethanol Production : साखर, इथेनॉल उत्पादनाच्या अचूक माहिती एपीआय प्रणाली

पावसाचे पाणी साठवणीतून (रेन वॉटर हार्वेस्टींग) उपलब्ध होणारे पाणी

(यासाठी पुढील आकडेवारी गृहीत धरली आहे.)

कारखाना क्षेत्र : २० हेक्टर

तेथील सर्व इमारतींचे क्षेत्र : २० हजार चौ. मी.

पक्के रस्ते : ३० हजार चौ. मी.

उघडे क्षेत्र : १५ हेक्टर

तेथील वार्षिक पाऊस : ६०० मि..मी. (सरासरी)

सर्व इमारतीसाठी रनऑफ गुणांक ०.९, अभेद्य रस्ते, बाजूच्या गटरांसह साठी रनऑफ गुणांक ०.७, उघडे क्षेत्रासाठी रनऑफ गुणांक ०.५ मानल्यास उपलब्ध होणारे पाणी

इमारतीतील पावसाचे पाणी - २०,००० x ०.९ x ६००/१००० = १०,८०० घ. मी.

रस्त्यांवरील पावसाचे पाणी - ३०,००० x ०.७ x ६००/१००० = १२,६०० घ.मी.

क्षेत्रातून पावसाचे पाणी - १,५०,०००x ०.५x ६००/१००० = ४५,००० घ. मी.

एकूण १ +२ + ३ = ६८,४०० घ. मी.

६८४०० घ. मी. = ६,८४,००,००० लिटर पाणी= सहा कोटी ८४ लाख लिटर पाणी

हे पावसाचे पाणी गाळून बोअरवेलमध्ये सोडल्यास त्याचे पुनर्भरण होऊन भूजल पातळी वाढते.

संपूर्ण महाराष्ट्राची आकडेवारी

महाराष्ट्रातील या वर्षी सुरू असलेले साखर कारखाने

सहकारी = १०३, खासगी =१०४, एकूण=२०७

त्यांनी या वर्षी मार्च ( २०२४ )अखेर केलेले ऊस गाळप = १०३३ लाख टन

अ. प्रति टन उपलब्ध होवू शकणारे पाणी = ५९० लिटर

एकूण उपलब्ध होवू शकणारे पाणी = ११३३ लाख x ५९० = ६६८५ कोटी लिटर

ब. रेन वॉटर हार्वेस्टींगचे किमान पाणी

२१० कारखाने x ६ कोटी लिटर = १२६० कोटी लिटर

क. सांडपाण्यातून परत मिळवू शकणारे पाणी =

२१० कारखाने x १० कोटी लिटर= २१०० कोटी लिटर.

अ + ब + क = ६६८५ + १२६० + २१०० = ९९८५ कोटी लिटर.

ही आकडेवारी सर्वात लहान कारखान्याचे क्षेत्रफळ व सर्वात कमी गाळप क्षमता असलेले कारखाने गृहीत धरून केलेली आहे. या सर्व पाणी संवर्धनासाठी तुलनेने खूप नगण्य खर्च येईल. पण सर्व साखर कारखाने पाण्याबाबत स्वयंपूर्णतेकडे नक्कीच वाटचाल करतील, यात शंका नाही.

या बाबत रांजणी (जि. धाराशिव) येथील नॅचरल शुगर या साखर कारखान्याने बी. बी. ठोंबरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काही बाबतीत योग्य यंत्रणा बसवून शून्य विसर्ग (झिरो डिस्चार्ज) पर्यंत केव्हाच मजल मारली आहे.

त्यांचा कारखाना सांडपाण्यापासून मिथेन व कर्ब वायूचे व्यावसायिक उत्पादन घेत असल्याचेही समजते. म्हणजे प्रत्येक साखर कारखान्याने थोडा पुढाकार घेतला तर ही पाणी बचत नक्कीच शक्य होऊ शकते.

कारखान्याला सांडपाण्यातून उपलब्ध होऊ शकणारे पाणी

साखर कारखान्याच्या सांडपाण्याचे रासायनिक गुणधर्म साधारणपणे पुढील प्रमाणे असतात.

क्र. गुणधर्म मूल्य

१. प्रवाही सांडपाण्यावर फवारणी तलावासह सांडपाण्याचे प्रमाण १८०० - २००० घनमीटर प्रति दिन.

२. सामू (पीएच) ५.५ – ६.५

३. निलंबित घन पदार्थ, मिलिग्रॅम प्रति लिटर ४२५

४. एकूण विरघळलेले घटक, कमाल, मिलिग्रॅम प्रति लिटर २१००

५. BOD (जैविक ऑक्सिजनची मागणी), ५ दिवस, २० अंश सेल्सिअस, मिलिग्रॅम प्रति लिटर २००० - २५००

६. COD (रासायनिक ऑक्सिजन मागणी), मिलिग्रॅम प्रति लिटर ४५०० - ५०००

७. तेल आणि ग्रीस, मिलिग्रॅम प्रति लिटर १००-१२०

यातील हानिकारक घटक काढून टाकून पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य आहे.

कारखान्यात तयार होणारे सांडपाणी = १५०-२०० लि./ टन

या सांडपाण्यावर जैविक प्रक्रिया करून ते ही वापरण्यायोग्य करता येते.

प्रतिवर्ष पाच लाख टन गाळप करणाऱ्या कारखान्यात उपलब्ध होणारे पाणी = २०० x ५लाख = १०कोटी लिटर.

कारखाना संवर्धन करू शकणारे पाणी = अ + ब + क = २९.३ + ६+ १० = ४५.३ कोटी लिटर

हे दरवर्षी उपलब्ध होऊ शकणारे ४५.३ कोटी लिटर पुनर्वापर योग्य पाणी कारखान्याच्या शेती व अन्य अनेक कामांसाठी वापरता येते. परिणामी त्यासाठी अन्य जलस्रोतांवर अवलंबित्व कमी होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रक्रियेविना सांडपाणी बाहेर सोडल्याने होणारे परिसरातील जलस्रोतांचे प्रदूषण रोखले जाते. परिणामी भूजल, मानवी आरोग्य, जनावरांचे आरोग्य यावरील विपरीत परिणाम टळतात.

सतीश खाडे ९८२३०३०२१८,

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com