Women's Farmer Company : सोलापूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरपासून १५ किलोमीटरवर असलेले बोरामणी हे माझे गाव. माझे शिक्षण पदवीपर्यंत झाले. मला पूर्वीपासून सामाजिक कार्याची आवड होती. पण त्यातही शेतीक्षेत्रात काही तरी करायचं या हेतूने त्यात उतरले. पती योगेश माळगे यांनीही पाठिंबा दिला.
बोरामणी आणि परिसर पहिल्यापासूनच भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. हे हेरून मी आठ वर्षांपूर्वी महिलांना एकत्रित केले. त्यांचे शेतकरी गट स्थापन केले. प्रथम दहा गटांच्या माध्यमातून १०० हून अधिक महिला जोडल्या गेल्या. त्यातून भाजीपाला उत्पादन आणि विक्रीसह अन्य छोटे-छोटे उद्योग सुरू केले. गट तयार झाले.
महिला एकत्रित झाल्या. त्यातून पुढे शेतीला लागणाऱ्या निविष्ठा एकत्रितपणे खरेदी करू लागलो. त्यामुळे पैशांची बचत होऊन आर्थिक फायदा झाला. अनेक अडचणी आल्या, पण प्रत्येक वेळी एकमेकांच्या विचारविनिमयातून त्यातून मार्ग काढत गेलो. या सर्व धडपडीतून सन २०१५ मध्ये यशस्विनी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी आम्ही उभारली. ही राज्यातील महिलांची पहिली शेतकरी कंपनी आहे. कार्य सोपे नव्हते.
आव्हाने खूप होती. पण कंपनीच्या सदस्यांना लघुउद्योगासाठी शाश्वत स्वरूपाची काय मदत करता येईल याचा विचार केला. त्यातूनच सोलापूर, पुणे, मुंबई, बारामती या भागांमध्ये प्रदर्शने, चर्चासत्रे, प्रयोगशील शेतकऱ्यांकडे अभ्यास सहली असे उपक्रम राबविले. त्यातून महिलांचे आत्मबल वाढले. घरातून बाहेर पडून प्रत्यक्ष महिला प्रदर्शने, चर्चासत्रांचा अनुभव घेत होत्या ही समाधानाची बाब होती. त्यांच्या विचारांना चालना मिळाली. एक उमेद जागी झाली.
बत्तीस गावांमध्ये चौदाशे सभासद
बोरामणीसह तांदूळवाडी, वडजी, पिंजारवाडी, कर्देहळ्ळी, कासेगाव, कुंभारी आदी दक्षिण सोलापूरसह अक्कलकोट तालुक्यातील ३२ गावांत आमच्या महिला कंपनीचा विस्तार झाला. तब्बल १४०० महिला आमच्या कंपनीच्या सभासद झाल्या हे सांगताना अभिमान वाटतो. कंपनीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. दर्गनहळ्ळीच्या बेबीनंदा बिराजदार उपाध्यक्ष आहेत.
संचालक मंडळामध्ये सौ. शोभा कळके (मुस्ती), सौ. उषा पांघरकर (कासेगाव), भारती विभूते (बोरामणी), सुरेखा होडगे (बोरामणी), अनिता खेडे (बोरामणी), नजमून शेख (बोरामणी), चन्नमा हेबळे (बोरामणी), राधा चेंडके (बोरामणी), मैनाबाई विभूते (दर्गनहळ्ळी), राजश्री माळी (बोरामणी), सुवर्णा आवटे (बोरामणी) यांचा समावेश आहे. कृषी विभाग, आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन व सहकार्य वेळोवेळी आम्हाला मिळते.
भाजीपाला अन् प्रक्रिया
आमच्या बोरामणीला सोलापूर बाजार समिती जवळ असल्याने आधीपासूनच आम्ही भाजीपाला उत्पादनापासून सुरुवात केली. पुढे भाजीपाला उत्पादक महिलांचे स्वतंत्र गट तयार केले. ताजा भाजीपाला बाजार समितीत जाऊ लागला. रोख पैसे मिळू लागले. पुढे ‘यशस्विनी’तर्फे भाजीपाला वाहतुकीसाठी टेम्पो घेण्यात आला.
सोलापूरसह मुंबई, पुण्यापर्यंत तो धावू लागला. तेथील अनेक मॉलपर्यंत भाजीपाला पोहोचू लागला. मग धान्याचे ‘ग्रेडिंग’, ‘क्लीनिंग’ या प्रक्रिया क्षेत्रात आम्ही पाऊल ठेवले. त्यासाठी आवश्यक यंत्रे खरेदी केली, आज प्रति किलो दोन रुपये दराने तूर, हरभऱ्यावर आम्ही प्रक्रिया करून देतो. सन २०२१ मध्ये १५ टन, २०२२ मध्ये ३५ टन, तर यंदा जवळपास ५० टनांपर्यंत प्रक्रिया करण्यापर्यंत आम्ही मजल मारली आहे.
ज्वारीवर प्रक्रिया
आमचं सोलापूर पूर्वीपासूनच ज्वारीचं कोठार म्हणून ओळखलं जातं. फक्त ज्वारी विक्री करणं हे आमचं उद्दिष्ट नव्हतं. ज्वारीचं मूल्यवर्धन झालं, तर त्यातून अधिक पैसे मिळणार होते. कायमस्वरूपी रोजगारही उपलब्ध होणार होता.
हे लक्षात घेऊन आम्ही ज्वारी प्रक्रिया उद्योगाकडे वळलो. त्यातून चिवडा, रवा, पोहे, शेवया, चकली, बिस्किटे, लाडू, लाह्या, डोसा पीठ, पापड, सांडगे आदी २५ प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली. आज ही सर्व उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत.
(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.