Desi Gopalan : शेती, देशी गोपालनामध्ये रमलाय ‘कारगिल योद्धा’

सैनिकी पंरपरा असलेल्या चिंचणेर वंदन (ता.जि. सातारा) गावातील सुधाकर विष्णू बर्गे यांनी सैन्यदलात वीस वर्षे उत्तमरीत्या देशसेवा बजावली. सैन्य दलातून निवृत्त होताच ते शेती आणि देशी गोपालनामध्ये रमले.
Desi Gopalan
Desi GopalanAgrowon
Published on: 
Updated on: 

सैनिकी पंरपरा असलेल्या चिंचणेर वंदन (ता.जि. सातारा) गावातील सुधाकर विष्णू बर्गे (Sudhakar Barge) यांनी सैन्यदलात वीस वर्षे उत्तमरीत्या देशसेवा बजावली.

सैन्य दलातून निवृत्त होताच ते शेती आणि देशी गोपालनामध्ये रमले. ऊस शेतीसोबत देशी गाईचे दूध, (Cow Milk) तूप आणि पंचगव्य दिव्यांच्या विक्रीतून त्यांनी कुटुंबाची आर्थिक बाजू भक्कम केली आहे.

सुधाकर बर्गे गावाचे विद्यमान सरपंच असून, शाश्‍वत ग्राम आणि शेती विकासालादेखील चांगली दिशा दिली आहे.

Desi Gopalan
Desi Cow Rearing : देशी गोआधारित वैदिक शेतीचे शाश्‍वत, समृद्ध मॉडेल

सातारा जिल्ह्यातील सैनिकी परंपरा असलेले चिंचणेर वंदन हे गाव. येथील सुमारे १७०० जण भारतीय सैन्यदलात वेगवेगळ्या विभागात कार्यरत होते.

सध्या २०० जण प्रत्यक्ष सैन्यदलात सेवा बजावत आहेत. कारगिल युद्धामध्ये सहभागी असलेले सुधाकर विष्णू बर्गे याच गावाचे. त्यांचे वडील रेल्वे पोलिस दलामध्ये कार्यरत होते.

गावाला सैनिकी पंरपरा असल्याने सुधाकर हे देखील बीएस्सी प्रथमवर्ष शिक्षण सुरू असतानाच १९९५ मध्ये भारतीय सैन्यदलातील ‘कोर ऑफ सिग्नल्स’ या विभागात भरती झाले.

वीस वर्षे त्यांनी लेह, लडाख, नागालॅंड, आफ्रिकेतील सुदान देशामध्ये सेवा बजावली. कारगिल युद्धात सहभागी होत पाकिस्तानी सैन्याला धूळ चारली.

सैन्य दलातील गौरवशाली सेवा पूर्ण केल्यावर नोकरीच्या मागे न लागता कुटुंबाच्या शेतीमध्ये झोकून दिले आहे.

Desi Gopalan
Desi Cotton : सुभाष शर्मा यांचा देशी कापूस वाण लागवडीचा प्रयोग

शेती, पूरक उद्योगाला सुरुवात ः
नोकरीच्या अखेरीच्या काळात सुधाकर बर्गे यांनी शेती आणि पूरक उद्योगाचा आराखडा तयार केला होता. त्यांच्या कुटुंबाची चार एकर बागायती शेती आहे.

सैन्यदलातील सेवा पूर्ण होताच त्यांनी भावाच्या मदतीने सुधारित पद्धतीने ऊस शेती सुरू केली. जोडधंदा म्हणून शेळीपालनाचे नियोजन केले.

२०१५ मध्ये तीन गुंठे जागेत मुक्तसंचार गोठा तयार करून पंजाबमधून बिटल जातीचा एक बोकड आणि सात शेळ्या आणल्या.

दोन वर्षांत शेळ्यांची संख्या साठ वर गेली. पारंपरिक पद्धतीने शेळी, बोकडांची विक्री न करता ऑनलाइन पद्धतीने त्यांनी विक्री केली.

याच दरम्यान एका अभ्यास दौऱ्यासाठी बंगळूर येथे गेले असताना त्यांनी देशी गोपालन आणि पंचगव्य दिव्यांची माहिती मिळाली. त्यातील व्यावसायिक संधी लक्षात घेत देशी गोपालन करण्याचा निर्णय घेतला.

Desi Gopalan
एक उपेक्षित  फ्रंटलाइन योद्धा! 

शेती, गाईंचे व्यवस्थापन ः
जमीन सुपीकतेसाठी पुरेसे शेणखत तसेच पंचगव्य दिवे निर्मितीसाठी बर्गे यांनी २०१८ मध्ये शेळीपालन बंद करून देशी गाईंच्या संगोपनास सुरुवात केली.

पहिल्यांदा परिसरातील शेतकऱ्यांकडून भाकड देशी गाई घेतल्या. दिवेनिर्मिती आणि विक्रीसाठी आवश्यक माहिती घेतली. पंचगव्य दिवे निर्मितीसाठी यंत्र खरेदी केले.

गावशिवारात देशी गाईचे दूध आणि तुपाची मागणी वाढू लागल्याने त्यांनी टप्प्याटप्प्याने दुधाळ गीर गाईंची खरेदी केली. सध्या त्यांच्याकडे दहा गीर गाई असून, सहा दुधात आहेत.

दररोज २५ लिटर दूध संकलन होते. दुधापासून दही, ताक, तूप निर्मिती केली जाते. याचा दिव्यांच्या निर्मितीसाठी वापर होतो.

गाईंचे व्यवस्थापन आणि पंचगव्य दिव्यांच्या निर्मितीबाबत बर्गे म्हणाले, की मी सकाळी साडेपाच वाजता गोठ्यातील व्यवस्थापन सुरू करतो.

गोठ्याची स्वच्छता करून गाईंची धार काढली जाते. त्यानंतर गाईंना मुक्त संचार गोठ्यात सोडले जाते. जमा झालेले ताजे शेण वेगळे करून चांगल्या प्रकारे वाळविले जाते.

त्यानंतर मिक्सरद्वारे एकसारखे बारीक केले जाते. त्यामध्ये योग्य प्रमाणात दही, ताक, दूध, तूप तसेच भाताची पेज मिसळली जाते. यंत्राचा वापर करून या मिश्रणापासून पंचगव्य दिवे तयार करतो. दिवे निर्मिती आणि विक्री नोव्हेंबर ते जून या कालावधीमध्ये होते.

मागणीनुसार मोकळे तसेच तुपाचे दिवे तयार केले जातात. दरवर्षी सरासरी आठ लाख दिवे बनवतो. मोकळा दिवा तीन रुपये, तुपाचा दिवा सात रुपये प्रति नग या दराने विक्री होते. या व्यवसायामध्ये खर्च वजा जाता वीस टक्के नफा मिळतो.

ऑनलाइन पद्धतीनेच सण-समारंभाच्या काळात पंचगव्य दिव्यांची विक्री चांगल्या प्रकारे होते.

देशभरातील विविध शहरे तसेच मलेशिया, सिंगापुरातील ग्राहकांना कुरिअर, पोस्टाद्वारे योग्य पॅकिंगमध्ये दिवे पाठवतो.

याचबरोबरीने गीर गाईचे तूप २४०० रुपये किलो या दराने विक्री केली जाते. मागणीनुसार धूप कप, धूपकांडी, शेणी तयार करतो.

या व्यवसायास मुक्ताई लघुउद्योग असे नाव दिले असून, बचत गटातील दहा महिलांना कायम स्वरूपी रोजगार दिला आहे.


शेती नियोजनाबाबत बर्गे म्हणाले, की गोठ्यातून दरवर्षी एक ट्रॉली शेणखताची उपलब्धता होते. त्याचा शेतीमध्ये वापर करतो.

गोमूत्रापासून कीटकनाशक तयार करून ते ऊस, मका आणि चारा पिकांवर फवारले जाते. खतामुळे जमिनीची सुपीकता चांगल्या प्रकारे वाढत आहे.

सध्या दोन एकरांमध्ये उसाच्या को- ८६०३२ जातीची लागवड असून एकरी साठ टनांचा उतारा मिळतो. एक एकर चाऱ्यासाठी मका आणि उर्वरित क्षेत्रावर हत्ती गवत आणि हंगामी पिकांची लागवड असते.

गावातील शेतकरी श्री ज्योतिर्लिंग पुरुष शेतकरी गटाचा मी सदस्य असून, दर महिन्याच्या एका रविवारी शेतीशाळा आयोजित केली जाते. ऊस उत्पादन वाढ तसेच सोयाबीन बीजोत्पादनावर शेतकरी गटाने भर दिला आहे.

कुटुंबाची साथ मोलाची...
देशी गोवंशपालन तसेच प्रक्रिया उद्योगात सुधाकर बर्गे यांना आई मुक्ताबाई, पत्नी सीमा, मुलगी सृष्टी तसेच बंधू शरद, भावजय अनिता, पुतणी अक्षता यांची चांगली मदत होते.

याचबरोबरीने बचत गटातील सदस्या माया साठे यांचे प्रक्रिया उद्योगात चांगले सहकार्य मिळाले आहे.


ग्रामपंचायतीतर्फे गावासाठी ट्रॅक्टर
सुधाकर बर्गे हे फेब्रुवारी २०२१ पासून गावचे सरपंच म्हणून कार्यरत आहेत. ग्रामविकासाच्या बरोबरीने शेती विकासावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

महिला बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे चिंचणेर महोत्सव आयोजित केला होता. यातून उत्पादनांची चांगली विक्री झाली.

ग्रामपंचायतीतर्फे अवजारे बॅंक विकसित होत आहे. यातून शेतकऱ्यांना मशागतीसाठी आजपासून ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

यामुळे बाजारभावापेक्षा कमी दरात ट्रॅक्टरद्वारे मशागतीची सर्व कामे केली जाणार आहेत.

संपर्क ः सुधाकर बर्गे, ९५७९४४२४७२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.