सेंद्रिय, रासायनिक पद्धतीने दर्जेदार द्राक्ष उत्पादन

मुर्ठा (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील युवा शेतकरी गोपाळ सुरवसे वडिलांच्या द्राक्षशेतीचा जुना वारसा पुढे चालवीत ७५ एकरांत दर्जेदार उत्पादन घेत आहेत. ५० टक्के प्रत्येकी रासायनिक व सेंद्रिय व्यवस्थापनाद्वारे उत्पादन साधून एकूण क्षेत्रातून शंभर टनांहून अधिक निर्यात साधली आहे.
Gopal Suravase in the vineyard.
Gopal Suravase in the vineyard.
Published on
Updated on

मुर्ठा (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील युवा शेतकरी गोपाळ सुरवसे वडिलांच्या द्राक्षशेतीचा जुना वारसा पुढे चालवीत ७५ एकरांत दर्जेदार उत्पादन घेत आहेत. ५० टक्के प्रत्येकी रासायनिक व सेंद्रिय व्यवस्थापनाद्वारे उत्पादन साधून एकूण क्षेत्रातून शंभर टनांहून अधिक निर्यात साधली आहे. सोलापूर- हैदराबाद महामार्गावर नळदूर्गच्या उत्तरेला मुर्ठा गावात (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) गोपाळ सुरवसे यांची वडिलोपार्जित सुमारे शंभर एकर शेती आहे. त्यात ७५ एकरांत द्राक्ष बाग आहे. पैकी जुनी सुमारे ५५ एकर आणि नवी २० एकर आहे. पाच एकर टोमॅटो आणि अन्य क्षेत्रावर गूळ प्रकल्प आहे. गोपाळ यांचे वडील सत्यवान यांना सुमारे ३५ वर्षांचा द्राक्षशेतीचा अनुभव आहे. गोपाळ यांच्यावरही लहानपणापासूनच शेतीचे संस्कार झाले. पदवीनंतर त्यांनी शेतीलाच पसंती दिली. वडिलांसह आई पवित्रा, पत्नी प्रतीक्षा आणि छोटा भाऊ विक्रम यांच्या मदतीने ते पूर्णवेळ द्राक्षशेतीत रमले आहेत. सेंद्रिय पद्धतीवर अधिक भर सुरवसे गूळ प्रकल्पाकडे वळले त्यावेळी खर्चाचा आकडा वाढला आणि ते आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले. त्यातून मार्ग काढण्यासाठी द्राक्षशेतीतील खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला. मग प्रत्येकी ५० टक्के रासायनिक व सेंद्रिय पद्धतीने काम सुरू केले. रासायनिक खतांचा वापर पूर्ण थांबवून केवळ रासायनिक कीडनाशकांचा वापर करतात. सन २०१९ मध्ये ५५ एकरांत ३०० टन म्हणजे एकरी साडेपाच टनांच्या दरम्यान उत्पादन मिळाले. तुलनेने ते कमी असले तरी दर व उत्पन्न चांगले मिळाले. मात्र प्रयोगांबाबत आत्मविश्‍वास वाढला. तेव्हापासून अभ्यासातून चुका सुधारत, अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेत गोपाळ दर्जेदार उत्पादन घेत आहेत. द्राक्ष बाग नियोजन दृष्टिक्षेपात

  • सर्वाधिक ३५ एकर क्षेत्रावर माणिकचमन. उर्वरित क्षेत्रात टूए क्लोन, तास ए- गणेश, काजूच्या आकारासारखे निवड पद्धतीचे तसेच एसएसएन आदी वाण.
  • प्रत्येकी पाच, दहा, पंधरा एकर याप्रमाणे प्लॉटची वर्गवारी व छाटणी नियोजन.
  • दोन वर्षांतून छोट्या ट्रॅक्टरद्वारे डबलपलटी नांगरणी.
  •  एप्रिल छाटणीवेळी पाचटाचे मल्चिंग.
  • एक चौरस फुटावर एक काडी ठेवून विरळणी.
  • सात ते बारा पानावर शेंडा मारुन बगलफुटी काढल्या जातात.
  • वातावरणानुसार शिफारसीत कीडनाशकांच्या फवारण्या.
  • एप्रिल छाटणीवेळी एकरी २५० किलो सरकी पेंड, २०० किलो निंबोळी पेंड झाडाच्या बुडात दिली जाते.
  • पुढे कॅल्शिअम, फॉस्फरससह सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर. छाटणीनंतर दर पंधरा दिवसांनी एकरी दहा लिटर सोयाबीन दूध, दहा किलो शेंगादाणा पेंड आणि अंड्यांतील बलक यांचा प्रति २०० लिटर पाण्यातून स्लरी म्हणून वापर. सोयाबीन २४ तासांपर्यंत भिजत घालायचे. दुसऱ्या दिवशी भिजलेले सोयाबीन चांगले फुगते. मिक्सरमधून बारीक केल्यानंतर त्यापासून दूध मिळते. शेंगदाणा पेंडही याच पद्धतीने दोन दिवस पाण्यात भिजू घालतात. पाणी गाळून त्याच्या स्लरीचा वापर.
  • ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, पीएसबी, केएसबी आदींचाही एकरी तीन किलो प्रमाणात स्लरीसोबत वापर.
  • ऑक्टोबर छाटणीआधी सप्टेंबरमध्ये पाच ते सात ट्रॅाली शेणखत. ऑक्टोबर छाटणीवेळी एकरी २५० किलो सरकी पेंड आणि एकरी दोनशे किलो निंबोळी पेंडीचा वापर.
  • माल फुगेपर्यंत दर पंधरा दिवसांतून उसाची मळी किंवा गुळाच्या पाण्याची शेणासह झाडाच्या बुडात आळवणी.
  • पाण्यासाठी भन्नाट आयडिया

  • बाग २६ वर्षे जुनी आहे. बावर पद्धत असून लागवडीचे अंतर १० बाय ५ फूट आहे.
  • अनेक वर्षांपासून विकसित झालेल्या ‘रूट झोन’ला शंभर टक्के सिंचन व्हावे, माल फुगवणीच्या महत्त्वाच्या काळात, तसेच उन्हाळ्यातही पाणी काटेकोर मिळावे यासाठी गोपाळ यांनी भन्नाट कल्पना लढवली. त्यांनी बागेच्या वरून पाइप घालून त्यास ‘फ्लेक्सीबल लॅटरल व ड्रीपर’ची व्यवस्था केली. दहा फुटी ओळीत एकदा डाव्या पाच फुटांमध्ये व एकदा उजव्या पाच फुटांमध्ये गरजेनुसार सिंचन होते. हीच पाईप जमिनीत अंथरण्यासाठी केवळ खोदण्याचा खर्चच ६० हजारांपुढे आला असता.
  • तर पाइप उभारण्याचा खर्च केवळ ५० हजारांत आला. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व द्राक्षशास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सावंत यांनीही या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
  • ‘पार्शल रूट ड्राइग’ चच ही पद्धत असून त्याद्वारे जुन्या बागेत पाणी काटेकोरपणे देण्याचा हा सुस्त्य प्रयोग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
  • उत्पादन व निर्यातीत आघाडी -एकरी किमान १५ टन व त्याहून अधिक उत्पादन. -नाशिक, पुणे, मुंबई येथील व्यापारी थेट बांधावर येतात. त्यांना एकाचवेळेस किमान १०० ते त्याहून अधिक टन माल मिळतो. त्यामुळे दर ठरवणे सोपे होते. -द्राक्षाला वेगळी गोडी, आकार आणि वजनही चांगले. -सन २०१९ मध्ये १०० टन, २०२० मध्ये ७० टन व २०२१ मध्ये १०० टन निर्यात. यात युरोप, बांगला देश, रशिया, श्रीलंका आदींचा समावेश. -यंदाही सुमारे १५० टन द्राक्षे निर्यातीसाठी उपलब्ध असतील. -निर्यातीसाठी दर किलोला ७० ते ११० रु., तर लोकलसाठी ३० ते ५० रुपये. संपर्क ः गोपाळ सुरवसे, ८८३०४३७३४३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com