Student Self Education : विद्यार्थी स्वतः शिकणार...

Student Education : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कायम शिकवत राहण्यापेक्षा विद्यार्थी स्वयंप्रेरणेने स्वतः शिकेल असे पाहिले पाहिजे. मुलांची अध्ययन कौशल्ये विकसित करण्यासाठी शिक्षक-शिक्षिका म्हणून आपली भूमिका बदलावी लागणार आहे.
Student Education
Student EducationAgrowon

गंगा बाकळे

Role of Teachers : मी   स्वतः शिक्षिका आहे. विद्यार्थ्यांना शिकवणे हा शिक्षकांचा ‘धर्म’ आहे, याची जाणीव मला सतत आहे. पण माझ्या शिक्षिका सेवाकाळात पहिल्यांदाच आपण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे चालक किंवा वाहक नसून एक सूचक आणि सुलभक आहोत, ही नवी दृष्टी आताच ‘अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन’ (२०२४) हे पाचदिवसीय प्रशिक्षण शिक्षकीपेशात विद्यार्थ्यांसारखे भरपूर शिकून, प्रचंड लेखी कामाचा अनुभव घेतल्यानंतर आली.

शिक्षण घेणारी आणि वैश्‍विक विचार करणारी वर्तमान पिढी जागतिकीकरणात सक्षम झाली पाहिजे; टिकली पाहिजे आणि परिपूर्ण माणूस म्हणून कृतार्थ जीवन जगली पाहिजे; या ध्येयाने प्रेरित होऊन प्रस्तुत प्रशिक्षण महाराष्ट्रभर अनेक टप्प्यांत राबवले जात आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कायम शिकवत राहण्यापेक्षा शाळेत विद्यार्थी स्वयंप्रेरणेने स्वतः शिकेल हे पाहिले पाहिजे, यासाठी आपण त्यांचे सुलभक होणे गरजेचेच आहे. मुलांची अध्ययन कौशल्ये विकसित करण्यासाठी शिक्षक-शिक्षिका म्हणून आपली भूमिका बदलावी लागणार आहे.

काळानुरूप ज्ञानात-माहितीत बदल होतोय. व्यवस्थापनही अनेकांगी होत आहे. म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांची कौशल्ये गतीने वाढविण्यासाठी कार्य करायचे आहे. आता शिक्षकांनी ज्ञान-माहितीसाठी ३० टक्के, व्यवस्थापनासाठी २० टक्के आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी ५० टक्के भारांश द्यावा, असे मी स्वतः नियोजन केलेले आहे. सर्वांना शिकवले यापेक्षा सर्व शिकले ही नवीन संकल्पना कृतीत आणायची आहे. उत्पादकता निर्माण करणारे शिक्षण सामाजिक कार्याची आणि प्रगतीची दारे स्वयंचलित होण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

बदलत्या काळाचा ‘वेध’ घेत स्वतःला आणि विद्यार्थ्यांना अद्ययावत ठेवण्यासाठी स्वतःचे आणि विद्यार्थ्यांचेही बदल स्वीकारावे लागतील. ‘युनेस्को’ने सांगितल्याप्रमाणे म्हणे, ‘लर्निंग टू लर्न’ म्हणजेच, कायम शिकत राहणे म्हणजेच कायम अद्ययावत होणे. भविष्याचा अंदाज घेऊन शिकत राहणारी, स्वतःला अद्ययावत ठेवणारी मुले हीच भविष्यासाठी तयार झालेली मुले असतील. विशेष बुद्धिमत्ता असणाऱ्या मुलांप्रमाणेच सामान्य बुद्धिमत्तेच्या मुलांनाही संधी देणे, हा सर्वात्मकता जपणारा शिक्षणाचाच भाग झालेला आहे.

Student Education
New Education Policy : नवीन शिक्षण धोरणाचा उद्योग क्षेत्राला फायदा

त्या त्या वर्गातील अध्ययन निष्पत्ती साध्य करण्याबरोबरच चिकित्सक विचार-सर्जनशीलता-सहयोग-संवाद-आत्मविश्‍वास-करुणा हे सहा ‘सी’ मुलांमध्ये विकसित करण्याचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे. शिक्षणाचा सर्वांगीण चेहरा उजळण्याकरिता उत्कट प्रयत्नांना गुणवत्तेची जोड द्यावी लागणार आहे. ‘अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन’ वाचन साहित्यात फार-फार बारीक गोष्टी आणि कृतीयुक्त पूर्ततेसाठी उत्तम नियोजन दिलेले आहे.

त्यांचे म्हणणे असे आहे, की यशस्वी व्यक्ती एक ते चार अशा क्रमाने विचार करते, तर इतरांवर बोट ठेवणारी व्यक्ती चार ते एक असा विचार करते. अशा व्यक्तीच्या मते, आधी शासनाने ठरवावे, मग भौतिक सुविधा द्याव्या, नंतर समाज सोबत यावा, मग मी काम करेन. मी हा क्रम मला यशस्वी होण्यासाठी चार ते एक करावा, या मताची आहे.

विद्यार्थ्यांच्या हाती टॅब्लेट किंवा टॅब आवश्यक असणार आहे. सर्व जण म्हणतात, हे तंत्रज्ञानाचे युग आहे. आपण तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात करत राहू. शिक्षक म्हटल्यानंतर शास्त्र आणि शास्त्रीपणा डोकावतोच. पण आता मुलांना समजून घेत शिक्षकांनी ‘माणूस’ होण्यावर भर दिलेला आहे. विद्यार्थ्यांचा सन्मान, त्यांच्या जिज्ञासूवृत्तीचा सन्मान शिक्षक करणार असून, त्यांना आत्मविश्‍वासाचे प्रबलन देणार आहेत.

यातून विद्यार्थ्यांच्या शिकण्याचा आनंद वाढणार आहे. या माध्यमातून मुले स्वतः शिकायला लागतात. ‘शिक्षकाचे काम अर्ध्यावर येते, परिणाम दुप्पट आणि आनंद तिप्पट मिळतो.’ या प्रशिक्षणात शैक्षणिक कार्यकर्ते आणि परभणीचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) गणेश शिंदे सहभागी होते. शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले, की राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (२०२१) मध्ये परभणी जिल्ह्यातील मुलांची गणित विषयाची ३३ टक्के आणि विज्ञान विषयाची ३८ टक्के शैक्षणिक गुणवत्ता आहे.

Student Education
Educational Abhiyan : ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान यशस्वी करा : पाटील

या प्रशिक्षणानंतर ती ६६ व ७६ टक्के अशी दुप्पट येण्यासाठी शिक्षकांनी आपल्या कार्याचा सुगंध आणि विद्यार्थ्यांच्या शिकण्याचा विश्‍वास कौशल्याने विकसित करावा. शिक्षक सुलभक आणि विद्यार्थी शिकणार हा या प्रशिक्षणाचा विचार आणि चळवळ राज्यभर लागू होणारी आहे.

असर (ॲन्युवल स्टेट्‍स ऑफ एज्युकेशन रिपोर्ट) अर्थातच, असर पातळी म्हणजेच प्रथम संस्थेकडून मूलभूत संकल्पनांवर आधारित मूल्यमापन केले जाते. ज्यामध्ये मुलांचे वाचन, संख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रिया या क्षमता पाहिल्या जातात. नॅस (नॅशनल अचिव्हमेंट सर्वे) मुलांच्या मूल्यमापनाची ही दुसरी पातळी आहे. या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणामध्ये वर्गनिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती पडताळण्यात येतात.

पीसा (प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडन्ट असेसमेंट) अर्थातच, जागतिक स्तरावरील मूल्यमापन म्हणजे पीसा. ओईसीडी (द ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट) हा जगातील श्रीमंत देशांच्या समूहाने एकत्रित येऊन विस्तारित केलेला कार्यक्रम आहे.

यामध्ये गणित, विज्ञान आणि वाचनामधील विद्यार्थ्यांची कामगिरी पाहिली जाते. या ‘पीसा’चा उद्देश विद्यार्थी जागतिक स्तरावर व्यक्ती म्हणून विकसित होणे हा आहे. खेडेगाव-वस्ती-वाडी-तांड्यापासून ते जागतिक वेध आता शिक्षणात रुजू झालेला आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० मध्ये प्रारंभी आलेल्या सहा ‘सी’चा समावेश आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार कार्यसिद्धीसाठी शिक्षकांना सज्ज करण्यात येत आहे. याद्वारे जागतिक शिक्षणाच्या पटलावर आपण संधीसाठी आसुसलेलो असले पाहिजे, हा मोठा आवाकाही आपणांस जाणवतो. यासाठी विद्यार्थी-शिक्षक-मुख्याध्यापक-पालक-केंद्रप्रमुख-शिक्षण विस्तार अधिकारी-गटशिक्षणाधिकारी-उपशिक्षणाधिकारी-शिक्षणाधिकारी सर्वजण एकमेकांना शिकण्याचे ‘आव्हानदाते’ आणि ‘आव्हानकर्ते’ या दुहेरी भूमिका सजगपणे निभावणार आहेत.

मुले शिकण्याबरोबरच त्यांच्या खेळ व व्यायाम, छंद-आवड-कला जपाव्या लागतील. सद्‍गुणांचे संवर्धन होईल. विद्यार्थी सहाध्यायी समूह किंवा विषयमित्रांसोबत शिकू लागलेत. मित्रांसोबत त्यांचे भावविश्‍व समरस होत आहे. ते पुस्तकांचे सोबती झालेले आहेत. मुलांचे स्वतःचे प्रश्‍नोत्तरे कौशल्य, ग्रंथालयाचा महत्तम उपयोग, निरीक्षण, प्रकल्प, संशोधन, सहल आणि भेटीद्वारे ते चौकस होतील आणि त्यांच्यात चुरस वाढेल.

शिक्षकांना समयभान-सौंदर्यजाण आणि समृद्धीचे आदानप्रदान करावे लागेल. आपल्याकडे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा आणि शिक्षण देणाऱ्या समविचारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वेचक कृतींचा परिणाम दृश्य स्वरूपात अनुभवास येणे अगत्याचे आहे. त्यासाठी शिक्षकांचा पीएलसी (प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडन्ट असेसमेंट) व्हॉट्सॲप ग्रुप तयार करूयात. ‘तुझ्या गळा-माझ्या गळा/फुलवू शिक्षणाचा मळा,’ एवढ्यासाठीच हा लेखन प्रपंच!

(लेखिका प्राथमिक पदवीधर शिक्षिका आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com