
Chh. Sambhajinagar News : पाण्याशिवाय कोणत्याही फळपिकाचे शाश्वत उत्पादन घेणे शक्य नाही शिवाय कष्टाचीही तयारी आवश्यक त्यामुळे कवियत्री बहिणाबाई म्हणतात तसे, अंगी नाही बळ, दारी नाही आड, त्याने फळझाड लावू नये... असा सल्ला फळबाग तथा आंबा तज्ज्ञ व महाकेसर आंबा बागायतदार संघाचे उपाध्यक्ष डॉ. भगवानराव कापसे यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात गुरुवारी (ता. १७) महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क, अर्थात मॅग्नेट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे कृषी व आत्मा विभाग तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आंबा उत्तम कृषी पद्धती बाबत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. कापसे बोलत होते.
या प्रशिक्षणाच्या उद्घाटनाला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, उपविभागीय कृषी अधिकारी भाग्यश्री पठारे, कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. दीप्ती पाडगावकर, एमसीडीसी पुणेचे मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप, मॅग्नेटचे विभागीय प्रकल्प अधिकारी अरुण नादरे, के. बी. एक्स्पोर्टचे लक्ष्मण पाटील, समीर खिल्लारे, कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. संजूला भावर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होते.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी प्रशिक्षणाच्या सुरुवातीला ऑनलाइन संदेश व शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक श्री. नागरे यांनी केले. डॉ. कापसे म्हणाले, की जगातील एकूण आंबा उत्पादनापैकी निम्मा वाटा भारताचा असला तरी निर्यातीत मात्र भारत प्रचंड मागे आहे. निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यात शासकीय धोरण यशस्वी ठरताना दिसत नाही.
पाकिस्तानसारख्या छोट्या देशातून सुमारे सव्वादोन लाख टनापर्यंत आंब्याची निर्यात होत असताना भारतातून आंबा निर्यातीचा आकडा मात्र अत्यंत कमी आहे. हेक्टरी उत्पादकतेतही इतर देशाच्या तुलनेत भारत व महाराष्ट्र मागेच आहे. देशातून निर्यात होणाऱ्या एकूण आंबा उत्पादनापैकी ५१ टक्के केसर निर्यात होतो. त्यातही सुमारे ८८ टक्के केसर हा गुजरातचा तर केवळ १२ टक्के महाराष्ट्राचा केसर आंबा निर्यात होतो.
निर्यातक्षम केसर आंबा उत्पादन वाढीची मोठी संधी असून त्यासाठी शास्त्रोक्त व निर्यातीत आघाडीवर असलेल्या देशातील काही तंत्र आत्मसात करून तशा बागांचे क्लस्टर निर्माण कराव लागेल.
यावेळी श्री. कापसे यांनी लागवडीपासून छाटणी, खत व्यवस्थापन, फवारणी, कीड-रोगांची माहिती, त्यावरील उपाययोजना, तसेच कल्टारचा वापर, उत्पादन केव्हा यायला हवे, त्यासाठी काय करता येईल, बाजारपेठेत दराची चढ उतार कशी असते, याविषयी सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली. सूत्रसंचालन वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी श्री जगताप यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.