
Pune News: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्जरोखे (बाँड) वितरणाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २०) झाला. पहिल्याच दिवशी वित्तीय संस्थांकडून राज्य बॅंकेच्या ५० कोटींहून अधिक कर्जरोख्यांची खरेदी झाली.
रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निकषांचे पालन केल्यामुळे देशातील राज्य सहकारी बँकांच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस पाचशे कोटींच्या रोखे वितरणास अनुमती मिळाली आहे. राज्य बॅंकेच्या मुख्यालयात रोखे वितरणाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील,
सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, ‘नॅफस्कॉब’चे कार्यकारी संचालक भीमा सुब्रमण्यम तसेच, पतसंस्था फेडरेशन, साखर कारखाने, गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत झाला. या प्रसंगी प्रथम कर्जरोखे घेणाऱ्या पाच संस्थांना कर्जरोख्यांचे वितरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पवार यांनी राज्य बँकेने केलेल्या प्रगतीचे कौतुक केले.
अजित पवार म्हणाले, ‘‘राज्यातील सहकार टिकला पाहिजे, सक्षम झाला पाहिजे. सर्व सहकारी संस्थांनी राज्य सहकारी बँकेचा कित्ता गिरवत कार्यशैलीत बदल करावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धात्मक वातावरणात टिकण्यासाठी नवीन योजनांची अंमलबजावणी करावी. राज्य सहकारी बँकेने वितरित केलेले रोखे दहा वर्षांच्या मुदतीचे आहेत. त्यावर द.सा.द.शे. ८.५० टक्के दराने परतावा मिळणार आहे.
या रोख्यांमध्ये बँकांना गुंतवणूक करण्याची परवानगी नसून सहकारी पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, साखर कारखाने, ट्रस्ट, कंपन्या व व्यक्तिगत गुंतवणूकदारांना याचा लाभ घेता येईल. या रोख्यांमधील गुंतवणूक पतसंस्थांना वैधानिक तरलतेसाठी ग्राह्य धरता येईल. सहकारी संस्थांना प्राप्तिकर कायद्यातील कलम ८० (पी) नुसार व्याजात सवलत मिळेल.’’
राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. राज्य बँकेने वाशी येथे सुरू केलेल्या ‘सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर’संदर्भात चित्रफितीद्वारे माहिती दिली. बँकेने वितरित केलेले रोखे रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मुदतीपूर्वी ३० जून २०२५ पूर्वीच संपूर्ण खरेदी केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.