
Nagpur News : आर्थिक अडचणीत असलेल्या नागपूर जिल्हा बॅंकेची परिस्थिती सुधारावी याकरिता राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत राज्यात पहिल्यांदाच राज्य सहकारी बॅंकेची जिल्हा बॅंकेवर संस्थात्मक प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नागपूर जिल्हा बॅंकेची स्थापना १९११ मध्ये करण्यात आली होती. ‘शेतकऱ्यांची बॅंक’ म्हणून ही बँक ओळखली जात होती. त्यातच बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्या काळात बॅंकेत तब्बल १५३ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता.
या रकमेचा भरणा न करण्यात आल्याने त्यावरील व्याज १४४४ कोटी रुपयांवर पोहचले. गेली अनेक वर्षे हे प्रकरण न्यायालयात सुरू होते. या प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने मुद्दल १५३ रुपयांसह १४४४ कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले. त्यासोबतच सुनील केदार यांच्यासह काही जणांना शिक्षाही सुनावण्यात आली. त्यामुळेच त्यांना आमदारकी देखील गमवावी लागली होती.
या प्रकरणामुळे बॅंकेची मोठी थकबाकी आणि एनपीए वाढल्याने बॅंक आर्थिक अडचणीत सापडत डबघाईस आली. ३१ मार्च २०२४ अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात नागपूर जिल्हा बॅंकेचा नेटवर्थ उणे ४० आहे. सीआरएआर देखील उणे ८.९४ इतका आहे. बॅंकेचा स्वनिधी २५४ कोटी, ठेवी ७०२ कोटी, तर दिलेली कर्जे ४४९ कोटी रुपयांची आहेत. बॅंकेचा संचित तोटा २९० कोटी इतका असून, ग्रास एनपीए ४५.११ टक्के आहे.
बॅंकेला अंकेक्षाअंती ड वर्ग दर्जा देण्यात आला आहे. त्यावरूनच बॅंकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येत असताना आता ही स्थिती सुधारण्यासाठी खुद्द राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत राज्य सहकारी बॅंकेची नागपूर जिल्हा बॅंकेवर संस्थात्मक प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
गुढीपाडव्याला (ता. ३०) राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासनाद्वारे जिल्हा बॅंकेचा कारभार रीतसर ताब्यात घेण्यात येणार आहे. जिल्हा बॅंकेच्या कर्मचाऱ्यांसह थकित कर्जदारांनी त्यानंतरच्या काळात सहकार्य केल्यास जिल्हा बॅंकेचा कारभार लवकरच पूर्वपदावर येईल, असा आशावाद प्रशासक विद्याधन अनास्कर यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
राज्य सहकारी बॅंकेची सर्व साधने, संसाधने, तज्ज्ञ सेवकवर्ग, निधी व मालमत्ता यांचा वापर या प्रक्रियेत होणार आहे. त्या माध्यमातून नागपूर जिल्हा बॅंकेसोबत एकत्रितपणे कर्ज वितरणाबरोबर अनेक बॅंकिंग ॲक्टिव्हिटी राबविता येतील, असाही दावा करण्यात आला आहे.
इतिहासात पहिल्यांदाच संस्थात्मक प्रशासक
एखादी वित्तीय संस्था अवसायानात निघाल्यास त्या ठिकाणी व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती होत होती. या वेळी मात्र राज्य सहकारी बॅंकेला संस्थात्मक प्रशासक म्हणून नागपूर जिल्हा बॅंकेवर नेमण्यात आले आहे. सहकार क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच संस्थात्मक प्रशासकाची नेमणूक झाल्याचे सांगितले जाते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.