
Maharashtra Events Issues: घरासमोर मांडव टाकून आता कोणीही लग्न करीत नाही. अगदी छोट्या गावात देखील लॉन असलेली मंगल कार्यालये तयार झाली आहेत. ही मंगल कार्यालये सगळा ठेका घेते आणि लाखापेक्षा जास्त रक्कम मोजून हे पॅकेज परवडत नसले तरी गरिबांनाही ते स्वीकारावे लागते. पतसंस्था, बँका यांचे कर्ज ज्या कारणासाठी वाटले जाते, त्यात लग्नासाठी कर्ज हे महत्त्वाचे कारण असते. याचा सर्वांत विदारक पैलू शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नात दिसून आला आहे. शेतकरी आत्महत्येवर आजपर्यंत जितके अभ्यास झाले, त्यात लग्नासाठी घेतलेले कर्ज हे एक कारण आढळून आले.
हा मुद्दा जास्त अस्वस्थ करणारा आहे. आसाराम सांगळे या शेतकऱ्याने मुलीच्या लग्नाच्या सातव्या दिवशी लग्नासाठी झालेल्या कर्जाच्या तणावाने आत्महत्या केली होती. आई-वडिलांची लग्नासाठी खर्च करण्याची ऐपत नाही, त्यांचे हाल बघवत नाहीत म्हणून काही मुलींनी आत्महत्या केल्याची ठळक उदाहरणे आहेत. तेव्हा लग्न खर्चाच्या तणावातून होणाऱ्या आत्महत्या या महागड्या लग्नांशी जोडून बघितल्यास या प्रश्नाची दाहकता लक्षात येते.
काही असंवेदनशील लोक असे म्हणतील की शेतकऱ्यांची ऐपत नाही तर मग कशाला त्यांनी खर्च करावा? पण यातली अगतिकता लक्षात घ्यायला हवी. एकतर लग्न कसे करावे हा निर्णय एकटा मुलीचा बाप घेऊ शकत नाही. मुलाकडून खर्च करायला लावतात. आणि सामाजिक मान्यतेचे जे निकष बनतात त्याचे अनुकरण इच्छा असो की नसो करावे लागते. ते नाकारण्याची हिंमत गरीब शेतकरी वर्गात नसते. त्यामुळे लग्नात खर्च कमी होईल व त्याचे दडपण गरिबांवर येणार नाही, यासाठी समाजानेच प्रयत्न करायला हवेत.
काही जण म्हणतील, की असला उलटा विचार करण्यापेक्षा शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवायला हवे. ते मान्यच आहे पण जोपर्यंत ते वाढत नाही, तोपर्यंत खर्च कमी होण्याकडे लक्ष द्यावे लागेल. अनुकरण हा रोग इतका संसर्गजन्य असतो की जनरीत बनते त्याला सारे बळी पडतात. हे विचारात घेऊन समाजावर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय नेते, उद्योजक, सेलिब्रिटी यांनी आपल्या संपत्तीचे प्रदर्शन टाळण्याची गरज आहे.
‘दारिद्र्याची शोधयात्रा’ या अभ्यासात मी ग्रामीण महाराष्ट्रात फिरलो. त्यात लोक स्थलांतरित मजूर का होतात? याचा अभ्यास केला तेव्हा लग्नासाठी ठेकेदाराकडून उचल घेतली जाते व ती फेडण्यासाठी मजूर कामाला जातात असे आढळून आले आहे. ऊसतोड कामगारात असेच आहे. सालगडी प्रथेत लग्नासाठी कर्ज काढून नंतर कामाला जे जातात त्यांना ‘लग्नगडी’ म्हटले जाते.
यातून बाजारपेठ गती घेते असाही एक मुद्दा मांडला जातो पण या बाजारपेठेचे बळी हा खर्च न परवडत असलेला मोठा गरीब वर्ग आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी सामुदायिक विवाह चळवळ गतिमान करणे व त्याला प्रतिष्ठा देण्यासाठी प्रभावशील व्यक्तींनी त्यात आपल्या मुलामुलींचे लग्न करणे असे करायला हवे. त्यानेच या विवाह सोहळ्यातील संपत्तीचे प्रदर्शन अन् गरिबांची फरफटही थांबेल.
लग्न अन् राजकीय पुढारी
पूर्वी लग्न साखरपुडा, अंत्ययात्रा, दहावा, वर्षश्राद्ध हे पूर्णपणे कौटुंबिक विषय होते. फक्त जवळचे नातेवाईक व गावकरी त्याला यायचे. हळूहळू नवश्रीमंत आणि राजकारणात असलेल्या व्यक्तींनी आपली प्रतिष्ठा वाढवायला गर्दी जमवायला सुरुवात केली. त्याचा इव्हेंट केला आणि हजार ते पाच हजार, दहा हजार लोक जमवायला सुरुवात केली. त्या जमणाऱ्या गर्दीतून त्या व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा ठरायला लागली. त्याचे सामाजिक स्थान नक्की व्हायला लागले. जर गर्दी जमणार आहेच तर मग राजकीय नेते त्यात का नकोत?
त्याने आपली प्रतिष्ठा अजून वाढेल, असा हे लोक विचार करायला लागले आणि ते मग राजकीय नेते आलेच पाहिजे यासाठी टोकाचे प्रयत्न करायला लागले. अगदी लग्नाची तारीख ठरवताना, ‘साहेब, तुम्हाला कधी जमेल’ यातून तारीख ठरवणारे आहेत. लग्नाच्या आदल्या दिवसापासून हे वधुपिता आणि वरपिता त्या नेत्यांना सतत फोन करतात. जवळच्या कार्यकर्त्यांना सारखे साहेबांना घेऊन या, असा आग्रह धरतात. जमलेल्या गर्दीकडे त्यांचे लक्ष नसते त्यांचे डोळे लग्नघटिका जवळ येताना फक्त नेत्यांकडे असते.
मंत्री आल्यावर सुरू असलेले लग्न थांबवले जाते आणि आशीर्वाद दिले जातात व मंत्री गेल्यावर लग्न पुन्हा सुरू होते. सर्व पक्षाचे नेते आशीर्वादाचे भाषण करतात. मला प्रश्न पडतो की बाकीचे लोक काय शाप द्यायला आलेले असतात की काय? पत्रिका देताना मुलीचा मुलाचा बाप अगदी तुम्ही आलेच पाहिजे असा आग्रह धरतो पण मांडवात आलेल्या सामान्य माणसाकडे तो बघतही नाही. त्यांच्यासाठी सत्कार आणि भाषण यासाठी फक्त नेते महत्त्वाचे असतात.
एकवेळ लग्न समजू शकतो. तो आनंदाचा सोहळा आहे. पण दुःखातही हेच घडते. लग्न असो की दहावा, वर्षश्राद्ध नेते ही त्यात आपले मार्केटिंग करू लागले आहेत. अगदी काही प्रयत्न न करता जर हजारो लोक भेटत असतील, भाषण करता येत असेल तर ती संधी नेते घेऊ लागले. अगदी नेते सकाळीच निघतात. जे कार्यकर्ते फार महत्त्वाचे नाहीत, त्यांच्या लग्नात फक्त भेटी देतात व जिथे प्रचंड गर्दी जमणार आहे तिथे बरोबर लग्नाची वेळ साधतात.
नेत्यांच्या हे लक्षात आले आहे, की आता गावाचे काम नाही केले तरी चालेल फक्त त्या गावातील जो बोलणारा वर्ग आहे, जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरचे लग्न, दहावा, वर्षश्राद्ध, वाढदिवसाला फक्त हजेरी लावली की तो वर्ग आपल्या भ्रष्टाचाराविषयी बोलत नाही. गावचा रस्ता, पाणी, रोजगार यावर प्रश्न विचारत नाही. तेव्हा नेत्यांनी त्यांची कार्यपद्धती बदलली आहे... काम करण्यापेक्षा फक्त व्यक्तिगत संबंध जपले की झाले.
शासकीय अधिकारीही असेच झालेत. त्यांना हे माहीत झाले आहे की गावातील प्रमुख नेते, पत्रकार, प्रमुख व्यक्ती, जातीचे नेते एकदा सांभाळले, ते आल्यावर चहा सांगितला की मग सामान्य माणसाला विचारले नाही तरी चालतात. कितीही भ्रष्टाचार केला तरी चालतो, हा बोलका वर्ग साहेब खूप चांगले आहेत ही क्लीन चीट देत असतो.
नेते आणि अधिकारी यांचा हा नवा पॅटर्न यासाठी वाईट आहे की यातून समूहाचे प्रश्न गरिबांचे प्रश्न सोडवण्याची त्यांना गरज वाटत नाही. बोलक्या वर्गाचा अहंकार सुखावून त्यांचे कार्यक्रमाला जाऊन सामान्य माणसाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायला नेते शिकले आहेत. हे जास्त घातक आहे. त्यामुळे गावोगावी लग्न आणि दहावा यातील भाषणे बंद करण्याची चळवळ व्हायला हवी म्हणजे मग नेते तिकडे फिरकणार नाहीत.
: ८२०८५८९१९५
(लेखक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.