
Social Impact of Weddings: वैष्णवी हगवणेच्या लग्नात तिच्या वडिलांनी १५० कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा आहे. फक्त लग्नाच्या दिवशी ५० लाख खर्च झाले. त्यामुळे या लग्नाच्या निमित्ताने लग्नावर होणारा अतोनात खर्च हा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. याचे कारण आर्थिक क्षमता असलेले अनेकजण आज असे मोठे खर्च करत आहेत. त्यात येणारे राजकीय नेते जमणारी गर्दी यामुळे या लग्नांचे आज बाजारीकरण आणि राजकीयीकरण झाले आहे.
कोण किती मोठे लग्न करतो यातून खोट्या प्रतिष्ठेचे निकष तयार झाले आहेत. गाजलेल्या अंबानी कुटुंबातील लग्नावर किमान २००० कोटी खर्च झाले. सुब्रतो रॉय च्या मुलाच्या लग्नात ५४० कोटी झालेला खर्च. जनार्दन रेड्डी यांच्या मुलाच्या लग्नात झालेला ५०० कोटी खर्च, लक्ष्मी मित्तल यांच्या कुटुंबातील ५०० कोटींचे लग्न ही असेच गाजले होते.
विवाह ही एक बाजारपेठ झाली आहे. ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया’ या संघटनेने नोव्हेंबर २०२४ मध्ये म्हटल्याप्रमाणे ‘भारतात नोव्हेंबर ते डिसेंबर २०२४ या काळात ४८ लाख लग्न झाली व या लग्नांवर ६ लाख कोटी रुपये खर्च झाले. त्यात ५० हजार लग्न अशी होती की ज्या लग्नांचा खर्च हा एक कोटी होता. इतके लग्न हे प्रकरण हाताबाहेर गेले आहे. विवाहाचे अर्थव्यवस्थेला मदत होते आणि एक मोठी बाजारपेठ व आर्थिक उतरंड यातून उभी राहिली आहे.
हा एक मुद्दा असला तरी सामाजिक परिणाम बघायला हवा. महाराष्ट्रात मोहिते कुटुंबात १९७० च्या दशकात लक्षभोजन दिले म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. त्याकाळात मीडिया ने प्रचंड टीका केली होती. उधळपट्टी करणे हा एक सामाजिक गुन्हा मानून नंतर अनेक वर्षे खूप टीका होत राहिली. त्यानंतर शरद पवार, गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीच्या लग्नाला झालेली गर्दी हा चर्चेचा विषय होत राहिला पण किमान ही लग्न लोकसहभागाची तरी होती.
त्यानंतर गेल्या १५ वर्षांत नवश्रीमंत वर्गाने सामान्य माणसांच्या गर्दीपेक्षा निवडक मान्यवर सेलिब्रिटी लोकांची गर्दी आणि प्रचंड खर्च आणि संपत्तीचे प्रदर्शन याभोवती सारे विवाह फिरत आहेत. अनुष्का शर्मा व विराटच्या इटलीत झालेल्या लग्नाने त्याला वेगळाच आयाम दिला. त्यातून हाय प्रोफाईल लग्न अधिकच कक्षेबाहेर सरकली. पैसे त्यांचे आहेत. त्यांच्या एकूण संपत्ती पैकी हा खर्च हिमनगाचे टोक आहे. मग यात तुमचे काय बिघडते. ते त्यांचा पैसा खर्च करतात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? असा प्रश्न नव्या पिढीतील तरुण विचारतात. आम्ही सरकारला टॅक्स देतो. त्यातून सरकारने गरिबांचे प्रश्न सोडवावेत. उरलेल्या पैशाचा विनियोग कसा करायचा ते आम्ही ठरवू असा नव्या पिढीचा प्रश्न आहे.
अनुकरणाचा परिणाम
मूल्यव्यवस्था हा फारसा या नव्या पिढीचा काळजीचा विषय नसणे स्वाभाविक आहे कारण ते ज्या काळात जगतात, ज्या आर्थिक व्यवस्थेचा भाग आहे. त्या काळात व्यक्तिवादी विचारसरणीत तळातल्या समाजावर काय परिणाम होईल, याचा विचार मागे पडणे स्वाभाविक आहे. महात्मा गांधींनी वाराणशीला जेव्हा भेट दिली तेव्हा तेथील दागिने घालून आलेल्या श्रीमंत व्यक्तींवर त्यांनी जाहीरपणे त्यांच्यासमोर टीका केली होती.
गांधींच्या भूमिकेनुसार आज आपण या नव्या श्रीमंत प्रदर्शनाचे विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. माझी चिंता ही या उच्चभ्रू वर्गाच्या खर्चाची नाही. हे हळूहळू सरकत सरकत खूप खाली येते. माधुरी दीक्षितच्या ‘हम आपके है कौन’ या एका चित्रपटाने लग्न व्यवस्था प्रचंड महाग करून दाखवली. त्याने ड्रेस डिझाईन पासून अनेक बाजारपेठा फुलवल्या. आज शहरी भागात आणि अगदी तालुक्यात सुद्धा लग्नानंतर रिसेप्शन देण्याचा एक पॅटर्न तयार झाला आहे.
काही लाख रुपयांचे पॅकेज यासाठी मोजावे लागते. प्री-वेडिंग शूट असा एक प्रकार अगदी ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. लाखभर रुपये त्यासाठी मोजले जातात. या अनुकरणांचा सर्वांत वाईट परिणाम हा ग्रामीण पातळीवर होतो आहे. पूर्वी ग्रामीण भागात लग्न अगदी शेतात घरासमोर होत असत. छोटा मांडव टाकून बैलगाडीने वऱ्हाड येणारी साधी सुधी लग्न आज शहरी नव श्रीमंत वर्गाच्या अनुकरणाने गरिबांची फरफट होते आहे हा मुख्य चिंतेचा विषय आहे.
ग्रामीण भागातील नव श्रीमंत वर्गाने संपत्तीचे प्रदर्शन सुरू केले. ग्रामीण राजकीय नेत्यांनी ही सुरुवात केली. लोकांच्या संपर्काचे माध्यम म्हणून नेते लग्नातून फिरू लागले. उद्योगपती, सेलिब्रिटीच्या लग्नाला जर पंतप्रधान, मुख्यमंत्री येत असतील तर ग्रामीण लग्नात आमदार, खासदार, सभापती अपरिहार्य झाले. ते यावेत म्हणून लोक जीव काढू लागले. नेतेही मोठ्या गर्दीत जाऊन शुभेच्छा देणारी भाषणे करू लागले.
लग्नात जमणारी गर्दी आणि तेथे होणारा प्रचंड खर्च हा प्रतिष्ठेचा मानदंड झाल्याने परवडत नसले तरी कर्जबाजारी होऊन लोक अनुकरण करू लागले. लग्नासाठी फार्महाऊस घेणे, रिसेप्शनचा जो एक पॅटर्न तयार झाला आहे, ते आपण केले नाहीतर आपण गरीब ठरू, अशा समजुतीने कनिष्ठ मध्यमवर्ग, शेतकरी सुद्धा त्यात भरडला जातो आहे. मध्यमवर्ग कुटुंबाचा आज लग्नाचा खर्च १० लाखाच्या पुढे गेला आहे.
तो करणे जिवावर येते पण या अनुकरण संस्कृतीत तो करावाच लागतो. यात सर्वांत वाईट स्थिती ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी यांची होते. घरासमोर मांडव टाकून आता कोणीही लग्न करीत नाही. अगदी तालुक्याच्या पेक्षा छोट्या गावातील लॉन असलेली मंगल कार्यालय तयार झाली आहेत. सगळेजण तिथं लग्न करतात. महागड्या शहरी लग्नाचे मिनी मॉडेल तिथे असते. ड्रोन कॅमेरे पासून सारे काही असते. मंगल कार्यालय सगळा ठेका घेते आणि लाखांचे जास्त रक्कम मोजून हे पॅकेज परवडत नसले तरी गरिबांनाही हे मॉडेल स्वीकारावे लागते. पतसंस्था बँका याचे कर्ज ज्या कारणासाठी वाटले जाते त्यात लग्नासाठी कर्ज हे महत्त्वाचे कारण असते.
: ८२०८५८९१९५
(लेखक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.