Soybean Varieties : मध्य भारतासाठी प्रसारित वैशिष्ट्यपूर्ण सोयाबीन वाण

Soybean Farming : महाराष्ट्रामध्ये दरवर्षी या पिकाखाली एकूण ४८ ते ५० लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यातही १७-१८ लाख हेक्टर क्षेत्रासह विदर्भ आघाडीवर आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत अमरावती येथील प्रादेशिक संशोधन केंद्राने आतापर्यंत ६ वाण प्रसारित केले आहेत.
Soybean Farm
Soybean FarmAgrowon
Published on
Updated on

डॉ. सतीश निचळ, मंगेश दांडगे, राजीव घावडे

Soybean Production : सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे तेलबिया पीक बनले असून, पिकाखालील क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा मध्यप्रदेशनंतर दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी या पिकाखाली एकूण ४८ ते ५० लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यातही १७-१८ लाख हेक्टर क्षेत्रासह विदर्भ आघाडीवर आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत अमरावती येथील प्रादेशिक संशोधन केंद्राने आतापर्यंत ६ वाण प्रसारित केले आहेत.

सोयाबीनसाठी २६ संशोधनात्मक शिफारशी प्रसारित केल्या आहेत. अकोला येथील विद्यापीठानेही सोयाबीनचे नवीन चार वाण प्रसारित केले आहेत. अवर्षण काळात किंवा जास्त पर्जन्यमानामध्येही या वाणांनी चांगले उत्पादन दिल्यामुळे हे वाण अल्पावधीतच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत.

वाणांचे गुणवैशिष्ट्ये :

पीडीकेव्‍ही अंबा (एएमएस १००-३९)

हे वाण लवकर परिपक्व होणारे, जास्त उत्पादन क्षमता असलेले, तीन दाण्यांच्या शेंगांचे प्रमाण व दाण्यांचे वजन इतर वाणांपेक्षा जास्त आहे. बियांमध्ये तेल व प्रथिनांचे प्रमाणही इतर वाणांपेक्षा जास्त आहे. बदलत्या हवामानात तग धरणाऱ्या या वाणाने शेतकऱ्यांच्या शेतावर प्रथम रेषीय प्रात्याक्षिकांमध्ये प्रचलित वाणांपेक्षा २७ टक्के जास्त उत्पादकता नोंदविली आहे.

राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेश या राज्याकरिता प्रसारित. (प्रसारण व अधिसूचना वर्ष : २०२१)

जास्त उत्पादन क्षमता (सरासरी उत्पादकता : २८-३० क्विंटल प्रति हेक्टर).

लवकर परिपक्व होणारे वाण (९४-९६ दिवस).

मूळकुज/खोडकुज या रोगास व चक्रभुंगा आणि खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक.

प्रचलित वाणांपेक्षा तेलाचे व प्रथिनाचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या जास्त.

परिपक्वतेनंतर १०-१२ दिवसांपर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकारक.

Soybean Farm
Soybean Seed Processing : सोयाबीन बीज प्रक्रियेवर जोर

सुवर्ण सोया (एएमएस-एमबी ५-१८) :

या वाणाच्या मूळकुज / खोडकुज या रोगास प्रतिकारक्षमतेच्या गुणधर्मामुळे या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, प्रसार जास्त असलेल्या भागामध्ये लागवडीस उपयुक्त ठरते. शेंगा व झाडावर लव असल्याने येणाऱ्या किडीस प्रतिरोध करते. शेतकऱ्यांच्या शेतावर प्रथम रेषीय प्रात्याक्षिकामध्ये प्रचलित वाणांपेक्षा २२ टक्के जास्त उत्पादकता नोंदविली आहे. इतर वाणांपेक्षा शेंगांची जास्त संख्या, मूळकुज/ खोडकुज या रोगास प्रतिकारकता यामुळे हे वाण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे.

राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेश या राज्यांकरिता प्रसारित. (प्रसारण वर्ष : २०१९, अधिसूचना वर्ष : २०२१)

फुलाचा रंग पांढरा, खोड व शेंगावर तपकिरी रंगाची लव.

परिपक्वतेचा कालावधी : ९८-१०२ दिवस.

सरासरी उत्पादकता : २४-२८ क्विंटल/हेक्टर.

मूळकुज/खोडकुज व पानावरील बुरशीजन्य ठिपके या रोगांस प्रतिकारक.

चक्रभुंगा व खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक.

परिपक्वतेनंतर १०-१२ दिवसांपर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकारक.

पीडीकेव्ही येलोगोल्ड (एएमएस १००१)

मध्यम कालावधीत येणारे हे वाण निश्‍चित ते मध्यम पर्जन्यमानाच्या भागात उत्तम निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीत लागवड केल्यास प्रचलित वाणांपेक्षा हमखास जास्त उत्पादन देते. विशेष करून बुलढाणा, वाशीम व अकोला जिल्ह्यांमध्ये या वाणाला चांगली मागणी आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर प्रथम रेषीय प्रात्याक्षिकामध्ये सदर वाणाने प्रचलित वाणांपेक्षा २० टक्के जास्त उत्पादकता नोंदवली आहे.

महाराष्ट्रासाठी प्रसारीत. (प्रसारण वर्ष : २०१८, अधिसूचना वर्ष : २०१९)

फुलाचा रंग जांभळा, खोड व शेंगावर लव नाही.

परिपक्वतेचा कालावधी : ९५-१०० दिवस.

सरासरी उत्पादकता : २२-२६ क्विंटल/हेक्टर.

मूळकुज/खोडकुज व पिवळा मोझॅक या रोगांस मध्यम प्रतिकारक.

चक्रभुंगा व खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक.

परिपक्वतेनंतर १० दिवसांपर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकारक.

पीडीकेव्‍ही पूर्वा (एएमएस २०१४-१)

पूर्व भारतातील राज्यांसाठी प्रसारित हे वाण जास्त पर्जन्यमानाच्या भागात लागवडीस उपयुक्त ठरते. सध्या या वाणाची पूर्व विदर्भातील जास्त पर्जन्यमान असलेल्या भागात उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी पीक/बीजोत्पादन प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत.

राष्ट्रीय स्तरावर छत्तीसगड, झारखंड, बिहार, ओडिशा व पश्‍चिम बंगाल या राज्यांकरिता प्रसारित. (प्रसारण वर्ष : २०२०, अधिसूचना वर्ष : २०२१)

फुलाचा रंग जांभळा असून खोड व शेंगावर लव नाही.

परिपक्वतेचा कालावधी : १०२-१०५ दिवस.

सरासरी उत्पादकता : २२-२६ क्विंटल/हेक्टर.

पिवळा मोझॅक या रोगांस प्रतिकारक.

चक्रभुंगा व खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक.

परिपक्वतेनंतर १० दिवसांपर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकारक.

वरील सर्व नवीन सोयाबीन वाण हे बियाणे साखळीमध्ये असून, विविध बीजोत्त्पादन संस्था उदा. महाबीज, विद्यापीठ, शेतकरी उत्पादक कंपन्या, गट यांच्याकडे विविध दर्जाचे बियाणे उपलब्ध आहे.

Soybean Farm
Soybean Market : सोया-मक्याची गोष्ट

सोयाबीनसाठी महत्त्वाच्या शिफारशी

प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावतीद्वारे सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी एकूण २६ शिफारशी प्रसारीत केल्या आहेत. त्यातील पुढील महत्त्वाच्या शिफारशींची अंमलबजावणी शेतकऱ्यांनी केल्यास नक्कीच उत्पादन वाढ मिळू शकते.

सोयाबीन पिकामध्ये अधिक उत्पादन, आर्थिक मिळकत व मूलस्थानी जलसंधारणासाठी पेरणीनंतर अंदाजे ३० दिवसांनी सोयाबीनच्या ३ किंवा ६ ओळींनंतर सरी काढावी.

कोरडवाहू शेती पद्धतीत धान्य, चारा व कडधान्याची गरज भागविण्याकरिता आणि अधिक आर्थिक लाभ मिळविण्याकरिता सोयाबीन + ज्वारी + तूर या त्रिस्तरीय आंतरपीक पद्धतीत ६:२:१ किंवा ९:२:१ या ओळीच्या प्रमाणात पेरणी करावी.

सोयाबीन पिकाला पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी कुटाराचे आच्छादन ५ टन प्रति हेक्टरी करून घ्यावे. पोटॅशिअम नायट्रेट* (१% म्हणजे) १० ग्रॅम किंवा मॅग्नेशिअम कार्बोनेट* (५% म्हणजे) ५० ग्रॅम किंवा ग्लिसरॉल* (५ टक्के म्हणजे) ५० मिलि प्रति लिटर या प्रमाणे फवारणी पीक फुलोऱ्यात आल्यानंतर १५ दिवसांनी करावी. हे घटक बाष्परोधक म्हणून काम करतात.

सोयाबीन पिकाची अवास्तव कायिक वाढ रोखण्यासाठी वाढ नियंत्रक क्लोरमेक्वाट क्लोराइड* १००० पीपीएम म्हणजेच २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे पेरणीनंतर ३० ते ४० दिवसांनी फवारणी करावी.

सोयाबीन पिकांच्या अधिक उत्पादनासाठी शिफारशीत खताची मात्रेसोबत युरिया (२ टक्के म्हणजे २ किलो युरिया प्रति १०० लिटर पाणी) पेरणीनंतर ५० ते ७० दिवसांवर करावी. किंवा शिफारशीत खतांची मात्रा आणि शेंगा धरण्याच्या अवस्थेत डीएपी (२ टक्के) किंवा १९:१९:१९ (नत्र, स्फुरद व पालाश) विद्राव्य खताची (२ टक्के म्हणजे) २० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

सोयाबीन पीक फुलांच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असताना नायट्रोबेन्झीन* (२० टक्के) ५०० पीपीएम (म्हणजे २.५ मिलि प्रति लिटर पाणी) या प्रमाणात फवारण्याची शिफारस केली जाते.

सोयाबीन पिकाचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी पेरणी ४५ × १० सें. मी. अंतरावर करावी.

सोयाबीनच्या सतत पीक पद्धतीमध्ये मका पिकाचा समावेश केल्यास फायदेशीर ठरते.

विदर्भातील मध्यम खोल काळ्या जमिनीत सोयाबीनच्या पीडीकेव्ही येलो गोल्ड, सुवर्णसोया व पीडीकेव्ही अंबा या वाणापासून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी ४५ × १० सेंटिमीटर अंतरावर कमीतकमी ७० टक्के उगवणशक्तीचे ६२.५ किलो बियाणे प्रति हेक्टरी या प्रमाणे पेरणी करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

सोयाबीनच्या मूळकुज/खोडकुज कॉम्प्लेक्स आणि खोडमाशीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी ट्रायफ्लॉक्सिस्ट्रॉबिन + पेनफ्लुफेन (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा थायोफिनेट मिथाइल + पायरॅक्लोस्ट्रॉबिन (संयुक्त कीडनाशक) २ मिलि प्रति किलो बियाणे यासोबत थायामेथोक्झाम (६०० एफएस) २ मिलि प्रति किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

शेंगेवरील करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी पेरणीनंतर ५५ आणि ७५ दिवसांनी कार्बोक्झिन + थायरम (संयुक्त बुरशीनाशक) ३ ग्रॅम प्रति किलो) किंवा कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम प्रति किलो आणि त्यानंतर ५५ आणि ७५ दिवसांनी थायोफिनेट मिथाइल ०.१ टक्का (१ मिलि प्रति लिटर) या प्रमाणे दोन फवारण्या करण्याची शिफारस केली जाते.

(* लेखात दिलेल्या सर्व रसायनांना ॲग्रेस्को शिफारस आहे.)

डॉ. सतीश निचळ, ९४२३४७३५५०,  ९५८८४१४१४४

(अ.भा.स. सोयाबीन संशोधन प्रकल्प, प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com