Nagar News : खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच सोयाबीनचे दर घसरले आहेत. सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा ७९२ ते १३९२ रुपये प्रति क्विंटल तोटा घेऊन सोयाबीन विकावे लागत आहे. त्यामुळे सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना होत असलेला तोटा थांबवावा व पुढील काळात सोयाबीनला अधिक दर मिळतील यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे.
अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, उमेश देशमुख, डॉ. सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की केंद्र सरकारने सुरू असलेल्या हंगामासाठी सोयाबीनला ४,८९२ प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला असताना सध्या शेतकऱ्यांना बाजारामध्ये ३५०० ते ४१०० रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन विकावे लागत आहे.
खरीप हंगामात सुरुवातीला आगाप सोयाबीन बाजारामध्ये विक्रीसाठी येऊ लागले आहे. खरिपातील मुख्य सोयाबीन पिकाची अद्याप आवक सुरू झालेली नाही. असे असताना आत्ताच दर कोसळले आहेत. ही परिस्थिती पाहता प्रत्यक्ष खरीप हंगामातील सोयाबीन मोठ्या प्रमाणात जेव्हा बाजारात येईल तेव्हा हे भाव आणखीनच खाली जाणार आहेत.
सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे सोयाबीनचे दर गेले दोन वर्षे सातत्याने घसरत आहेत. आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम म्हणून सोयाबीनचे दर ११,००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. मात्र सरकारने तेव्हा तातडीने हस्तक्षेप करत जी. एम. सोयापेंड आयातीचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम म्हणून सोयाबीनचे दर कोसळायला सुरुवात झाली. सरकारने सोयातेल आयातीला खुले प्रोत्साहन दिले आहे.
त्याचा परिणाम म्हणून सोयाबीनचे दर सातत्याने कोसळत आहेत. केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून सोयाबीनचे हमीदर जाहीर केले असताना हंगामाच्या अगोदरच शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा ७९२ ते १३९२ रुपये प्रति क्विंटल तोटा घेऊन सोयाबीन विकावे लागत आहे. केंद्र सरकारने याबाबत तातडीने हस्तक्षेप करावा व किमान आधार भावाच्या वर सोयाबीनला भाव मिळेल यासाठी उपाययोजना कराव्यात.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.