Nagar News : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी प्रस्तावित क्षेत्राला लागणाऱ्या बियाणे, खतांसह निविष्ठांबाबत कृषी विभागाने नियोजन सुरू केले आहे. या वर्षी खरिपात सहा लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली. गेल्या काही वर्षांच्या पेरणी क्षेत्राची स्थिती पाहता सोयाबीन, कापूस, मक्याचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
खरीप हंगाम आता दोन महिन्यांवर आला आहे. त्या अनुषंगाने निविष्ठा, खते, बियाणे शेतकऱ्यांना वेळेत मिळावीत यासाठी आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. यंदा लोकसभेच्या निवडणुका होत असल्याने जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली खरिपाचे नियोजन करण्यासाठी बैठका घेऊन काम सुरू केले आहे.
त्याबाबत माहिती देताना सुधाकर बोराळे यांनी सांगितले, की नगर जिल्ह्यात खरिपाचे ५ लाख ६२ हजार ०३२ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. मागील तीन वर्षांची पेरणी स्थिती पाहता यंदा कृषी विभागाने ६ लाख ७५ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज धरून तेवढे क्षेत्र प्रस्तावित केले आहे. सोयाबीनचे ८७ हजार ३३० हेक्टर सरासरी क्षेत्र असून यंदा १ लाख ९० हजार हेक्टरपर्यंत पेरणी होऊ शकते, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
गेल्या वर्षी १ लाख ८८ हजार ८५९ हेक्टरवर पेरणी झाली होती. कापसाचे १ लाख २ हजार ०८७ हेक्टर सरासरी क्षेत्र असून यंदा दीड लाखापर्यंत लागवड होऊ शकते. गेल्यावर्षी १ लाख ५३ हजार ३४१ हेक्टरवर लागवड झाली होती. बाजरीचे १ लाख ५० हजार ९८३ हेक्टर सरासरी क्षेत्र असून ८५ हजार हेक्टरपर्यंत पेरणी होऊ शकते. तुरीचे ३६ हजार १०५ हेक्टर सरासरी क्षेत्र असून ६५ हजार हेक्टरपर्यंत लागवड होऊ शकते.
मक्याचे ६० हजार ७९९ हेक्टर सरासरी क्षेत्र असून यंदा ८८ हजार हेक्टरपर्यंत पेरणी होऊ शकते. गेल्या वर्षी ८६ हजार हेक्टरवर मक्याची पेरणी झाली होती. उडदाचे ४० हजार ४०६ हेक्टर सरासरी क्षेत्र असून यदा ५० हजार हेक्टरपर्यंत पेरणी होऊ शकते. गेल्या वर्षी ४९ हजार ६०० हेक्टरवर पेरणी झाली होती. मुगाचे ४७ हजार ०३६ हेक्टर सरासरी क्षेत्र असून यंदा ३१ हजार ५०० हेक्टरवर पेरणी होऊ शकते. गेल्या वर्षी ३१ हजार ४८५ हेक्टरवर पेरणी झाली होती. मुगाची पेरणी ही सुरुवातीच्या पावसावरच अवलंबून असते. भाताचे १७ हजार २७६ हेक्टर क्षेत्र असून यंदा १७ हजार ५०० हेक्टरवर लागवड होऊ शकते. गेल्या वर्षी १७, २७५ हेक्टरवर लागवड झाली होती.
बाजरीचे क्षेत्र घटण्याची शक्यता
नगर जिल्ह्यात साधारण दहा-बारा वर्षांपूर्वी बाजरीचे क्षेत्र तीन ते साडेतीन लाख हेक्टरच्या जवळपास होते. दिवसेंदिवस बाजरीचे क्षेत्र कमी होत आहे. सध्या बाजरीचे सरासरी क्षेत्र १ लाख ५० हजार ९८३ हेक्टर आहे. गेल्या वर्षी साधारण सव्वा लाख हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात ८३ हजार ०३२ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा ८५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करताना क्षेत्र कमी होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ऐन काढणीच्या काळात होणारे नुकसान आणि बाजारात मिळणारा दर यामुळे क्षेत्र घटत असल्याचे दिसते आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.