Dhule News : धुळे जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात तीन लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट असून त्यात दोन लाख १९ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड प्रस्तावित आहे. जिल्हा हा अवर्षणप्रवण असून, पावसाचे पाणी अडविण्यासाठी पावसाळ्यापूर्वी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात यावीत. तसेच शेती उत्पन्न वाढीसाठी पीक पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगाम २०२४ ची आढावा बैठक झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाट, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक नवनाथ कोळपकर उपस्थित होते.
मका पिकाची लागवड
जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी कापूस पिकाला पर्याय म्हणून अधिकाधिक क्षेत्रावर मका पिकाची लागवड करावी. मका पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. मका पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कंपनी प्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी प्रात्याक्षिकांचे आयोजन करावे.
भात पिकावर भर द्यावा
साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात भात पिकाच्या लागवडीवर अधिक भर देवून उत्पादन खर्च कमी करून उत्पन्नात वाढ होण्यासाठी प्रयत्न करावा. खुरसणी तसेच भुईमूग क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करावेत. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी झालेले नाही अशा शेतकऱ्यांची यादी गावस्तरावर प्रसिद्ध करण्यात यावी, अशा सूचना श्री. गोयल यांनी दिली.
फळबाग लागवड
कृषी निवष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी ५ भरारी पथके कार्यरत करण्यात आले असून १६ गुणवत्ता निरीक्षकांमार्फत जिल्हास्तरावर संनियंत्रण करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना तसेच भाऊसाहेब पांडुरंग फुडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत सहा हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात येणार आहे. यंदा कृषी विभागास यावर्षी पाच लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे,
अशी माहिती श्री. शिरसाट यांनी दिली. कर्ज वितरण, कृषी विद्युत जोडणी, पशुसंवर्धन विभाग, दुग्ध विकास विभागाचा आढावा घेण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना पीक, कीड परिस्थितीची माहिती देण्यासाठी माहितीपत्रक व पुस्तिकाचे अनावरण करण्यात आले. तसेच २०२३- २०२४ मध्ये उल्लेखनीय कामकाज करणाऱ्या कृषी सहायकांचा प्रशस्तिपत्रक देवून सत्कार करण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.