Summer Soybean : उन्हाळी सोयाबीनचा चांगला पर्याय हातून निसटतोय...

Article by Vijay Sukalkar : उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीन एक चांगला पर्याय उपलब्ध होत असतानाच हवामान बदलामुळे तोही हातून निसटतोय की काय, असे वाटत आहे.
Summer Soybean
Summer Soybean Agrowon

Soybean Farming : मागील दोन-तीन वर्षांपासून खरीप हंगामात सोयाबीन पेरणी, पीक वाढीच्या अवस्थेत पाऊस हुलकावणी देतोय, शिवाय पीक फुलोऱ्यात आल्यानंतर, शेंगा भरताना तसेच सोयाबीनची काढणी करताना अतिवृष्टी होत असल्याने सोयाबीनचे खूप नुकसान होतेय. तसेच खरिपात भिजलेल्या सोयाबीनला दरही कमी मिळतो, बियाणे म्हणून त्याची साठवणूकही करता येत नाही.

एकंदरीत कमी उत्पादन, मिळणारा कमी दर यामुळे खरिपात सोयाबीन हे पीक शेतकऱ्यांना किफायतशीर ठरताना दिसत नाही. अशावेळी उन्हाळी हंगामातही सोयाबीन चांगले येत असल्याचा राज्यातील काही शेतकऱ्यांचा अनुभव आहे. उन्हाळी सोयाबीन एप्रिल-मे मध्ये काढणीला येत असल्याने त्याचा खरिप पेरणीसाठी बियाणे म्हणून होत असलेला वापर, त्यास मिळणारा चांगला दर आदी कारणांमुळे मागील दोन-तीन वर्षांत राज्यात उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्र वाढले होते.

Summer Soybean
Soybean Farming Training : पुसाणे येथे सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण

उन्हाळ्यात सोयाबीन बीजोत्पादन हा तर ट्रेंडच झाला होता. मात्र यावर्षी अचानकच उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्र तब्बल ९० टक्क्यांनी घटले आहे. दोन वर्षांपूर्वी ४८ हजार हेक्टरवर गेलेला उन्हाळी सोयाबीनचा पेरा यावर्षी पाच हजार हेक्टरवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध होत असतानाच हवामान बदलामुळे हा पर्यायही शेतकऱ्यांना गमवावा लागतोय की काय? अशी शंका आता उपस्थित होतेय.

सोयाबीन हे सूर्यप्रकाश तसेच तापमानास अति संवेदनाशील पीक आहे. हे पीक २२ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात चांगले येते. परंतु, कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले तर फूल गळणे, शेंगांची योग्य वाढ न होणे तसेच दाणे न भरणे, दाण्याचा आकार कमी होणे असे प्रकार घडतात. वाढत्या उष्णतामानात या पिकावर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भावही वाढतो. आता आपण पाहतोय विदर्भ, मराठवाड्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर जातोय.

Summer Soybean
Summer Soybean : उन्हाळी सोयाबीनच्या लागवडीची गेली हवा

एवढ्या वाढत्या तापमानात हे पीक तग धरताना दिसत नाही. वाढलेल्या तापमानात सोयाबीनची वाढ खुंटत आहे. रोगाचा प्रादुर्भाव वाढला म्हणजे फुले, शेंगा लागत नाहीत. दाणे भरत नाहीत. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटत आहे. लागवड क्षेत्रात घट होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. उन्हाळ्यात सोयाबीन घेतले तर त्याला पाणी खूप लागते. मागच्या मॉन्सून मधील कमी पाऊसमानामुळे पाण्याची उपलब्धता कमी आहे.

त्यामुळे देखील यंदा उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरविली आहे. मागील दोन वर्षांपासून उन्हाळ्यातही अवकाळी पाऊस पडून शेतपिकांचे नुकसान वाढले आहे. त्यामुळे देखील उन्हाळी सोयाबीनची लागवड कमी होत आहे. उन्हाळी सोयाबीन घरच्या शेतात बियाणे म्हणून वापरता येते. नाहीतर बियाण्यासाठी म्हणून याची विक्री खरीप हंगामाच्या तुलनेत दाम दुपटीने करता येते.

अशावेळी उन्हाळी हंगामासाठी अति उष्णतामानास सहनशील, पाण्याचा ताण सहन करणाऱ्या तसेच पिवळा मोझॅक प्रतिबंधक वाणांची निर्मिती कृषी संशोधकांनी करायला हवी. सोयाबीन बीजोत्पादनासाठी उन्हाळी हंगाम चांगला मानला जातो. कृषी विभागाने उन्हाळी हंगामात बीजोत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. सोयाबीन हे जागतिक स्तरावर एक महत्त्वाचे पीक मानले जाते. सोयाबीनपासून सोयातेल,

सोया पेंडसह इतरही अनेक प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करता येतात. खरीप हंगामातील या पिकांचे वाढते नुकसान पाहता, उन्हाळी हंगामात हे पीक चांगले रुजले तर शेतकऱ्यांना उत्पन्नाचा एक चांगला स्रोत उपलब्ध होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com