Yavatmal News : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे. चार लाख ५७ हजार हेक्टरवर कपाशी, तर एक लाख १५ हजार हेक्टरवर तुरीची लागवड होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून यवतमाळची जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात दर वर्षी सर्वाधिक पेरा कापसाचा होतो. गेल्या हंगामात अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी हिंमत न हारता उत्पन्न घेतले. मात्र, भाव नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली.
जुन्या घटना लक्षात न ठेवता शेतकरी नव्या दमाने नव्या हंगामाच्या कामाला लागले आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मशागत सुरू केली आहे. कृषी विभागही खरीप हंगामाच्या अनुषंगाने तयारीला लागला आहे. खरीप हंगामातील पेरा, बियाणे, खतांचे नियोजन केले आहे. गेल्या वर्षी नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती.
सर्वाधिक साडेचार लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. येणाऱ्या खरीप हंगामात चार लाख ५७ हजार ५१० हेक्टरवर कपाशीचा पेरा होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यादृष्टीने नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असलेले कपाशी बियाण्याचे पाकीट, खतांचे नियोजनही कृषी विभागाने केले आहे.
कपाशीचे बियाणे कोणत्या कंपनीकडून किती येणार, यांची संभाव्य तयारी करून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्याचा तुटवडा भासणार नसल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. कपाशीसोबत एक लाख १५ हजार ४०० हेक्टरवर तुरीची लागवड होण्याचा अंदाज आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत तुरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार बियाण्यांची नोंदणी कृषी विभागाने केली आहे. महाबीजसोबत खासगी कंपनीकडून पुरवठा करण्यात येणारे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्याच्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षी कापसाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. कापूस शेतकऱ्यांचे हुकमी पीक असल्याने यंदाही शेतकऱ्यांनी कपाशीला पसंती दिल्याचे दिसून येत आहे.
‘महाबीज’कडून अडीच हजार क्विंटल बियाणे
खरीप हंगामात महाबीजकडून दोन हजार ५५२ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. त्यात कापूस वगळता ज्वारी, तूर, मूग, उडीद आदी बियाण्यांचा समावेश आहे. महाबीजकडून तुरीचे दोन हजार २९८ क्विंटल उपलब्ध होणार आहे. याशिवाय खासगी बाजारातही मोठ्या प्रमाणात बियाणे उपलब्ध राहतील, याबाबतही नियोजन करण्यात येत आहे.
२०२४ चे खरीप संभाव्य नियोजन
पीक क्षेत्र (हेक्टरमध्ये)
ज्वारी ४०५०
बाजरी २५०
तूर ११५४००
मूग २३७५
उडीद २२४०
तीळ ८१
मका ४१०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.