
Chief Minister Solar Agriculture Channel Scheme : एसजेव्हीएन ग्रीन एनर्जीमार्फत राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये तब्बल १ हजार ३५२ मेगावॉटचे सोलर पार्क उभारला जाणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत २ ते १० मेगावॉट क्षमतेचे १०२ सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या ४ जिल्ह्यांमध्ये हे प्रकल्प असणार आहेत. ग्रीडने जोडलेल्या या प्रकल्पांमध्ये तयार होणारी वीज शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला पुरवली जाणार आहे.
पारदर्शी कारभार व्हावा
इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. परंतु, ज्या खासगी कंपन्यांना टेंडरद्वारे वीज निर्मीती करण्यासाठी परवानगी दिली जात आहे. यामध्ये पारदर्शी कारभार आला पाहिजे, नाहीतर खासगी कंपन्यांकडून वीजनिर्मीतीच्या माध्यमातून लुबाडणूक होण्याची शक्यता आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना सोलर पंप घेण्याची सक्ती केली जात आहे. परंतु, वीज कंपन्यांनी शेतकरऱ्यांच्या शेतीची स्थळ पाहणी करूनच सोलर घेण्यास सक्ती करावी" असे पाटील यांनी सांगितले.
पुणे येथील ९ ठिकाणी एकूण १५४ मेगावॉट, नाशिक येथील २२ ठिकाणी ३०४ मेगावॉट, छत्रपती संभाजीनगर १९ ठिकाणी ३१५ मेगावॉट तर सोलापूर येथील ५२ ठिकाणी ५७९ मेगावॉट वीज निर्मीती प्रकल्प होणार आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी, म्हणून ग्रामीण भागात सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत कमी क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. तेथे तयार होणारी वीज महावितरणच्या वीज उपकेंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरविली जाणार आहे.
त्यानुसार एसजेव्हीएन ग्रीन एनर्जीकडून राज्यात पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, त्याची देखभाल दुरुस्ती आणि संचलनासाठी निविदा काढल्या आहेत. या प्रकल्पातून पुढील २५ वर्षे वीजपुरवठा होऊ शकणार आहे.
सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत उभारल्या जाणाऱ्या सौर प्रकल्पांमुळे सध्या वीज केंद्रांवर येत असलेला भार कमी होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाल्याने पिकांसाठी हवे तेव्हा सिंचन करता येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.