Solapur News : सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी एकात्मिक पर्यटन विकास आराखडा आखला असून, सुमारे २८२.७५ कोटी रुपयांचा हा आराखडा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुंबई येथे राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीकडे सादर केला. या समितीकडून आराखड्यासाठी मंजुरी मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीमध्ये प्रथम सादर करण्यात आला. जिल्ह्याच्या पर्यटनाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या बाबी यात नमूद करून त्यासाठी लागणारी तरतूद करून हा आराखडा समितीने मंजूर केला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला मान्यता प्रदान केली.
तर माहे जून २०२४ मध्ये पुणे येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हा पर्यटन आराखडा सादर केला होता. त्या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी या आराखड्याला तत्वत: मंजुरी दिली होती. त्यानंतर हा आराखडा उच्चाधिकार समितीकडे पाठवण्यात आला.
मुंबई येथे राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुनिता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या आराखड्यातील बाबींचे बारकाईने माहिती घेऊन यातील २८२.७५ कोटी रुपयांच्या विविध कामांना मंजुरी प्रदान केली. या वेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याचे उच्चाधिकार समितीसमोर पीपीटीद्वारे सादरीकरण केले,
हे सादरीकरण करत असताना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती तसेच पर्यटनासाठी खूप महत्त्वपूर्ण जिल्हा असल्याची माहिती देऊन हा आराखडा मंजूर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था वेगाने वाढण्यास मदत होईल. तसेच, येथून होणारे स्थलांतर रोखले जाईल, यासाठी हा प्रकल्प खूप महत्त्वाचा असल्याचे समितीला जिल्हाधिकारी यांनी पटवून दिले. या बैठकीसाठी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी उपस्थित होते.
असा होणार पर्यटनावरील खर्च
प्रामुख्याने या आराखड्यातून सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील जलपर्यटनासाठी १९० कोटी १० लाख रुपये, कृषी पर्यटनासाठी १९ कोटी ३० लाख, विनयार्ड पर्यटन ४८ कोटी २६ लाख, धार्मिक पर्यटनासाठी २५ कोटी असा एकूण २८२.७५ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.