Water and Soil Conservation : कोरडवाहू शेतीमध्ये जल-मृद् संधारण महत्त्वाचे

Agriculture Conservation : कोरडवाहू जमिनीतील ओलावा हा पडणाऱ्या पावसावर आणि जमिनीच्या खोलीवर अवलंबून असतो. एकूण पडणाऱ्या पावसापैकी १० ते २० टक्के पाणी जमिनीवरून वाहून जाते. १० टक्के पाणी निचऱ्याद्वारे आणि ६० ते ७० टक्के पाणी बाष्पीभवनाद्वारे निघून जाते.
Water and Soil Conservation
Water and Soil ConservationAgrowon
Published on
Updated on

डॉ. आदिनाथ ताकटे

Indian Agriculture : अवर्षण प्रवण क्षेत्रात जून-जुलैमध्ये पाऊस सुरू होतो. जुलै-ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण घटते. सप्टेंबर महिन्यात १५० ते २०० मि.मी. पाऊस पडतो. ऑक्टोबरच्या मध्यानंतर पाऊस पूर्णपणे थांबतो म्हणून या भागातील ७० टक्के क्षेत्र रब्बी पिकाखाली असते.

त्यापैकी ८० टक्के क्षेत्रावर शेतकरी रब्बी ज्वारीची पेरणी करतात. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी ओलावा साठविण्याच्या दृष्टीने खरीप हंगामातील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत, जिरवणे, मुरविणे आणि साठविणे अत्यावश्यक आहे. या जमिनीत मुरलेल्या पावसावरच रब्बी पिकांचे उत्पादन अवलंबून असते.

सपाट वाफे

कोरडवाहू शेतीमध्ये जेथे पाणी मुरण्याचा वेग जास्त आहे, जमिनीला फारसा उतार नाही अशा ठिकाणी उताराला आडवे वाफे तयार करावेत.

वाफे तयार करताना प्रथम कुळवाची पाळी द्यावी. त्यानंतर बळिराम नांगराने उभे-आडवे ६ मीटर × ६ मीटर अंतरावर उतारास आडवे सपाट वाफे तयार करावेत.

वरंब्याची उंची २० ते ३० सें.मी. ठेवावी. या पद्धतीचे वाफे जागोजागी पाणी मुरविण्यास मदत करतात. त्यामुळे नेहमीपेक्षा ५० टक्के जास्त ओल साठवली जाते. या पद्धतीमुळे रब्बी ज्वारी पिकाचे हेक्टरी उत्पादन २ ते ३ क्विंटलने वाढल्याचे आढळून आले आहे.

सरी वरंबे

मध्यम ते भारी जमिनीत खरीप हंगामात बळिराम नांगराने उतारास आडवे तास घालावेत. त्यामुळे सऱ्या तयार होतात. पडणाऱ्या पावसाचे पाणी सऱ्या मधून जमिनीत मुरते. या पद्धतीत ८० टक्क्यांपर्यंत पाणी जमिनीत मुरते. जमिनीतून पाणी वाहून जात नाही. सऱ्यांची लांबी ९० मीटर पर्यंत ठेवावी. या पद्धतीमुळे उत्पादनात ३५ ते ४० टक्के वाढ होते.

Water and Soil Conservation
Water Conservation Farming : मूलस्थानी जलसंधारणावर द्या भर

बंदिस्त सरी वरंबे

या पद्धतीत मुख्य वरंबे उतारास आडवे, तर बंदिस्त वरंबे उताराच्या दिशेने ठेवावेत. अशा रीतीने उताराला आडवे बंदिस्त सरी वरंबे तयार होतात.

मुख्य वरंब्याची लांबी ६ मीटर व उंची ३० से.मी. ठेवावी. तर बंदिस्त वरंब्याची उंची २० से.मी. व दोन वरंब्यांतील अंतर ३ मीटर ठेवावे.

या पद्धतीत जास्त पाऊस पडला तरी बंदिस्त वरंबे फुटून संथ गतीने पाणी शेतातून बाहेर जाते.

ही पद्धत कोरडवाहू भागात चोपण व क्षारयुक्त जमिनीत पाणी मुरविण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे जमिनीतील विद्राव्य क्षारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

जैविक बांध

समपातळीत उतारास आडवे मातीचे बांध टाकण्याऐवजी अंजन, खस गवत आणि सुबाभूळ यांची लागवड करावी. गवताचे ठोंब किंवा बी समपातळीत उताराला आडवी दोन ओळींत लागवड करावीत. दोन ओळींत ३० सें.मी. अंतर ठेवावे. दोन रोपांतील अंतर १५ ते २० से.मी. ठेवावे.

जैविक बांधामुळे वाहून जाणाऱ्या पाण्यास अडथळा निर्माण होऊन पाण्याचा वेग कमी केला जातो. जमिनीची धूप कमी होते.

गवती बांधामुळे जनावरांना चारा मिळतो. सुबाभळीच्या जैविक बांधाची उंची ३० सेंमी ठेवून कापलेल्या कोवळ्या फांद्यांचा जनावरांना वैरण म्हणून किंवा जमिनीत गाडल्यास हिरवळीचे खत म्हणून उपयोग होतो.

दोन जैविक बांधामुळे या कोवळ्या फांद्या कापून टाकल्यास त्याचा धूप प्रतिबंधक म्हणून उपयोग होतो व सेंद्रिय कर्बाचे प्रमाणही वाढते. त्याद्वारे रब्बी पिकांमध्ये हेक्टरी २५ ते ५० किलो नत्राची बचत करता येते. जैविक बांधामुळे उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

Water and Soil Conservation
Soil and Water Conservation : पाणीटंचाईग्रस्त ‘लाठ खुर्द’ने घडविली किमया

समपातळीत लागवड व मशागत

जमिनीचे सपाटीकरण, नांगरणी, कुळवणी, कोळपणी या सारख्या मशागती व पेरणी समपातळीत पण उताराच्या आडव्या दिशेने कराव्यात. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो.

पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. पाण्याच्या वाहत्या प्रवाहाचा वेग कमी केला जातो आणि मातीची धूप होण्यापासून रोखले जाते.

कोळपणी व खुरपणीमुळे जमीन भुसभुशीत होते. भेगा कमी प्रमाणात पडतात. त्यामुळे जमिनीतील भेगांमधून बाष्पीभवनाद्वारे होणाऱ्या पाण्याचा ऱ्हास कमी होतो.

जमिनीत ओलावा जास्त काळ व जास्त प्रमाणात साठविला जातो.

मशागतीमुळे तणांचा नाश होऊन तणांमुळे कमी होणारा ओलावा वाचून दीर्घकाळ पिकास उपयोगी पडतो.

मूलस्थानी जलसंधारणाचे होणारे फायदे

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब जमिनीत मुरवावा.

नांगरट झाल्यानंतर हेक्टरी १० ते १२ गाड्या शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. त्यानंतर कुळवाच्या पाळ्या देऊन शेतातील काडी कचरा, धसकटे वेचून शेत स्वच्छ करावे.

पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जमिनीच्या उतारावर वाफे तयार करावेत. (३.६० बाय ३.६० चौ.मी. आकाराचे). वाफे तयार करताना सारा यंत्राने सारे करून त्यामध्ये बळिराम नांगराने दंड टाकल्यास कमी खर्चात वाफे तयार होतात. हे वाफे रब्बी ज्वारीच्या पेरणीपूर्वी ४५ दिवस अगोदर करावेत. म्हणजे १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर हा काळ रब्बी ज्वारीच्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये पेरणी करण्यासाठी शिफारस केलेला आहे.

१५ सप्टेंबरपूर्वी ४५ दिवस म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाफे तयार करावेत. पेरणीपूर्वी जेवढा पाऊस पडेल तेवढा त्यामध्ये जिरवावा.

पेरणीच्या वेळी वाफे मोडून पेरणी करावी. पुन्हा सारा यंत्राच्या साहाय्याने गहू, हरभरा पिकासारखे सारे पाडून आडवे दंड पाडावेत. म्हणजे पेरणीनंतर पडलेला पाऊस त्यात अडवून जिरवता येईल. या तंत्राने रब्बी ज्वारीचे ३० ते ३५ टक्के उत्पादन वाढते.

- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(मृद्‍ शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com