Water Conservation Farming : मूलस्थानी जलसंधारणावर द्या भर

Conservation of Water : जमिनीची मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर पेरणीपूर्वी उताराला आडवी खोल सरी काढल्यास जलसंधारणासाठी उपयुक्त ठरते. उभ्या पिकांत ठरावीक अंतरानंतर सरी काढावी. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

डॉ. आनंद गोरे, श्रीमती आम्रपाली गुंजकर

कोरडवाहू शेतीमध्ये पावसाचे उशिरा आगमन झाल्यास उशिरा झालेल्या पावसाच्या पाण्याचा आणि उपलब्ध ओलाव्याचा कार्यक्षम उपयोग होण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून पुढील बाबीचा अवलंब करावा.

आंतरपीक पद्धतीचा अवलंब

आंतर पीक पद्धतीमुळे वेळेवर पेरणी आणि उशिरा पेरणी अशा दोन्ही परिस्थितींत शाश्‍वत उत्पादन आणि अधिक आर्थिक उत्पन्नाबरोबरच मृद्‍ व जल संवर्धन होण्यासाठी मदत होते.

उशिरा पावसात किंवा अधिक पावसामुळे किंवा कीड, रोगामुळे एक पीक हाताचे गेले किंवा एका पिकास बाजारभाव कमी मिळाल्यास दुसरे पीक ही जोखीम कमी करते.

कपाशी आणि मूग/ उडीद /सोयाबीन (१:१), ज्वारी अधिक तूर (४:२ किंवा ३:३), सोयाबीन अधिक तूर (४:२), बाजरी अधिक तूर (३:३) या आंतरपीक पद्धतीचा वापर करावा.

जलसंधारण सरी

जमिनीची मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर पेरणीपूर्वी उताराला आडवी खोल सरी काढल्यास जलसंधारणासाठी उपयुक्त ठरते.

बैलाच्या सरीच्या नांगराने अथवा कोळप्याने उतारानुसार ५ ते १० मीटर अंतरावर ४५ ते ६० सेंमी (१.५ ते २ फूट रुंद) व ३० सेंमी खोल सरी काढावी. सरीला ०.२ ते ०.४ टक्का उतार दिल्यास ही सरी अतिरिक्त पाणी शेताबाहेर वाहून नेण्यास उपयुक्त ठरते.

जलसंवर्धन चर

काळ्या खोल व भारी जमिनीमध्ये समपातळी किंवा ढाळीच्या बांधाच्या काटछेदाचे चर घेऊन त्यातील माती काठावर टाकून बांध निर्माण करावा.

चर सलग न ठेवता, ठरावीक अंतरावर खोदलेला भाग राखण्यात येतो. या चरामध्ये साठवलेले पाणी गरजेच्या काळात संरक्षित सिंचनाकरिता उपयोगात येते.

Agriculture
Water Conservation : कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंवर्धन

उभ्या पिकांत ठरावीक अंतरानंतर सरी

पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी आंतरमशागतीची सुरुवातीची कामे पूर्ण झाल्यानंतर बळिराम किंवा लाकडी नांगराने पिकांच्या ओळीमध्ये (ठरावीक अंतरावर किंवा ठरावीक ओळीनंतर) उदा. कापूस, तूर यासारख्या जास्त अंतरावरील पिकांमध्ये प्रत्येक एक ते दोन ओळींनंतर आणि तूर, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन या सारख्या कमी अंतरावरील पिकामध्ये प्रत्येक ४ ते ६ ओळींनंतर सऱ्या काढाव्यात.

१५ ते २० सेंमी खोलीच्या अरुंद सऱ्या पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संधारण होण्यास तसेच अतिरिक्त झालेल्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.

सरी वरंबा व बंदिस्त सरीचा उपयोग

हलक्या व मध्यम उताराच्या जमिनीवर ही पद्धत उपयुक्त ठरते. बळिराम किंवा सरीच्या नांगराने किंवा कोळप्याच्या साह्याने पेरणीपूर्वी पिकानुसार ५० ते ६० सेंमी अंतरावर सरी वरंबा तयार करून वरंब्यावर लागवड करता येते.

कोरडवाहू शेतीमध्ये आंतर मशागतीची सुरवातीची कामे झाल्यानंतर सरी वरंबे तयार करून उताराच्या जमिनीमध्ये सरीच्या लांबीवर ५ ते ७ मीटर अंतरावर सऱ्यांमध्ये आडवे वरंबे तयार केल्यास सरीमध्ये जमा झालेले पाणी उताराच्या दिशेने न वाहता जमिनीत तेथेच मुरण्यास मदत होते.

Agriculture
Water Conservation : प्रत्येक शेत म्हणजे लघू पाणलोटच!

बंदिस्त वाफे / बंदिस्त बांध

अल्प उताराच्या तसेच छोट्या आकाराच्या क्षेत्रात परीघावर बांध टाकून मूलस्थानी जलसंधारण करता येते.

एक मीटर उंचीपर्यंतचा बांध आणि आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याकरिता सांडव्याची व्यवस्था करावी लागते.

शेततळे

बऱ्याच वेळा मृद्‍ व जलसंधारणाच्या विविध उपायांचा अवलंब करूनही जमिनीत न मुरलेले पावसाचे अतिरिक्त पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाते. हे पाणी शेताच्या खोलगट भागात शेततळ्याद्वारे साठवून संरक्षित सिंचनाकरिता उपयोगात आणता येते.

तुरीसारख्या पिकामध्ये १ ते २ संरक्षित सिंचनामुळे उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

आच्छादनाचा वापर

बऱ्याच वेळा सुरवातीस पावसाच्या आगमनानंतर पावसाचे एक ते दोन खंड विशेष करून जुलै - ऑगस्ट महिन्यात आढळून येतात. अशावेळी जमिनीतील ओलावा कमी होऊन पिकांना पाण्याचा ताण बसतो. यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. (उदा. सुबाभूळ, गिरिपुष्पाचा पाला, सोयाबीन, भात, वाद का/भुसा, मातीची भर इत्यादी).

आधुनिक सिंचन पद्धती उदा. पिकानुसार ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा अवलंब करावा.

पाण्याचा ताण सहन करण्याच्या दृष्टीने पोटॅशिअम नायट्रेट (१३:००:४५) १ ते १.५ टक्का (१०० ते १५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) याप्रमाणे फवारणी करावी.

हलकी कोळपणी

पावसाचा खंड आढळून आल्यास हलकी कोळपणी करून जमिनीच्या भेगा बुजवाव्यात. यामुळे ओलावा टिकवून ठेवता येतो. जमिनीतील ओलावा उडून जाण्याचे प्रमाण कमी होते.

रुंद वरंबा सरी पद्धत

भारी जमिनीमध्ये जलसंधारण तसेच अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याच्या दृष्टीने रुंद वरंबा सरी पद्धत उपयुक्त आहे. जास्त अंतरावरील पिकाच्या एक ते दोन ओळी तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळी वरंब्यावर घेता येतात. उदा. सोयाबीन पिकाच्या ३ ते ४ ओळी घेता येतात.

केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेने विकसित केलेले बीबीएफ यंत्र किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या बीबीएफ यंत्राचा उपयोग करून रुंद वरंबा सरी तयार करून पेरणी करता येते. या यंत्राद्वारे गादीवाफा तयार करणे, पेरणी करणे, खते देणे अशी कामे एकाच वेळी करता येतात याद्वारे बियाणे आणि खतांमध्ये बचत होते, उत्पादनात वाढ होते.

डॉ.आनंद गोरे, ९५८८६४८२४२

(अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com