Agriculture Commodity Market : हरभरा वगळता सर्व पिकांच्या दरात नरमाई

Market Update : पावसामुळे सर्वच शेतीमालाची आवक या सप्ताहात कमी झाली. समाधानकारक उत्पादनाच्या अपेक्षेने या सप्ताहात हरभरा वगळता सर्व पिकांच्या किमती याही सप्ताहात उतरल्या.
Agricultural Commodity Market
Agricultural Commodity MarketAgrowon
Published on
Updated on

Agriculture Future Price :

फ्यूचर्स किमती : सप्ताह २० ते २६ जुलै २०२४

पावसामुळे सर्वच शेतीमालाची आवक या सप्ताहात कमी झाली. समाधानकारक उत्पादनाच्या अपेक्षेने या सप्ताहात हरभरा वगळता सर्व पिकांच्या किमती याही सप्ताहात उतरल्या.

गेल्या सप्ताहात अंदाजपत्रक सादर करण्यापूर्वी आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला गेला. यात शासनास भारतातील शेतीमालाचा कमोडिटी बाजार बळकट करण्याविषयी आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या सूचना जवळ जवळ या पूर्वीच्या सर्वच अहवालात केल्या गेल्या आहेत; पण तरीही परिस्थिती सुधारत नाही.

गेल्या वर्षी (२०२३-२४) भारतातील प्रमुख दोन कमोडिटी बाजारातील (NCDEX व MCX) एकूण उलाढाल रु. ५,१९४ हजार कोटी रुपयांची झाली. त्यात शेतीमालाचा हिस्सा केवळ ४ टक्के होता (रु. २११ हजार कोटी) होता.

या ४ टक्क्यांमध्ये सुद्धा चार वस्तुंचा (गवार बी, गवार गम, जीरे व कापूस पेंड) हिस्सा ७४ टक्के होता. उरलेल्या वस्तुंमध्ये हळद, एरंडी बी व धणे यांचा एकूण सहभाग २२ टक्के होता; तर भुईमूग, बाजरी, बार्ली व मका यांचा हिस्सा अगदी नगण्य होता. या परिस्थितीला शासनाचे धरसोड धोरण जितके जबाबदार आहे तितकेच आपल्या शेतीमालाचे स्वरूपसुद्धा कारणीभूत आहे.

Agricultural Commodity Market
Ginger Market Deals : आले उत्पादक, व्यापाऱ्यांशी चर्चेतून तोडग्याचा प्रयत्न

साधारणतः ज्या शेतीमालाचा प्रक्रिया उद्योग मोठा असतो किंवा उद्योगात कच्चा माल म्हणून प्रमुख सहभाग असतो किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारात त्यांचे स्थान महत्वाचे असते, त्यांच्यासाठी या उद्योगांना किंवा व्यापाऱ्यांना अशा शेतीमालाच्या कमोडिटी बाजारांची जरूरी अपरिहार्य वाटते.

आपली शेती व्यवस्था अजून त्या पातळीवर आलेली नाही. त्यामुळे असे कमोडिटी बाजार गवार बी व गवार गम यासारख्या शेतवस्तूंपुरतेच मर्यादित राहिले आहेत. त्यांचा शेतकऱ्यांना होणारा फायदा म्हणूनच कमी आहे.

१९ जुलै रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत :

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात ०.१ टक्क्याने घसरून रु. ५७,९४० वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा १.३ टक्क्याने घसरून रु. ५७,२०० वर आले आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स भाव २.५ टक्क्यानी घसरून रु. ५६,७३० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भाव रु. ५८,००० वर आले आहेत.

ते स्पॉट भावापेक्षा १.४ टक्क्याने अधिक आहेत. NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो, २९ मिमि) या सप्ताहात ०.७ टक्क्याने घसरून रु. १,४९६ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५३३ वर आले आहेत तर एप्रिल फ्यूचर्स रु. १,५८५ आहेत. कापसाचे या वर्षासाठी हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत. (अनुक्रमे रु. १,४२४ व रु. १,५०४ प्रति २० किलो.)

Agricultural Commodity Market
Agrowon Podcast : सोयाबीनचा बाजार दबावातच ; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत टोमॅटो दर ?

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात १.६ टक्क्याने घसरून रु. २,५१० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.४ टक्का घसरून रु. २,५०० वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती ०.१ टक्क्याने घसरून रु. २,५१३ वर आल्या आहेत.

ऑक्टोबर फ्यूचर्स रु. २,५४२ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.७ टक्क्याने अधिक आहे. मक्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग नाही; मात्र हेजिंगसाठी या किमतींवर लक्ष ठेवावे. मक्याचा हमीभाव रु. २,२२५ आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १६,३७० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या याच पातळीवर स्थिर आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती १ टक्का घसरून रु. १५,७२० वर आल्या आहेत. ऑक्टोबर किमती रु. १६,४०६ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या फक्त ०.२ टक्क्याने अधिक आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ६,६१३ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.४ टक्क्यांनी वाढून रु. ६,८३० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,०८८ वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. आवक कमी होऊ लागली आहे.

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) १.१ टक्क्याने घसरून रु. ४,५४५ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. किमतीतील उतरता कल कायम आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,६४३ वर आली होती. या सप्ताहात ती ३.५ टक्क्यांनी घसरून रु. १०,२७१ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. २,८०० होती; या सप्ताहात ती रु. २,७३० वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ५,००० वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com