Maharudra Mangnale : लिंबू उत्पादकांची प्रेरणादायी भेट
Lemon Farming : तीन दिवसांपूर्वी मित्रवर्य डॉ. श्रीकांत गोरे यांचा फोन आला होता. कर्नाटकातील लिंबू उत्पादक शेतकरी नागेंद्रप्पा गोरेवाडीला येणार आहेत. शक्य झालं तर बघा. नागप्पाबद्दल डॉक्टरांच्या तोंडून बरचं ऐकलं होतं. त्यांच्या गावी ते जाऊनही आले होते. जमेल की नाही, याची खात्री नसल्याने, बघतो. एवढंच उत्तर दिलं. पण मनामध्ये जायचंच असं होतं.
काल मुक्तरंगला बारा वाजता पोचलो. एक वाजेपर्यंत काम केलं. लातूरमधील आडते व डॉक्टरांचे मित्र मलंगप्पा यांना फोन केला. त्यांच्यासोबत जायचं असं ठरलं होतं. अडीच वाजता देशिकेंद्र समोर त्यांच्या जीपमध्ये बसलो. नागेंद्रप्पा पाटील आणि सुर्यकांत चनशेट्टी या दोघांची औपचारिक ओळख झाली आणि गप्पा सुरू झाल्या. शेती किती, कोणती पिकं घेता, लिंबूची बाग किती, अशी प्राथमिक माहिती मी घेतली.वाटेत रस्त्याचं काम सुरू असल्याने, सगळा धुरळाच धुरळा गाडीत येत होता.
मी बोलणं बंद करून नाकाला रूमाल बांधला. चार वाजता गोरेवाडीत पोचलो. चहा घेऊन लगेच शेताकडं निघालो. डॉक्टरांनी मोसंबी, संत्री आणि लिंबूची लागवड केलीय. लिंबू लावण्यामागची प्रेरणा नागेंद्रप्पा हेच आहेत. रोपंही त्याच भागातून आणलीत.लिंबू बाग बघून त्यावर चर्चा झाली. झाडांना पुरेसं पाणी मिळत नव्हतं.
अप्पांचं म्हणणं होत की, लिंबूसाठी ठिबकचं पाणी पुरेसं नाही. त्याला खुलं पाणी द्यायला हवं. काही झाडांना भरपूर मोसंबी लागलीय.एका झाडाच्या परिपक्व झालेल्या दहा-बारा मोसंबी डॉक्टरांनी तोडल्या.
सगळ्यांच्या हातात एक एक दिली. प्रत्येकाने सोलून तिथंच खाल्ली. गोड,चवदार बनलीय मोसंबी. फोटोग्राफी झाली आणि मोसंबीच्या बागेचं उद्घाटन झालं. बाजुच्या संत्र्याच्या बागेतही असंच केलं.संत्री अद्याप पुरेशी परिपक्व झालेली नाही. तिथून विहिरीवर गेलो.दरम्यान नागेंद्रप्पा आणि सुर्यकांत यांच्याशी माझं बोलणं सुरूच होतं.
चितली हे या दोघांचं गाव. कलबुर्गी जिल्हा,आळंद तालुका.उमरग्यापासून २५कि.मी.वर. नागेंद्रप्पाना २० एकर तर सुर्यकांतकडे १०एकर जमीन. खरीपाला सोयाबीन, तूर हेच मुख्य पिक. अप्पाकडे दिड एकर लिंबू बाग तर सुर्यकांतकडं एक एकर.सुर्यकांतची बाग वडिलोपार्जित. वयाच्या २० व्या वर्षांपासून तो शेती करतोय.
तेव्हापासून लिंबू बाग आहे.कितीही कमी भाव लागला तरी, लिंबात नुकसान होत नाही. हे बारमाही फळ असल्याने, उन्हाळ्यातील हंगाम भरपूर पैसे मिळवून देतो.एकदा लागवड करून नीट जोपासना केली तर, ३०-३५वर्षे लिंबू बाग उत्पन्न देते, असं त्याचं म्हणणं.
दोघेही लिंबू बद्दल अतिशय सकारात्मक बोलत होते.त्यांच्या छोट्याशा गावात लिंबू उत्पादक ७०शेतकरी आहेत. सोलापूर आणि विजापूर ही लिंबूची मोठी बाजारपेठ असल्याचंही नागेंद्रप्पानी सांगितलं. माझ्यासाठी ही माहिती नवीन व उत्सार्हवर्धक होती. या विषयावर आमची भरपूर चर्चा झाली. मी त्यांच्या लिंबू बागा बघण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी आग्रहाचं निमंत्रण दिलयं. एकदा या लिंबू बागा प्रत्यक्ष बघणं मला गरजेचं वाटतं.त्यानंतर जून-जूलै मध्ये २५-३० झाडं लावण्याचा मी विचार करेन.
नागेंद्रप्पा व सुर्यकांत यांचा शेतीमाल लातूरला मलंगप्पा यांच्या आडतीवर येतो. त्यांच्यामुळं डॉ. गोरे यांची ओळख झाली. आणि त्यांच्यामुळं माझी. मी त्या दोघांचेही फोन नंबर घेतलेत. त्यामुळं फोन करून अचानक मी कधीही त्यांच्या गावी जाऊ शकतो. आम्ही सगळेजण डॉ. गोरे यांच्या प्रेमातले असल्याने, आमच्यासाठी शेतातच उत्तम जेवण तयार केलं होतं. जेवण करून रात्री साडेनऊ वाजता ते सगळे परतले. मी मुक्काम केला. लगेच झोपून गेलो.
सकाळी डॉक्टर उठेपर्यंत माझं तासभर गँलरीतच फिरणं झालं. दोघांनी काळी कॉफी घेतली. घराच्या खालीच तुतीच्या चार-पाच झुडपांना फळं पिकून काळी पडली होती. नाष्ता समजून मी ती पोटभर खाल्ली. चार गावरान टोमँटोही खाल्ले.नऊ वाजता ढोकीवरून बसमध्ये बसलो. साडेदहा वाजता मुक्तरंग जवळ पोचलो. हर्षची मम्मी रजनीने पाठवलेला डबा नेमका त्याचवेळी नंदूने दिला. आता जेवण करून ही कथा टायपली.
थोडी धावपळ, दगदग होणं अपेक्षितच होतं.पण माझ्यासाठी हे छोटसं पर्यटनच ठरलं. शेतीत मुक्काम करणं माझ्या आवडीचं.ती संधी मिळाली. शेतीचा भला मोठा पसारा डॉक्टर आनंदाने सांभाळत आहेत, ही माझ्यासाठी आनंददायी बाब.ज्या मित्रांना आपली भेट हवीहवीशी वाटते, त्यांना मी आवर्जून भेटतोच! आजबाजुला सगळं वातावरण नैराश्यग्रस्त असताना, अशा भेटी जगणं अधिक आनंददायी करतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.