
Chh. Sambhajinagar News : साप आणि मधुमक्षिका हे दोन्ही जीव निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. या विषयावरून जास्तीत जास्त जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची गरज आहे. यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार यांच्यामार्फत देखील विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते, असे प्रतिपादन खासदार डॉ. भागवत कराड यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली स्थापना दिवसानिमित्त केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे, कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा), इंडियन नॅचरल हनीबीज, पुणे, स्वरदर्शन सांस्कृतिक व सामाजिक संस्था (ग्रामोदय प्रकल्प) वाळूज आणि कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमक्षिका पालन प्रशिक्षण, सर्प दिन आणि ताज्या फळे, भाजीपाला व त्यांचे प्रक्रिया उत्पादने यांच्या निर्यातीसंदर्भात क्षमतावर्धन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कराड बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, उपवन संरक्षक श्रीमती सुवर्णा माने, सेवानिवृत्त सहायक वन संरक्षक संजय मारणे, अविनाश गायकवाड, श्रीमती ज्योती गायकवाड, शिवाजी दहिवाल, डॉ. किशोर पाठक,केव्हीके कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाटगावकर आदींची उपस्थिती होती. श्रीमती माने म्हणाल्या, की सापांची ओळख आणि सापांचे आपल्या इकोसिस्टीममधील महत्त्व याबद्दल जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
श्री. मारणे यांनी इंडियन नॅचरल हनीबीज आणि वन विभागामार्फत मधुमक्षिका पालनासाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ.पाठक यांनी मराठवाड्यात आढळणारे साप ओळख, समज, गैरसमज आणि काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. पाटगावकर यांनी कृषी विज्ञान केंद्रातील विविध सुविधांची माहिती दिली. शास्त्रीय मधुमक्षिका पालन या विषयावर राहुल काळे यांनी मार्गदर्शन केले.
अपेडाचें श्री बामणे यांनी अपेडाची कार्यपद्धती, अन्न निर्यात क्षेत्रातील योगदान, विविध योजना, गॅप प्रमाणाची प्रक्रिया आणि अपेडा सदस्य नोंदणी याविषयी माहिती दिली. नैसर्गिक शेती या विषयावर डॉ. अनिता जिंतूरकर यांनी मार्गदर्शन केले.
विषय विशेषज्ञ डॉ. संजूला भावर यांनी फळमाशीमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत, तसेच फळे व भाजीपाल्यावर योग्य फवारणी व संरक्षण सेंद्रिय कीड नियंत्रण, कीटकनाशकांचा सुरक्षित वापर व गुणवत्ता राखण्याचे उपाय यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात निर्यातदारांनी आपला निर्यात अनुभव उपस्थितांसमोर मांडला. एफपीओचे प्रतिनिधी बाळासाहेब पाटील यांनी निर्यात प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय याविषयी अनुभव सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.