Agriculture Kolhapur News : शेतीच्या वीज पंपासाठी आता स्मार्ट मीटर आली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यासाठी ५०० मीटर उपलब्ध करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत प्रायोगिक तत्त्वावर १०० मीटर बसवण्यात आले आहेत. तर उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून वीज जोडणी घेतलेल्या ग्राहकांनाच असे मीटर देण्यात येणार आहेत.
वीज महावितरणने हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन सिस्टीम (एच.व्ही. डी.एस.) ही योजना आणली. ११ हजार व्होल्टच्या वीज वाहिनीवरून शेती पंपांना वीज जोडणी दिली जाते. वीज पंपापासून दोनशे मीटर अंतरापुढे विद्युत जनित्र असेल तर त्या शेतकऱ्याला या योजनेतून वीज कनेक्शन दिले जाते. शिवाय एका शेतकऱ्यासाठी जनित्रही बसवून दिले जाते.
५ अश्वशक्तीच्या पंपासाठी १०, तर ७.५ अश्वशक्तीसाठी १६ एच. पीचे जनित्र स्वतंत्रपणे दिले जाते. यामुळे अतिभारामुळे पंप बंद पडण्याचा प्रकार बंद होतो. तसेच वीज गळतीही यातून बंद होते. यासाठीचा सारा खर्च महावितरण कंपनीकडून केला जातो. जुनी आणि नवीन अशा दोन एचव्हीडीएसच्या योजना आहेत.
नव्या योजनेची कार्यवाही आता सुरू झाली आहे. दरम्यान, जुन्या योजनेतून गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील ७८४ ग्राहकांना वीज जोडणी देऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र जनित्र बसवून दिले आहे. अशा ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर आले आहेत. यातील शंभरभर ग्राहकांसाठी मीटर क्षेत्रीय कार्यालयांकडे पोहोचवले आहेत. संबंधितांना मीटर बसवण्याची कार्यवाही सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांनी सांगितले.
स्मार्ट मीटर अत्याधुनिक आहे. मोबाईल रिचार्जप्रमाणेच यालाही रिचार्ज मारावा लागणार आहे. पाणी उपशाचे प्रमाण पाहून शेतकऱ्यांनी या मीटरला रिचार्ज मारावयाचा आहे. त्यातील बॅलन्स संपत आल्यानंतर सूचना मिळते. लवकर रिचार्ज मारले नाही, तर आपोआप पंप बंद होणार आहे.
दरम्यान, सध्या बसवण्याची कार्यवाही सुरू असलेले मीटर अॅक्टीव्ह केलेले नाही. प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट मीटरची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.