Water Crisis : मराठवाड्यातील धरणांनी तळ गाठला; विभागात फक्त ८.७४ टक्केच पाणीसाठा

Marathwada Water Crisis : मराठवाड्यात यंदा भीषण पाणी टंचाई उद्भवली असून दुष्काळाचे चटके १३२८ गावांसह ५२१ वाड्यावस्त्यांना बसत आहेत.
Water Crisis
Water CrisisAgrowon

Pune News : जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार विभागातील मोठ्या ४४ प्रकल्पात ८.७४ टक्केच पाणीसाठा आहे. ८१ मध्यम प्रकल्पात ११.४४ आणि ७९५ लघु प्रकल्प ६.७० टक्के पाण्यावर आले आहेत. तर विभागातील एकूण ९२० प्रकल्पात ८.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा देखील पाच टक्क्यांच्या खाली गेला असून सध्या धरणात ४.४९ टक्के पाणी शिल्लक आहे. यामुळे मराठवाड्यात पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सरकारवर टीकेची झोड

दरम्यान राज्यात लोकसभा निवडणुकांमुळे आचारसंहीता लागू असल्याने सरकारला निर्णय घेण्यास अडचणी येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तर राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथील करण्यासाठी विनंती केल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले होते. मात्र दुष्काळ आणि मॉन्सून पूर्व आढावा बैठका घेऊन देखील ठोस निर्णय सरकारकडून घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षांकडून सरकारवर टीकेची झोड झोडली जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला यावरून धारेवर धरत उपाय योजना करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे.

Water Crisis
Water shortage Crisis : राज्याच्या अनेक भागात पाणीबाणी; धरणे आटली, मराठवाड्यासह प.विदर्भात परिस्थिती गंभीर

तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या समित्या दुष्काळावरून राज्याचा दौरा करत आहेत. यावेळी वडेट्टीवार आणि पटोले यांनी चारा-पाण्याच्या प्रश्नावरून सरकारसह मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली होती. पटोले यांनी शिंदे सुट्टीवर गेल्यावरून टीका केली होती. तसेच आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात याचे भान राखा असा सल्ला दिला होता. यावरून देखील आता आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

दुष्काळाची झळ

मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती भयावह झाली असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथे पाणी नसल्याने शेतातील पीक करपून जात आहे. तर जनावरांना चारा नसल्याने शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीस काढली आहेत. यामुळेच सध्या जनावरांचे बाजार गजबजले आहेत.

Water Crisis
Water Crisis : जलसंकटाचे सावट! नागपूरसह पालघरचे पाडे, गडचिरोलीचा अतिदुर्गम भाग आणि धुळ्यात भीषण पाणी टंचाई

१३२८ गावांसह ५२१ वाड्यावस्त्यांच्या घशाला कोरड

मराठवाड्यात यंदा भीषण पाणी टंचाई उद्भवली आहे. यामुळे येथील १३२८ गावांसह ५२१ वाड्यावस्त्यांच्या घशाला कोरड आहे. येथे सहा जिल्ह्यांसाठी १९१४ टँकर पाणीपुरवठ्यासाठी लागत असून एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ७२५ टँकर सुरू आहेत.

पाण्यासाठी भटकंती

विभागातील पाणी स्थिती पाणीबाणीपर्यंत आली असून विभागातील सर्व ९२० प्रकल्पातील पाणीसाठा ८.६६ टक्क्यांवर आला आहे. यामुळे मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ महिलांसह लहान लहान मुलांवर आली आहे.

जायकवाडी पाच टक्क्यांच्या खाली

मराठवाडा विभागातील सर्वात मोठे धरण असणाऱ्या जायकवाडी धरणात जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार फक्त ४.४९ टक्के पाणी शिल्लक असून पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत कारावी लागत आहे. सध्याची पाणी पातळी पाहता पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले असून आवर्तन थांबविण्यात आली आहेत. तसेच शिल्लक असणारे पाणी जून अखेरपर्यंत पुरणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com