
सौ. सुरेखा बोऱ्हाडे
सिंधूताई यांचा जन्म वर्धा जिल्ह्यात अभिमन्यू साठे या गाईगुरं राखणाऱ्या वडिलांच्या घरी झाला. नको असताना जन्माला आलेली मुलगी म्हणून तिचं नाव चिंधी ठेवलं. घरात अतिशय गरिबीची परिस्थिती असल्यामुळे इयत्ता चौथी उत्तीर्ण झाल्यानंतर बालवयातच २६ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या व्यक्तींबरोबर त्यांचं लग्न लावून दिलं. पती श्रीहरी सपकाळ यांच्या घरी प्रचंड सासूरवास सहन करावा लागला. जंगलातून लाकूडफाटा गोळा करून आणणे, शेण गोळा करणे अशी कामे त्यांना करावी लागत.
संघर्ष
१८ व्या वर्षापर्यंत सिंधूताईंची तीन बाळंतपणे झाली. चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांना पहिल्यांदा मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागले. वनामध्ये चरणाऱ्या गुरांच्या मागे त्यांचं शेण गोळा करण्याचं काम गावातील बाया करत. हे काम करताना त्या अर्धमेल्या होत, परंतु शेणाचा लिलाव वन अधिकारी करायचे. तेव्हा या महिलांना कोणतीही मजुरी दिली जायची नाही. याविरुद्ध सिंधूताईंनी प्रथम आवाज उठवला.
महिलांना मजुरी मिळावी म्हणून लढा सुरू केला. या लढ्यात महिला जिंकल्या, परंतु याची जबर किंमत सिंधूताईंना चुकवावी लागली. ताईंच्या धैर्यामुळे गावातील जमीनदार दुखावला गेला. त्याची जंगल खात्यातून येणारी मिळकत बंद झाली.
म्हणून त्याने सिंधतूाईंच्या चारित्र्याबद्दल त्यांच्या नवऱ्याचे कान भरले. त्यांचे दिवस भरलेले असताना लाथा मारून नवऱ्याने घराबाहेर काढले. गोठ्यामध्ये आणून टाकले. अशा अवस्थेत त्यांनी एका मुलीला जन्म दिला. गावातून गावकऱ्यांनी हाकलले.सिंधूताईंना माहेरी जन्मदात्या आईनेही आधार दिला नाही.
ममता सदनची स्थापना
परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनवर नवजात बालकाला घेऊन त्या भीक मागायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेलं एखादं फळ मिळावं म्हणून त्या हात पसरायच्या. लहान मुलीला घेऊन आत्महत्येचा त्यांनी प्रयत्न केला होता.
भीक मागून कधी एकट्याने न खाता रेल्वे स्टेशनवर आजूबाजूला असणाऱ्या भिकाऱ्यांना स्वतःच्या घासातला घास त्या भरवायच्या. या अनाथ मुलांच्या जीवनाला दिशा दिली पाहिजे. हा विचार करून त्यांनी पुण्याजवळील पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावी १९९४ मध्ये ममता बाल सदनची स्थापना केली.
सिंधूताईंनी आपल्या अनाथ मुलांच्या पालनपोषणासाठी ग्रामीण भाग पिंजून काढला. ठिकठिकाणी त्या आपल्या अनाथ मुलांच्या व्यथा, त्यांची परिस्थिती सांगून, गोड गळ्याने गाणे गाऊन मदत मिळवत. ममता बाल सदन संस्थेबरोबरच त्यांनी बालनिकेतन हडपसर, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह चिखलदरा, अभिमान बाल भवन वर्धा, गोपिका गाई रक्षण केंद्र वर्धा, ममता बाल सदन सासवड, सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्था पुणे या संस्था सुरू केल्या. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले. परदेशातूनही आपल्या अनाथ मुलांना अनुदान मिळावे या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार
अनाथ मुलांची आई होताना त्यांनी अनेक हाल-अपेष्टा सोसल्या, तेव्हा त्यांचे हे कार्य मोठे होत गेले. घरातून हाकलून देणारा पती वृद्धावस्थेत जेव्हा सिंधूताईंच्या आश्रयाला आला, तेव्हा अनाथ मूल म्हणून संस्थेत स्थान दिले. स्वतःचे काटेरी आयुष्य असूनही त्यांनी अनेकांच्या आयुष्यात मळे फुलवले.
अनाथ मुलांना पालनपोषण करण्याबरोबरच त्यांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायांवर उभे केले. अनाथ मुलींचे विवाह करून दिले. दीपक गायकवाड या मुलाला दत्तक घेतले. सिंधतूाईंना त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराबरोबर ७५० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यांच्या या संघर्षमय जीवनावर ‘मी सिंधूताई सपकाळ’ हा चित्रपट प्रकाशित झाला. ‘अनाथांची यशोदा’ हा अनुबोधपट प्रसिद्ध झाला.
महाराष्ट्र शासनाने त्यांना समाजभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित केले. अनेक ठिकाणी त्यांनी शाळा, महाविद्यालय व सामाजिक ठिकाणी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या समुदायापुढे उद्बोधनपर, प्रेरणादायी भाषण करून कार्यदायी जीवनाच्या विचारांची ज्योत पेटवली. पुणे येथे ४ जानेवारी २०२२ ला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. पण निराधारांसाठी सिंधूताईंसारख्या ज्योती स्वतःवरील काजळी दूर सारत समाजात प्रकाश पसरविण्याचे कार्य करतात. अशा ऊर्जेची, उजेडाची प्रेरणा समाजाला मिळते.
९१५८७७४२४४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.