Viju Anna Borade : मातीमग्न विजू आण्णांची अविरत कृषी चळवळ

Agriculture Reformer : विजूअण्णा बोराडेंची एकच भूमी, एकच आकाश म्हणजे शेती आणि माती. पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकरांनी एका शब्दात अण्णांचे वर्णन केले आहे, ‘मातीमग्न.’
Agriculture Reformer Viju Anna Borade
Viju Anna Borade Agrowon
Published on
Updated on

श्रीकांत देशमुख

Indian Agriculture : ते १९८५-८६ साल असावे. मी त्या वेळी औरंगाबादला (म्हणजे आताचे छत्रपती संभाजीनगर) विद्यापीठात एम.ए. करत होतो. सोबतच दैनिक मराठवाड्यात युवा पत्रकारिता. घाटी दवाखान्यात ‘हॅलो’ नावाची डॉक्टरांची एक संघटना कार्यरत होती. शशिकांत अहंकारी हे तिचे प्रमुख. खेड्यापाड्यात जाऊन आरोग्य जागृतीचे काम करणारा उत्साही डॉक्टर तरुण-तरुणींचा हा एक मोठा गट.

बहुतांश मुलं-मुली ही मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली. खेडी आणि खेड्यातल्या माणसांबद्दल एक प्रकारचे आकर्षण त्यांना वाटणे स्वाभाविक. ‘हॅलो’ने एकदिवसीय कार्यशाळा ठेवलेली. मलाही त्यात शेतकरी चळवळ आणि आजचा तरुण अशा काहीशा विषयावर बोलायला आमंत्रित केलेले.

त्या वेळी मी खूपच नवखा होतो आणि शरद जोशींच्या शेतकरी संघटनेत खूप उत्साहाने काम करत होतो. त्यासोबतच डाव्या, समाजवादी, आंबेडकरवादी मंडळीतूनही सारखा वावर होताच. अगदी आदर्शवादी भाबडा वाटावा असा हा तारुण्याचा कालखंड.

‘हॅलो’च्या कार्यशाळेत मी काय बोललो हे आता काही आठवत नाही. या कार्यशाळेत आलेला एक माणूस मात्र नंतरच्या काळातही कायम स्मरणात असलेला. शिडशिडीत उंच असा बांधा, अंगावर खादीचे कपडे, अतिशय अनाग्रही साधेसे तार्किक बोलणे, संथ थांबून थांबून काहीतरी ठाशीव मांडण्याची हळू तरीही आग्रही लकब... हे सारे आजही आठवते. शेती, पाणी आणि मातीबाबतच्या आपल्या प्रयोगाबद्दल हा माणूस बराच वेळ बोलत होता.

हा माणूस म्हणजे विजय बोराडे. या कार्यशाळेतील सर्वात महत्त्वाचे भाषण त्यांचेच झाले. त्या वेळी त्यांना ‘अण्णा’ ही प्रेमळ उपाधी बहुदा लागलेली नसावी किंवा मला माहीत तरी नसावी. विजूअण्णा बोराडे यांचे मला झालेले हे पहिले दर्शन.

सतत धावत्या आयुष्यात अनेक माणसे खूपदा भेटतात, पण फारच थोडी त्यांच्या आणि आपल्याही नकळत आठवणींच्या तळघरात जाऊन बसतात. कधीतरी कुठल्यातरी निमित्ताने अधून मधून कायम बाहेर डोकावत असतात.

ठरवून न केलेले हे सारे असते, म्हणूनच महत्त्वाचे. विजूअण्णा असेच कायम माझ्यात डोकावणारे. त्यांच्या आणि माझ्या आजवरच्या प्रत्यक्ष भेटी चार-पाचच्या वर नाहीत, तरी असे काहीसे घडत असते. हे माझ्या एकट्याच्याच बाबतीत नाही, तर अशी बरीच माणसे भेटत असतात की जी अण्णांबद्दल खूप आतून बोलावं, तशी सहज बोलत असतात.

Agriculture Reformer Viju Anna Borade
Indian Agriculture : अशांत शेतकरी, निवांत सरकार

त्यानंतर अण्णांची प्रत्यक्ष भेट झाली ती २०१७-१८ मध्ये. म्हणजे तब्बल तीन दशकांनंतर मी अण्णांना भेटत होतो. निमित्त होतं उस्मानाबाद ( म्हणजे आताचे धाराशिव) येथील अरविंद गोरेंच्या आंबेडकर कारखान्याच्या एका कार्यक्रमाचे.

त्यासाठी शरदराव पवार आवर्जून आलेले. तिसेक वर्षांपूर्वीची अण्णांची देहबोली, ऋजूता, संयतपणा तसाच कायम होता. साधेसे कपडे, निगर्वी वागणे, सगळ्यात मिसळून हलक्या आवाजात शांतपणे बोलणे, शेती सोडून कुठले फारसे विषय नाहीत, समकालीन राजकारण वगैरे काही नाही. एकच ध्यास, शेती आणि शेतकरी, माती आणि पाणी.

या भेटीत औपचारिक गप्पांशिवाय फारसं काही महत्त्वाचे बोलणे झाले नाही. याच कार्यक्रमात मी अरविंद गोरेंवर एक दीर्घ लेख लिहिला होता, त्याची छोटेखानी पुस्तिका केलेली, तिचं प्रकाशन शरदराव पवारांच्या हस्ते झाले. छान लिहिलंय वगैरे अण्णा त्या धावत्या भेटीत बोललेले.

अण्णांची तीस वर्षांनंतरची ही भेट. या भेटीला एकूणात हा तसा फारसा अर्थ नाही, परंतु १९८५-८६ ते २०१७-१८ हा कालखंड मात्र खूप महत्त्वाचा आहे. शेतीभाती-शेतकऱ्यांचे जगणे-पर्यावरण यांचे प्रश्‍न तेव्हाही होते, आता ते चक्रवाढ पद्धतीने अंगावर येताहेत. १९ मार्च १९८६ रोजी पहिली शेतकरी आत्महत्या सरकारी नोंदीप्रमाणे झालेली. साहेबराव करपे (रा. चील गव्हाण, जि. यवतमाळ) या माजी सरपंच आणि संगीताची आवड असणाऱ्या शेतकऱ्याने सहकुटुंब आत्महत्या केली. करपे यांच्याकडे ४० एकर जमीनही होती. निमित्त होते वीज मंडळाने थकीत बिलामुळे वीज खंडित करणे आणि पंधरा एकर पोटऱ्यात आलेला गहू वाळणे.

‘शेतकरी आत्महत्या’ या विषयाचा गुंता प्रचंड मोठा आहे. त्याचा शोध घेणे म्हणजे एकूणच भारतीय कृषी अर्थव्यवस्थेचा शोध घेणे होय. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो ऑफ इंडियाने १९९५ ते २०१४ या काळात एकूण २,९६,४३८ भारतीय शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद केली आहे.

त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात ६०,७५० आत्महत्या. विशेष म्हणजे २०१४ ते २०२० या काळात आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१४ मध्ये ५६०० तर २०२० मध्ये ५५०० शेतकरी. सर्वसाधारण सरासरी सांगते की देशात रोज दहा शेतकरी आत्महत्या करतात. २०१७-१८ मधील ही सरासरी नंतरच्या काळात कमी होण्याचे तसे विशेष कारण नाही.

Agriculture Reformer Viju Anna Borade
Livestock Farming: उत्तम प्रजनन व्यवस्थापन; व्यवसायिक पशुपालनाचा यशस्वी मंत्र!

ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस महाराष्ट्रात शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचा उदय झाला. शेतीमालाच्या रास्त भावाचा प्रश्‍न हा संघटनेचा एकमेव कार्यक्रम. ‘उत्पादन खर्चावर आधारित भाव, भीक नको- हवे घामाचे दाम’ अशा घोषणांनी महाराष्ट्र सर्वदूर घुसळून निघाला. क्रमाक्रमाने हा आवाज देशभर पोहोचला. डंकेल प्रस्ताव, उदारीकरण वगैरे अनेक गोष्टी. १९९० मध्ये उदारीकरण, मुक्त अर्थव्यवस्थेची सुरुवात झाली. फ्री इकॉनॉमी हा शेती

प्रश्‍नावरला अंतिम तोडगा आहे, असा सर्वसाधारण अभिनिवेश अनेक समर्थकांचा होता. म्हणजे एका बाजूने खुली अर्थव्यवस्था अवतरत असतानाच शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरू झाले. तो उदारीकरणाचा थेट परिणाम होता का? नाही असे म्हटले तरी शेतीविषयक एकूणच सरकारी धोरणांचा आणि शेतीमधल्या साचत आलेल्या विपन्नतेचा तो परिणाम होता, हे तर मान्य करायलाच हवे.

आपले शेतीविषयक दारिद्र्य हे संमिश्र, बहुमुखी स्वरूपाचे आहे. ते केवळ आर्थिक नाही. एका बाजूने खरी संस्कृती ही कृषी संस्कृती आहे, असे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूने तिच्या सर्व उपांगांचे शोषण करायचे. भाषा, जगणे, व्यवहार काहीही यातून सुटत नाही. यातून निर्माण होणारी भ्रमिष्ट अवस्था आणि सार्वत्रिक अध:पतन हा कोणाच्या चिंतनाचा, अपवाद वगळता, विषय राहत नाही. एकट्या दुकट्या माणसाने सोडवायचा हा प्रश्‍न नाही. तो व्यवस्थेच्या मुळाशी नासलेल्या गाभ्याला दुरुस्त करण्याचा प्रश्‍न आहे. त्यामुळे व्यवस्थाबदल हाच त्यावर उपाय असू शकतो. तो कसा करायचा हा प्रश्‍न सनातन स्वरूपाचा होऊन बसला आहे.

विजूअण्णा बोराडे या सगळ्या विचारांच्या कोलाहालात कुठेतरी कायम मला जवळचे वाटावे असे नाव राहत आले. गर्दी, झगमगाट, सवंग प्रसिद्धीपासून व्रतस्थपणे बाजूला राहून एकांड्या शिलेदारासारखे अव्याहतपणे काम करणारे अण्णा.

कायम दिसणारे आणि कधी न दिसणारे अण्णा. अण्णांना चुकून कधी फोन केला तर ते कुठल्यातरी गावाच्या शिवारात असतात, कृषी विज्ञान केंद्रात असतात किंवा जिथे कुठे शेती-शेतकरी याविषयी काही चाललेले असते तिथे तरी असतात. अण्णांची एकच भूमी, एकच आकाश म्हणजे शेती आणि माती.

पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकरांनी एका शब्दात अण्णांचे वर्णन केले आहे, ‘मातीमग्न.’ अण्णांच्या भेटीत त्यांनी उभ्या केलेल्या कामावर गेले की ही मग्नता दिसते, अण्णा तिथे नसले तरी ती मग्नता त्या प्रकल्पाच्या सगळ्या बाजूंनी बोलू लागते. मग तिथे आपल्याला शेतीला सर्वांत पवित्र काम मानणारा टॉलस्टॉय भेटतो, वाल्डनकाठचा थोरो भेटतो आणि ‘शेतकरी जगाला सर्व काही देतो, घेत काही नाही’ असं मानणारा गांधीही भेटतो.

अण्णांचे मूळ गाव जालना जिल्ह्यातले पाटोदा. औरंगाबाद आणि जालना ही अण्णांची कर्मभूमी. जालन्याचे पूर्वीचे नाव जालनापूर. ‘जहालनपूरचा हकिकतनामा’ नावाचा एक ग्रंथ जालन्याचे कै. डॉक्टर शिवाजीराव गौळकर यांनी लिहिला आहे. संपूर्ण मराठवाडा हा निजामी राजवटीचा भाग होता. या गावाचा एक ऐतिहासिक संदर्भ म्हणजे १६७९ मध्ये छत्रपती शिवाजी राजांनी या शहरावर स्वारी केल्याचे सांगितले जाते.

शेती, माती, पाणी आणि आपले जैविक पर्यावरण हा अण्णांच्या आयुष्याचा ध्यास आहे. त्याशिवाय त्यांना करमत नाही. ते कुठेही गेले तरी त्यांच्या मनाला असणारा मातीचा गंध दूर जात नाही. कोणत्याही माणसाचे चरित्र नेमके कसे समजून घ्यावे? काही ढोबळ परिमाणे आपल्या समोर असतात.

जन्म-शिक्षण-गाव-आई-वडील वगैरे. माणसाच्या अशा औपचारिक परिचयात त्याचे चरित्र गवसत नाही फारसे. माणूस जन्माला आला, तो वाढत मोठा होत जाणारच असतो. त्याला जोडून तो काय करतो आणि कोणासाठी करतो, हा खरा प्रश्‍न असतो. वास्तविक चरित्राचा शोध त्यातून घ्यावा लागतो.

ना. धों. महानोरांशी माझा त्यांची प्रत्यक्ष ओळख होण्याआधीपासूनचा ऋणानुबंध. आधी त्यांची मातीशी बोलणारी कविता भेटली, नंतर खूप उशिराने महानोर. महानोरांवर प्रेम करणारे सर्वदूर खूप लोक होते, त्या गर्दीतला मीही एक होतो पण महानोर मला केवळ कवी म्हणून थोर वाटत आले का? या प्रश्‍नाचे उत्तर नकारार्थी आहे.

कवी म्हणून असणारे त्यांचे मोठेपण हे कायम इथल्या भू-जैविक व्यवस्थेशी चिंब ओल्या नाळेने जोडलेले होते. रानात वास करणारा, प्रत्यक्ष राबणारा शेतकरी त्यांच्या विलक्षण देखण्या कवितेच्या मागे होता. त्यांच्या कवितेच्या मागे असणारा त्यांचा कुणबी हात आणि मन मला अधिक महत्त्वाचे वाटत होते.

महानोर दादांचा संदर्भ विजूअण्णांशी जोडण्याचे कारण हेच आहे की याबाबतीत दोघात विलक्षण साम्य आहे. फरक एवढाच आहे महानोर यांनी आपल्या कामाला संस्थात्मक जोड न देता ते मुक्त विद्यापीठासारखे राबवले, त्याविषयी सगळीकडे कायम अंतःकरणातून बोलत राहिले. त्याचा परिणाम हा थेट दृश्‍यात्मक नव्हता. विजूअण्णांनी आपल्या शेती-माती-पाणी विषयक अपार सद्‍भावनेला संस्थात्मक रूप दिले.

महानोर माझ्याशी या विषयावर होणाऱ्या चर्चेत अनेकदा अण्णांचे नाव खूप आदराने घेत. आपण जे करू शकत नाही ते विजूअण्णा करत आहेत, याबद्दल त्यांना खूप आनंद वाटत असे. या सगळ्याच अर्थाने अण्णांच्या चरित्राचा शोध घ्यायचा असेल तर तो त्यांच्या एकंदरीत कार्याच्या अंगाने घ्यावा लागतो. खरे चरित्र हे कार्यचरित्रच असू शकते, याचा प्रत्यय विजूअण्णांकडे पाहताना येतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com